अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील सिएटल शहराच्या अर्थसंकल्पापासून ते पाणीपुरवठा व मलनिसारणापर्यंतच्या सर्व नागरी उपक्रमांना आकार देणाऱ्या सर्वपक्षीय नागरी समितीची (किंवा मंडळाची) नुकतीच नियुक्ती झाली. नऊ सदस्यांची ही समिती नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून शहराचा कारभार हाती घेणार आहे. या समितीमध्ये क्षमा सावंत या मूळच्या पुण्याच्या परंतु आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या नगरसेविकेचा समावेश हा आपल्या दृष्टीने अभिमानाचा विषय. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रस्थापित नेत्याचा पराभव करणाऱ्या क्षमा ‘सोशालिस्ट अल्टरनेटिव्ह पार्टी’च्या सदस्य आहेत. म्हणजे अमेरिकी प्रशासनाच्या दृष्टीने समाजवादी. अमेरिकी राजकारणात समाजवाद्यांना तितकेसे स्थान नाही. या पाश्र्वभूमीवर क्षमा यांचा हा विजय नजरेत भरतो. ४०वर्षीय क्षमा यांचा जन्म पुण्यातला, त्यांचे माहेरचे आडनाव रामानुजम. मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या क्षमा यांनी विसाव्या वर्षीच अमेरिका गाठली. तिथे त्यांनी संगणक अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून अर्थशास्त्राच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. पुण्यातील बालपणीच्या काळापासून आíथक विषमता जवळून पाहिली, त्यामुळेच मला अर्थकारणाचे प्रचंड आकर्षण होते असे त्या सांगतात. अमेरिकतच त्यांनी अर्थशास्त्राचे धडे गिरवले. पुढे मायक्रोसॉफ्टमध्ये मोठय़ा हुद्यावर असलेल्या विवेक सावंत यांच्याशी विवाह झाला. एकीकडे घर-संसार सांभाळत असताना क्षमा यांना अमेरिकी समाजात अनुभवास येणारी आíथक विषमताही खटकत होती. त्यामुळेच अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची नोकरी सांभाळताना त्यांनी सोशालिस्ट पार्टीचे सदस्यत्व प्राप्त करून अमेरिकी समाजवादी चळवळीत भाग घेतला. तेथूनच त्यांच्या राजकीय वाटचालीला प्रारंभ झाला. २०१२ मध्ये झालेल्या ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ आंदोलनात त्या अग्रणी होत्या. आíथक विषमता केवळ विकसनशील देशांचीच मक्तेदारी नसून विकसित देशही त्याला अपवाद नसल्याचे मत त्यांचे याच दरम्यान बनले. कारखान्यात उत्पादित होणाऱ्या मालाची बाजारपेठेत जी किंमत असते तीच कामगारांचीही असते हा त्यांचा सिएटल नगर परिषदेच्या प्रचाराचा गाभा होता. आíथक मंदीनंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीला उत्तर म्हणजे समाजवाद असे त्यांचे म्हणणे आहे. समाजवाद हा ख-या लोकशाहीकडे जाणारा राजमार्ग असल्याचे त्या ठासून सांगतात. विमानांच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या बोइंग या कारखान्याचा प्रकल्प सिएटलमध्येच आहे. सत्तेत आल्यावर या खासगी प्रकल्पाचे सार्वजनिक उपक्रमात परिवर्तन करण्याबरोबरच प्रत्येकाला किमान १५ डॉलर वेतन देण्याचे आश्वासन क्षमा यांनी निवडणुकीदरम्यान दिले होते. त्यांची कसोटी आजपासून सुरू होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2014 रोजी प्रकाशित
क्षमा सावंत
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील सिएटल शहराच्या अर्थसंकल्पापासून ते पाणीपुरवठा व मलनिसारणापर्यंतच्या सर्व नागरी उपक्रमांना आकार देणाऱ्या सर्वपक्षीय नागरी समितीची (किंवा मंडळाची) नुकतीच नियुक्ती झाली

First published on: 01-01-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshama sawant