एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाचा सर्वाधिक खप व्हायचा असेल किंवा त्यांना अधिकाधिक नफा कमवायचा असेल तर जगभरात एक बाजारपेठ अशी आहे की, जी कंपन्यांचे सर्व लक्ष्य पूर्ण करू शकते.. ती म्हणजे भारतीय बाजारपेठ. जगभरातील कुठल्याही कंपनीला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना भारतीय बाजारपेठेत आपले उत्पादन पसंतीस उतरवण्याशिवाय पर्याय नाही. मग ती सौंदर्यप्रसाधने बनवणारी कंपनी असो की इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणारी. असे सर्व असतानाही एखाद्या उत्पादनाच्या ब्रँडला भारतीय नाव देताना परदेशी कंपन्या अनेकदा उत्साही दिसत नाहीत. अँड्रॉइड हे याचे एक ताजे उदाहरण. देशातील अंदाजे ५५ कोटी ४८ लाख मोबाईलधारकांमध्ये सुमारे पाच कोटी दहा लाख स्मार्टफोनधारक आहेत. त्यांच्यातील ९१ टक्के स्मार्टफोनधारक हे अँड्रॉइडचे आहेत. इतकेच नव्हे तर जगभरातील अँड्रॉइड वापरकर्त्यांपैकी ५७.७ टक्के हे भारतीय आहेत. म्हणजेच, अँड्रॉइडच्या विकासात भारतीयांची मोलाची साथ आहे. याचबरोबर गुगलसाठी अँड्रॉइडचे व्यवस्थापन पाहणारे प्रमुखही भारतीयच आहेत. संशोधन असो किंवा मार्केटिंग, खरेदी असो किंवा विक्री सर्वत्र भारतीयांचा वावर दिसतो. तंत्रज्ञान क्षेत्रात टचस्क्रीनचा अनुभव देणारा प्रणव मेस्त्री हा भारतीयच. तर गुगल अँड्रॉइडला जागतिक बाजारपेठेत चांगल्या स्थितीत पोहोचवणारे गुगलचे उपाध्यक्ष सुंदर पिचाई हेही भारतीय. इतकेच नव्हे तर संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख असलेल्या मायक्रोसॉफ्टला यशाच्या उंचीवर नेण्यामध्येही अनेक भारतीयांचा हात आहे. हे भारतीयांचे तंत्रज्ञान क्षेत्रातील देणे इतर अनेक क्षेत्रांतही आहे. पण परदेशी कंपन्या उत्पादनाचे ब्रँडिंग करताना- त्यासाठी या उत्पादनांना लोकांमुखी राहतील अशी नावे देताना- मात्र भारतीय नावांचा विचार करताना दिसत नाहीत. परदेशी कंपन्याच नव्हे, तर अनेक भारतीय कंपन्यांनीही आपली उत्पादने विकण्यासाठी हॉलिवूडमधील किंवा प्रसिद्ध परदेशी नावांचा वापर केला आहे. भारतीयांवर ब्रिटिशांनी राज्य केले आहे आणि त्यांना आजही इंग्रजी नावांशी जवळीक वाटते, असा सिद्धान्तवजा निष्कर्ष आयआयएम बेंगळुरूमधील प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासात अलीकडेच मांडण्यात आला होता. परंतु नजीकच्या काळात विविध उत्पादनांना भारतीय नावे आली नाहीत तर भारतीय तरुण कदाचित या विरोधात पेटून उठू शकतो. अँड्रॉइडच्या आगामी व्हर्जनला ‘लस्सी’ हे नाव देण्याची आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला आणि आता देशभरातून मिळू लागलेला प्रतिसाद, याकडे या दृष्टीने भारतीय मनोभूमिकेतील बदलाची एक सुरुवात म्हणून पाहायला हवे. ही मागणी मान्य होईल की नाही हा नंतरचा भाग झाला. परंतु, भारतीय तरुणाईलाही आता समजू लागले आहे की, परदेशी कंपन्यांचा नफा हा भारतीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. यामुळे परदेशी कंपन्यांनी उत्पादनांनाही भारतीय ओळख निर्माण करून द्यावी. या आग्रहासाठी बाजारपेठेत अधिराज्य गाजवणाऱ्या कंपन्यांनाही प्रश्न विचारण्यात तरुणांनी पुढाकार घेतल्यामुळे, तरुणांमध्ये जागी झालेली ही भावना महत्त्वाची ठरते. सध्या ही बाब केवळ अँड्रॉइडपुरती मर्यादित असली तरी लवकरच अशा अनेक प्रश्नांची उत्तरे इतर भारतीय तसेच परदेशी कंपन्यांनाही द्यावी लागतील. या तरुणाईचे ऐकून जर एखाद्या कंपनीने ठरवून आपल्या उत्पादनाला भारतीय नाव दिले तर खऱ्या अर्थाने त्या कंपनीने भारतीय बाजारपेठेची कदर राखली असे दिसेल; अन्यथा नववसाहती मानसिकतेबाबतचे सिद्धान्त एरवीही खरे ठरतातच.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2013 रोजी प्रकाशित
बाजारपेठ की नववसाहत?
एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाचा सर्वाधिक खप व्हायचा असेल किंवा त्यांना अधिकाधिक नफा कमवायचा असेल तर जगभरात एक बाजारपेठ अशी आहे की, जी कंपन्यांचे सर्व लक्ष्य पूर्ण करू शकते..

First published on: 08-10-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International companies success in the indian market