चित्रकलेत पाहायचं ते रंग- रेषा- आकार- अवकाश- प्रमाणबद्धता यांच्याकडे, असं शिकवण्याचा प्रघात असतो आणि चित्रकाराचं ‘कौशल्य’ आपण कसं पाहणार, ते या घटकांवर ठरतं. तरीदेखील काही चित्रं लक्षात राहतात, भावतात, आवडतात.. असं का व्हावं?
आज थेट तुम्हीच पहिलं चित्र पाहा. पाहिलं असेल तर वाचा. पेस्तनजी बोमनजींनी १८८७ साली केलेलं ‘पारसी गर्ल’ नावाचं चित्र आहे ते. खानदानी जामानिमा केलेली एक पारसी चिमुरडी हातात ब्रश घेऊन तिच्याशेजारच्या कॅनव्हासवर जी काय ‘अभिव्यक्ती’ वगैरे करायची ती करून आता आपल्याकडे पाहाते आहे. तिनं ज्या कॅनव्हासवर रंगकाम केलं त्याच कॅनव्हासवर एका पोथिनिष्ठाचं जे हुबेहूब रेखाटन करून ठेवणारं तिच्या घरचं जे कुणी मोठं माणूस असेल, त्यानं तिच्यावर रागावणं शक्य आहे का? नाहीच.. इतकी गोड छकुली ती!
..आता याच चित्राकडे पुन्हा एकदा पाहून विचार करूया, १८८७ सालात छकुली असणारी ती मुलगी त्याहीनंतर शंभर र्वष जगली असेल. बारा वर्षांपूर्वी तिनं हे जग सोडलं, त्यापूर्वी कलेचे कायकाय संस्कार तिच्यावर झाले असतील? खणखणीतपणे आपलं म्हणणं मांडणारी.. बहुधा ‘मी रोज पक्ष्याला दाणे टाकते’ असं तिच्या चित्रातून सांगणारी ही मुलगी, पुढे आयुष्यभर ‘एका थोर व्यक्तिचित्रणकाराची मुलगी (किंवा पुतणी वगैरे)’ अशा ओळखीच्या सावलीतच झाकोळली असेल का? समजा ती चित्रकाराची कुणीच नव्हती.. पण ती चित्रं तर काढायची की नाही? मग तिनं पुढे चित्रकलेत काहीच का केलं नाही? केलं असेलही, तर गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात एकही पारशी महिला चित्रकार कशी काय नोंदवली गेली नाही? (पिलू पोचखनवालांचा अपवाद : त्या शिल्पकार होत्या!) .. ती मुलगी मोठी होत असताना, तिला तत्कालीन ‘अभिरुची’चा उंबरठा ओलांडायचा नाही, अशी शिकवण मिळाली म्हणून तिचं नुकसान झालं असेल का?
एकाच चित्राकडे बऱ्याच प्रकारे पाहाता येतं. त्यापैकी कोणत्या प्रकारे आपण पाहायचं, हे ठरवण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे, कलाकाराचा इतिहास माहीत करून घेणं. त्यासाठी कलेतिहासकारांची मतंही वाचून विचारात घेणं. पेस्तनजी बोमनजी यांची व्यक्तिचित्रणावर हुकमत होती. ते ‘जेजे’च्या युरोपीय कलाशिक्षण परंपरेचे पाईक, पण या परंपरेशी ज्याचा थेट संबंध कधी आलेला नाही त्या राजा रविवर्मा यांचेही पेस्तनजी हे चाहते. रविवर्माकडून त्यांनी ‘प्रेक्षकांना माहीत असलेला प्रसंगच अधिक खुलवून सांगण्याची हातोटी’ घेतली, असं मत पार्थ मित्तर यांनी (‘आर्ट अँड नॅशनलिझम’ या पुस्तकात) नोंदवलं आहे. हे पारसी गर्ल नावाचं चित्रही मित्तर यांच्या मताशी पडताळून पाहता येईलच.
