कलेचा मानवी तंत्रज्ञान म्हणून विचार करून पाहायचा असेल, ज्याचं एक कार्य परिणाम, अभिव्यक्ती म्हणूनही असेल, तर त्याकरिता मानवी मेंदूच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मेंदूच्या अभ्यासामुळे समोर येणाऱ्या गोष्टी, कलानिर्मितीसाठी लगेचच उपयोगी ठरतीलच असं नाही, पण त्यामुळे आपल्या मेंदूच्या, मनाच्या व्यवहारांवर नव्यानं प्रकाश पडेल. या मनाच्या व्यवहारांचाच शेवटी कलेशी, चित्रकलेशी संबंध असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे, पण मूळ मुद्दा सुप्त मन या संकल्पनेविषयी नव्हताच! मूळ मुद्दा होता की भावनिक न होता चित्राचा विचार करणं शक्य आहे का? एखादी संकल्पना जी चित्रकला क्षेत्राच्या बाहेरची आहे, तिचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करून चित्रकलेच्या क्षेत्रात वापर करणं शक्य आहे का? जसं सुप्त मन ही मानसशास्त्रातील संकल्पना, मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतीचा वापर करून, समजून त्या आधारे चित्रनिर्मितीबद्दल भूमिका तयार होणं शक्य आहे का?
मूळ मुद्दा कदाचित दुर्लक्षित झाला असेल, कारण मानवाच्या इतिहासात विविध देश, संस्कृती यात धर्माचा चित्रकलेशी खूप घनिष्ठ संबंध आला. धार्मिक कथांचं चित्रण हे चित्रकलेचं मुख्य कार्य होतं. चित्रं रंगवता रंगवता धार्मिक भावना या चित्रांशी संबंधित झाल्या. चित्रं ‘पवित्र’, ‘अपवित्र’ ठरू लागली. चित्रं घडवणाऱ्या कलाकारांना, त्यांची चित्रं घडवणं ही कृती धार्मिक वाटू लागली. त्या कृतीशी धार्मिक भावना निगडित झाल्यानं धार्मिक विषयावर चित्रं काढणं ही कृती ईश्वराची सेवा, प्रार्थना, अशा कृतीसारखी वाटणं साहजिक आहे. असं वारंवार वाटत राहिल्यानं चित्रकाराला आपण आध्यात्मिक पातळीवर जगून चित्र रंगवतो असं वाटू लागणंही शक्य आहे.
असं पवित्र, आध्यात्मिक वगैरे वाटून घेण्यात अडचण काही नाही, पण चिकित्सक निरीक्षक, अभ्यासू वृत्ती नसेल तर मनात हळूहळू अंधश्रद्धा निर्माण होतात. सुप्त मनांवरचा बहुतेक चित्रकारांचा विश्वास हा या प्रकारातच मोडतो. परिणामी दोन गोष्टी ज्यांचा वरवर एकमेकांशी संबंध नाही, तो कसा असू शकतो हे न तपासता, कोणी फ्रॉइडने सांगितलं म्हणून सुप्त मनावर विश्वास ठेवून त्यावर चित्रनिर्मिती करत राहतात. अशा अंधश्रद्धांवर ‘श्रद्धा’ ठेवल्यानं बहुतेक कलाकार धर्मातील आध्यात्मिक कल्पना ‘परमानंद’ ही गोष्ट आपल्या कलेशी संबंधित करून टाळतात.
त्याचमुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक, वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती-प्रक्रियेचा विचार झाला नाही.
आता तुमच्या अजून एक मूलभूत मुद्दा लक्षात आला असेल. तो आहे, जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? कलाकारांचा काय दृष्टिकोन आहे? कलाकार जगाकडे पाहायचा दृष्टिकोन कलाकृतीशी संबंधित करतात का? की कलाकृती घडवत असताना फक्त कलाकृतीपुरता विचार करतात आणि जगताना वेगळा विचार करतात?
लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे धर्म, आध्यात्मिक दृष्टिकोन कलाकृतींशी, चित्रकलेशी संबंधित झाला. तसंच राजकारणातीलही अनेक विचारधारा या चित्रकलेशी संबंधित झाल्या. प्रत्येक राजकीय विचारधारेनं जगाकडे ज्या पद्धतीनं बघितलं त्याप्रमाणं चित्रं बदलली. एकाच वास्तवाकडे किती वेगवेगळ्या पद्धतीनं पाहता येतं, विचार करता येतो व त्या एकाच वास्तवाचं रूप विचारधारांमुळे कसं वेगवेगळं वाटू शकतं हे पाहणं आपल्याला शहाणं करून सोडेल. म्हणजे समजा, तुम्ही शरीरानं अतिशय दुबळी, खंगलेली व्यक्ती पाहत आहात. ती तुम्हाला पूर्वाजन्मीच्या कर्माचा या जन्मात परिणाम भोगणारीही वाटू शकते; सरकारच्या कारभारामुळे आर्थिक प्रगतीपासून दूर राहिलेली, म्हणून शरीरानं दुबळी झालेली वाटू शकते, एखाद्या आजारानं दुबळी झालेली वाटू शकते आणि या वेगवेगळ्या दृष्टिकोनांनुसार दुबळ्या शरीराच्या व्यक्तीचं चित्रण बदलू शकतं; बदलतं. एकाच घटनेचा अर्थ वेगवेगळे टीव्ही चॅनल्स वेगवेगळा लावत असतात, तसंच प्रत्यक्ष एकाच वास्तवाचा अर्थ विविध विचारधारा एकाच वेळेला वेगवेगळा लावतात. रोज या विविध दृष्टिकोनांची घुसळण चालू असते. चर्चा, वाद, आरोप-प्रत्यारोप आदींद्वारे घुसळणं चालू असते. त्यातून प्रश्न खरोखर सुटतात का? माहीत नाही.
