खेळाडूंच्या यशाला सातत्याचे परिमाण लाभले तरच त्याचे मूल्य वाढते. स्क्वॉश या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये जोश्ना चिनप्पाचा समावेश होतो. मात्र दुखापती आणि खराब फॉर्म यांच्या दुष्टचक्रात अडकल्याने यंदा २८ वर्षीय जोश्नाची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नव्हती. अव्वल खेळाडूंना स्वतच्या खेळातले चढउतार चाणाक्षपणे टिपता येतात. जानेवारी ते मे या कालावधीत जोश्ना असंख्य स्पर्धामध्ये सहभागी झाली. मात्र प्राथमिक फेऱ्यांतच तिला गाशा गुंडाळावा लागला. हरण्यापेक्षाही शंभर टक्के प्रदर्शन करता येत नसल्याची खंत जोश्नाला जाणवली आणि तिने एक कठोर निर्णय घेतला : दोन महिने कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचा!
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या स्क्वॉशपटूंसाठी प्रत्येक स्पर्धा महत्त्वाचीच; कारण त्यानुसार जेतेपद, बक्षीस रक्कम, मिळणारे गुण, क्रमवारीतील स्थान या सर्व गोष्टी अवलंबून असतात. तरीही जोश्नाने स्पर्धेत खेळणे थांबवले. खेळाचा सराव आणि तंदुरुस्ती यांवर तिने भर द्यायला सुरुवात केली. कोणताही रॅकेट आधारित खेळ दमसासाची परीक्षा पाहणारा असतो. जगभरातल्या मातबर खेळाडूंना टक्कर द्यायची असेल तर खेळाइतकीच तंदुरुस्ती महत्त्वाची आहे हे जोश्नाने ओळखले. शरीर चपळ आणि लवचीक राहील या दृष्टीने व्यायामात बदल केले. खेळाचा सखोल अभ्यास आणि तंदुरुस्ती समाधानकारक झाल्यावर जोश्नाने पुनरागमनासाठी राष्ट्रीय स्पर्धेची निवड केली. शानदार खेळासह एकेक टप्पा पार करत जोश्नाने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत हर्षितकौर जवांदा या युवा गुणवान खेळाडूला नमवून जोश्नाने विक्रमी १४ व्या राष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले. महिला स्क्वॉश प्रकारात सर्वाधिक जेतेपदे पटकावणाऱ्या भुवनेश्वरी कुमारी यांच्या विक्रमापासून ती केवळ दोन जेतेपदे दूर आहे.
मेलबर्न येथील व्हिक्टोरिया खुल्या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय जोश्नाने घेतला, तो यानंतरच. येथे राष्ट्रीय स्पर्धेच्या तुलनेत प्रतिस्पर्धी खेळाडूंचा दर्जा अधिक होता. मात्र नवी ऊर्जा आणि उत्साहासह जोश्नाने प्रत्येक फेरीत तडाखेबंद खेळ करत जेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेतेपदांचा दीड वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत कारकीर्दीतील दहाव्या जेतेपदाची कमाई केली. २०१३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित जोश्नाने गेल्या वर्षी दीपिका पल्लीकलच्या साथीने खेळताना राष्ट्रकुल स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. मोठी भरारी घेण्यासाठी दोन पावले मागे जावे लागते, याचा प्रत्यय देत जोश्नाने मिळवलेले यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.