असं पुस्तकांतल्या मतांवरनं चित्राबद्दल मत बनवणं ही जर डोकेफोड वाटत असेल आणि ‘जे समोर आहे ते डोळे भरून पाहावं आणि त्याचा छान आनंद घ्यावा’ अशी वृत्ती असेल तरीही ठीक.. पण मग काय पाहून कोणता आनंद आपण घेतो आहोत हे सतत स्वत:शीच तपासून पाहण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. अशा दृश्य-जबाबदारीची जाणीव फक्त एकाच पद्धतीनं वाढून उपयोग नसतो, कारण तपासणं म्हणजे सततच तपासणं. मग आपल्या औंधच्या भवानी वस्तुसंग्रहालयात असलेलं ठाकरसिंह यांचं ‘ओलेती’ हे चित्र पाहणाऱ्या आपणा भारतीय स्त्री-पुरुषांचे डोळे राज कपूरनं ‘राम तेरी गंगा मैली’ दाखवून जो धंदा केला त्यानंतर बदलले आहेत, हेही स्वत:ला तपासून पाहण्याचा भाग बनतं. कौशल्याच्या आधारावर जे कला म्हणून एका काळात स्वीकारलं गेलं, ते आज पाहताना आपणाला कौशल्याचाच पुन्हा शोध घ्यायचा आहे, असं स्वत:ला बजावावं लागतं.
हे आपण बहुतेक जण करतच असतो. म्हणून आपण संस्कृतीचा भाग असतो आणि लोक आपल्याला सुसंस्कृत म्हणणार असतात.
‘आंबटशौकीन’ हा शब्द मराठीत आहे. त्याचा अर्थ लोकांना आपल्याकडे पाहून कळू नये, आपण आंबटशौकीन ठरू नये, याची काळजी आपण घेतच असतो.
हा जो ‘आपल्यात असतंच’, ‘आपल्याला कळतंच’वाला भाग आहे, तिथे कलेतिहासाचा (विशेषत: एकेकटय़ा कलाकाराच्या इतिहासाचा) पुढला भाग येतो.. तो भाग म्हणजे कलेचं तत्त्वज्ञान आणि/किंवा सौंदर्यशास्त्र.
एरवी याबद्दल बोलण्याचं कारण नव्हतं, पण हे आपल्यात असतंच, म्हणून बोलायला काही हरकत नाही.
चित्रकलेत अगदी नग्नचित्रंही स्वीकारार्ह आहेत, फक्त ती का पाहायची याबद्दलची दृष्टी धड असावी लागणार आहे, याची जाणीव कलेचं तत्त्वज्ञान आपल्याला देतं. शारीरिक, हाडामांसाच्या, मानवी चामडीच्या सौंदर्याचा आस्वाद आपण घेत नसून आपण त्या सौंदर्याच्या ‘प्रतिनिधित्वा’चा म्हणजेच ‘रिप्रेझेंटेशन’चा आस्वाद घेतो आहोत, याची ही जाणीव असते. म्हणजे ‘मानवी हस्तक्षेपानं झालेली प्रतिसृष्टी’.. तिला आपण दाद देत असतो. मणिपूरच्या महिलांनी केलेल्या वस्त्रहीन निदर्शनांचा फोटो आणि एखादं ‘न्यूड’ यांतला फरक तो हा. कलेतल्या या ‘प्रतिसृष्टी’ला इसवी सनाच्या साधारण ३५० र्वषआधी प्लेटोनं ‘मिमेसिस’ म्हटलं. त्याचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यानं तर ‘मिमेसिस म्हणजे प्रतिसृष्टिनिर्माण एवढंच कलावंताचं काम नसून चांगल्या जगण्याकडे कशी वाटचाल करायची तेही कलेनंच सांगायचं असतं,’ अशी अपेक्षाही व्यक्त केली.
माना किंवा अमान्य करा, पण हीच अपेक्षा आजकालचे संस्कृतिरक्षक त्यांच्या-त्यांच्या प्रकारे आजही राबवत नसतात काय? ‘याच्यामुळे संस्कृती बुडत्याय’ अशी लाठी जेव्हा ते उगारतात, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृती ही काही अ‍ॅरिस्टॉटलची ग्रीक संस्कृती नसते.. पण काय योगायोग पाहा!
