शालेय जीवन संपल्यावर त्यांनी अनेक कामे केली. रस्ते खणणे, नळदुरुस्ती, लाइट बल्ब इन्स्पेक्टर, रंग विक्रेता या कामांचा त्यांना कमीपणा वाटला नाही, नंतर त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांची पहिली पटकथा ‘व्हॉट अ व्हूपर’ या चित्रपटाची होती ती टेरी नेशन यांनी पूर्णपणे पुन्हा लिहिली होती. त्यात काहीसे अपयश दिसताच त्यांनी अभिनयाकडे लक्ष वळवले, पण अखेर दूरचित्रवाणीच्या करमणूकप्रधान हास्यमालिकांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली, त्यांचे नाव जेरेमी लॉइड.
ब्रिटनमधील सर्वात लोकप्रिय हास्यमालिकांची निर्मिती त्यांनी केली होती. वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले. त्यांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी इंग्लंडमध्ये झाला. अ‍ॅलो, अ‍ॅलो व आर यू बिइंग सव्‍‌र्हड या त्यांच्या करमणूकप्रधान हास्यमालिका विशेष गाजल्या. त्यातील आर यू बिइंग सव्‍‌र्हड ही मालिका पिकाडिली शॉप या दुकानात विक्रेता म्हणून त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवर बेतलेली होती. त्यांची ही मालिका १९७२ ते १९८५ या काळात ब्रिटन, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये लोकप्रिय ठरली. अ‍ॅलो, अ‍ॅलो ही मालिका १९८२ ते १९९२ इतका काळ चालली. ती दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर बेतलेली हास्यमालिका होती. त्यात एका छोटय़ा फ्रेंच कॅफेमध्ये ब्रिटिश, फ्रेंच व जर्मन व्यक्ती एकमेकांना लैंगिक भाषेत टोमणे मारतात, त्यांच्या वागण्यात वात्रटपणाचा कळस असतो असे दाखवले होते. डेव्हिड क्रॉफ्ट यांच्या समवेत त्यांनी या दोन्ही हास्यमालिका तयार केल्या होत्या.
टीकाकारांच्या मते या मालिका म्हणजे साचेबंद निर्मिती होती व त्यात सांस्कृतिक संवेदनशीलता अजिबात नव्हती. पण असे असले तरी प्रेक्षकांना मात्र त्या आवडत होत्या. याचे कारण एकच असावे, ते म्हणजे करमणुकीचे चार क्षण त्यांना त्यात मिळत होते. लॉइड यांनी अ हार्ड डेज नाइट व हेल्प या बिटल्सच्या चित्रपटात भूमिकाही केल्या होत्या. अ‍ॅलेसांड्रा कॅन यांच्या मते त्यांच्या कल्पना या उसन्या नव्हत्या त्यामुळे ते यशस्वी झाले. त्यांचे चार विवाह झालेले होते. त्यांची पत्नी व अभिनेत्री जोएना ल्युमले हिने त्यांचे वर्णन उत्तम व्यंगकौशल्य असलेली रुबाबदार व्यक्ती असे केले होते.  अमेरिकेत रोवान अँड मार्टिन्स ही मालिका टीव्हीवर सादर केली. त्यात सॅमी डेव्हिस ज्युनियर व डीन मार्टिन हे अभिनेते होते. नंतर लॉइड ब्रिटनला परत आले, पण जोएना ल्युमले या अभिनेत्रीच्या प्रेमपाशात ते अडकले व हॉलीवूड की जोएना यात त्यांनी जोएनाला पसंती दिली. पण हा विवाह काही महिनेही टिकला नाही. कदाचित त्यांनी हॉलीवूडची निवड केली असती तर अधिक व्यापक यश त्यांना मिळाले असते.