आपण मानवाचा इतिहास पाहिला तर कला व तंत्रज्ञान या दोनही गोष्टी एकाच वेळेला, समांतर विकसित होत गेल्या. त्यामुळे कला हीसुद्धा एक प्रकारचं भावनिक, मानसिक तंत्रज्ञान म्हणून विकसित झाली. अभिव्यक्तीचा विचार या अर्थीही झाला पाहिजे. केवळ तरल भावभावनांची अभिव्यक्ती किंवा प्रस्थापित राजसत्तेविरुद्धचा उठाव, सामाजिक परिस्थितीमुळे होणारी व्यक्तीची घुसमट व्यक्त करणं अशा प्रकारच्या गोष्टीच अभिव्यक्तीमध्ये मोडतात असं नव्हे. तंत्रज्ञान हे एक विशिष्ट परिणाम साध्य करण्यासाठी, ठरावीक कृती-विशिष्ट क्रमानं करतं. त्या कृतीच्या शेवटी अपेक्षित परिणाम प्राप्त होतो. हे सर्व साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं काही वस्तू, साधनं निर्माण केली जातात. अनेक मानवी कृतीही याच प्रकारच्या आहेत. उदा. व्यायाम, योग, आसनं, स्वयंपाक आदी.
कलेचा मानवी तंत्रज्ञान म्हणून विचार करून पाहायचा असेल, ज्याचं एक कार्य परिणाम, अभिव्यक्ती म्हणूनही असेल, तर त्याकरिता मानवी मेंदूच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मेंदूच्या अभ्यासामुळे समोर येणाऱ्या गोष्टी, कलानिर्मितीसाठी लगेचच उपयोगी ठरतीलच असं नाही, पण त्यामुळे आपल्या मेंदूच्या, मनाच्या व्यवहारांवर नव्यानं प्रकाश पडेल. या मनाच्या व्यवहारांचाच शेवटी कलेशी, चित्रकलेशी संबंध असतो. येथे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपलं मन व मेंदू असा संबंध कधीच जोडत नसतो; तो जोडून पाहावा का?
२००० आणि २०११ मध्ये माझ्या वाचनात दोन पुस्तकं आली. त्या पुस्तकांची नावं अनुक्रमे ‘फॅन्टम्स इन द ब्रेन’ व ‘द टेल्- टेल ब्रेन!’ या दोनही पुस्तकांचे लेखक, भारतीय वंशाचे विलयानुर सुब्रमणियन रामचंद्रन हे आहेत. त्यांना सर्व जण व्ही. एस. रामचंद्रन म्हणून ओळखतात. रामचंद्रन हे (न्यूरो सायंटिस्ट) मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत. ते माणसाचं वागणं व माणसाची दृक् तसंच इतर संवेदना ग्रहण व अर्थन करण्याची क्षमता व त्या संबंधी मेंदू, मेंदूची रचना व कार्य या संबंधातील संशोधन व काम याकरता प्रसिद्ध आहे. विविध प्रयोगांमध्ये मेंदूच्या अनेक प्रतिमा घेणं व त्यांच्या आधारे मेंदूच्या कार्याचा अभ्यास करणं या गुंतागुंतीच्या पद्धतीऐवजी, रामचंद्रन यांनी प्रायोगिक पद्धतीनं केलेल्या अभ्यासानं मेंदूविषयी संपूर्णपणे नवीन संकल्पना मांडल्या. रामचंद्रन हे सध्या सॅन डिएगो, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील मानसशास्त्र व न्यूरोसायन्स विभागात प्रोफेसर म्हणून काम करतात. तसंच ते सेंटर फॉर ब्रेन व कॉगनिशन या त्याच युनिव्हर्सिटीशी संलग्न सेंटरचे डायरेक्टरही आहेत.
रामचंद्रन यांना विविध प्रकारच्या पेशंट्सना अभ्यासायची संधी मिळाली. त्या पेशंट््सवर उपचार करता करता मेंदूविषयक नवीन तर्क त्यांनी मांडले. या तर्काचा विचार करताना, ते काही महिन्यांसाठी भारतात आले होते. चेन्नई येथील मंदिरातील, संग्रहालयातील प्राचीन शिल्पं पाहताना, मेंदूचं कार्य, प्रतिमा दिसणं, तिचा अर्थ लावणं, अर्थवाही प्रतिमा तयार करणं आदी प्रक्रियांचा या कलाकृतीशी काही संबंध असेल का, असा ते विचार करू लागले. त्यातून प्राचीन भारतीय शिल्पकलेविषयी, त्यातील प्रतिमानिर्मितीच्या मागील कारणमीमांसेविषयी एक नवीन दृष्टी प्राप्त झाली.. रामचंद्रन यांच्या भारतीय कला व एकूणच दृश्यकलेच्या दृष्टीबद्दल पुढच्या वेळी बोलू.

मराठीतील सर्व कळण्याची दृश्यं वळणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painting and brain process
First published on: 24-10-2015 at 02:35 IST