दुसरीकडे, अ‍ॅरिस्टॉटलचा ‘चांगल्या जगण्या’चा विचारच काय, पण अगदी ‘मॉडर्न’ म्हणवला जाणारा ‘माणूसच मानवी जीवन सुधारू शकतो’ हा विचारसुद्धा प्रत्यक्षात खरा ठरत नाही, असं दाखवून देणारे तत्त्ववेत्ते गेल्या शतकभरात तिकडे त्या अ‍ॅरिस्टॉटल वगैरेंच्या युरोपातच गेल्या शतकभरात उपटले. ज्याँ फ्रान्स्वां ल्योटार्ड, थिओडोर अडोनरे, ज्याक डेरिडा, लेव्हीस्त्रॉस, अशी त्यांची नावं. त्यांनी ‘ख्रिस्तान्तक’ नीत्शेचा आधार घेतला. हे कुणाला पाखंड वाटेल, नव्हे काही जणांना वाटलंच. कुणाला भंपकपणा वाटेल.. वाटलाच, पण अशा नवपाखंडी, नवभंपक माणसांनी नवकलेचा मार्ग फार, फार खुला करून दिलेला आहे आणि आता त्या मार्गावरून मानवी इतिहासाला मागं फिरणं शक्य नाही, अशी स्थिती झालेली आहे. प्रतिसृष्टी घडवण्याच्या तांत्रिक कौशल्याऐवजी आपल्याला आपल्या जगण्याकडे पाहायला लावण्याचं वैचारिक कौशल्य कलावंताकडे असतं, असं या ‘नवपाखंडी, नवभंपक’ लोकांनी म्हटलं आहे.
आणि हो, ते किती पटण्याजोगं आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पेस्तनजी बोमनजींची ‘पारसी गर्ल’ आहेच १८८७ पासून! तिच्याकडे गेल्या तीन पिढय़ांना ‘अभिरुची आणि अभिव्यक्ती’बद्दलचे प्रश्न विचारण्याची क्षमता होतीच की नाही?
नाही पटलं समजा आणि आपण प्रतिसृष्टी घडवण्यामागच्या तांत्रिक कौशल्यालाच कला मानत राहिलो, तर आपल्याला ठाकरसिंह आवडतात तितकेच, किंबहुना त्याहून खूपखूप जास्तच- जॉन फर्नाडिसही आवडू शकतात. फर्नाडिसांच्या चित्रांत स्त्रिया होत्या म्हणून नव्हे, तर त्यांच्या चित्रांमधले फटकारे अधिक जोरकस होते आणि तरीही सहज भासणारे होते, म्हणून.
पण पुढला प्रश्न असा की, कौशल्य केवळ हुबेहूबपणातच मोजणार का? आकाराचं सुलभीकरण करायचं, त्यासाठी हुबेहूबपणाशी तडजोड करायची आणि रेषा-रंग यांकडे अधिक लक्ष द्यायचं असा जो (उदाहरणार्थ बंगाली) चित्रकारांचा खाक्या असतो, त्याकडे आपण त्यांची ‘अभिव्यक्ती’ म्हणून पाहणार की नाही? कोलकात्याच्या शुवप्रसन्न नावाच्या एका ज्येष्ठ (वय ६६) चित्रकाराचं चित्र सोबत आहे, त्यातला पक्षी घुबड आहे, हे तो हुबेहूब नसूनही कळतंय, पण महत्त्व त्यातल्या रेषा आणि रंग यांना आहे. शुवप्रसन्न हे अशा कौशल्यासाठी माहीत आहेत. त्यांचं आपण काय करणार?
स्त्री देहाच्या किंवा घुबडाच्या चित्रातून कोणताही ‘संदेश’ आपल्याला नकोय. आपल्याला कौशल्यच पाहायचंय. हे कौशल्य म्हणजे हुबेहूबपणा दाखवण्याची युक्ती एवढंच मर्यादित असू शकत नाही, हेही आपल्याला पटू शकतं. मग  अशा केवळ रंग- रेषा- आकार- अवकाश- प्रमाणबद्धता यांतल्या कला-कौशल्याच्या मोजपट्टीवर आपण घुबड स्त्री देहापेक्षा कमी महत्त्वाचं का मानावं?
घुबड काहीसं अमूर्त आहे आणि आपल्याला संदेशच हवाय असं नसलं तरी चिन्हं पाहिजेतच, असं आहे की काय?

Loksatta Documentary Discovery channel David Attenborough Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…
astrology budha gochar 2024 mercury transit in leo these zodiac sign will be shine an happy
बुधाचा सिंह राशीत प्रवेश; २९ जुलैपासून ‘या’ तीन राशींची श्रीमंती वाढणार! व्यवसायात नफा तर नोकरीत प्रमोशनची शक्यता
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Loksatta kutuhal Artificial intelligence and verbal communication
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद
The team of the film amhi Jarange garajvant marathyacha Ladha at the office of Loksatta
आरक्षणामागच्या समाजभावनेची गोष्ट; ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटाची टीम ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Kalidas artful clown marathi news
कालिदासाचे कलामर्मज्ञ विदूषक
NEET exam scam University Admission exam National Testing Agency
लेख: अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण..
Documentary For preservation of extinct aspects
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : नामशेष पैलूंच्या जतनासाठी…