राजकारणात वाचाळवीरांची कधीही कमतरता नव्हती, आजही असे अनेक वाचाळवीर प्रसिद्धीच्या झोतात रममाण आहेत. विरोधकांची दिशाभूल करण्यासाठी कधीकधी अशांचा उपयोग वा वापर होतोही, मात्र त्यांना आवर घालण्याची क्षमता नेतृत्वाकडे असावी लागते. विरोधकांतील वाचाळवीरांचे एकवेळ ठीक, पण सत्ताधारी भाजपमधील मंत्री, स्वामी, संत, साध्वी आदींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पक्षनेतृत्वाचा शहामृगी पवित्रा अनेक शक्यतांना वाव देतो..

‘रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे मनाने पूर्ण भारतीय नाहीत’ किंवा ‘मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी भारताच्या विरोधी भूमिका मांडल्याने त्यांची हकालपट्टी करावी’ – इति सुब्रमण्यम स्वामी.

‘शिक्षणाचे भगवीकरण देशाला फायद्याचेच ठरेल’ -केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर कथोडिया.

‘मुस्लीममुक्त भारत होणे गरजेचे’ -साध्वी प्राची.

‘मोदी सरकारने दिल्लीत आणीबाणी लागू केली आहे’ – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल.

गेल्या काही दिवसांतील विविध नेत्यांची ही बेताल वक्तव्ये. काही जणांना प्रसिद्धीची फार हौस असते. काहीतरी वादग्रस्त बोलल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हा समज आपल्याकडे दृढ झाला आहे. यातूनच देशात वाचाळवीरांच्या फौजाच तयार झाल्या आहेत. काहीही झाले की, त्यावर वादग्रस्त विधाने किंवा प्रतिक्रिया व्यक्त करायची. काही वेळा राजकीय नेत्यांकडून वाचाळवीरांचा वापर करून घेतला जातो. स्वपक्षीय किंवा विरोधी पक्षातील नेत्यांना योग्य संदेश देण्याकरिता अशा वाचाळवीरांचा चांगला उपयोग होतो. राजकीय वरदहस्त असल्यास अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंडळांनी जोरच चढतो.

अशा या वाचाळवीरांमध्ये अग्रणी आहेत ते भाजपचे नवनियुक्त खासदार सुब्रमण्यम स्वामी. जनसंघ, जनता पार्टी ते भाजप असा राजकीय प्रवास करणारे स्वामी यांची प्रतिमा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. आणीबाणीच्या काळात अटक वॉरन्ट असताना स्वामी यांनी संसदेत येऊन भाषण केले आणि सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देऊन पलायन केले. थेट अमेरिकेत जाऊन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. १९७७ आणि १९८० असे लागोपाठ दोनदा स्वामी ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. परखडपणे आणि वादग्रस्त मते मांडणे ही त्यांची प्रतिमा. गांधी घराण्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या स्वामी यांना राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपने त्यांचा राजकीय वापर सुरू केला. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात स्वामी यांच्यामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली. ‘ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर’ लाच प्रकरणात स्वामी यांनी सोनिया यांच्याबाबत संशयाचे वातावरण तयार केले. काँग्रेस किंवा त्यातून गांधी घराण्याच्या मागे स्वामी लागल्याने भाजप व संघ परिवारातील मंडळी भलतीच खूश होती. डोक्यात एकदा का प्रसिद्धीची हवा गेल्यावर त्याला किंवा तिला मग तो राजकारणी, अभिनेता किंवा अन्य कोणी असो, रोखणे फार कठीण असते. गांधी घराण्याला बचावात्मक भूमिका घ्यावी लावल्यावर स्वामी महाशयांचा मोर्चा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडे वळला. राजन यांच्यामुळे भारताचे नुकसान होत आहे वा त्यांना देशाशी काहीही देणेघेणे नाही वगैरे विधाने स्वामी यांनी सुरू केली. राजन यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यापर्यंत स्वामी यांची मजल गेली. वित्तमंत्री अरुण जेटली आणि राजन यांचे फार काही जिव्हाळ्याचे संबंध नाहीत, पण स्वामी आणि जेटली हे तर कट्टर विरोधक मानले जातात. अशा वेळीही स्वामी हे राजन यांना लक्ष्य करून त्यांच्या विश्वासार्हतेबाबत शंका घेऊ लागल्याने भाजप किंवा संघ परिवाराला राजन नकोसे झाले आहेत, असा अर्थ काढला जाऊ लागला. शेवटी राजन यांनी मुदतवाढ नको, असे जाहीर करून टाकले. राजन यांच्या विरोधातील मिशन यशस्वी होताच स्वामी यांनी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांना लक्ष्य केले. वित्त सचिवही त्यांच्या रडारवर आहेत. याच दरम्यान एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जेटली चीनमध्ये गेले असता विदेशात गेल्यावर मंत्र्यांनी भारतीय पद्धतीचा पेहराव करावा, अशी मागणी करून स्वामी यांनी आगीत आणखी तेल ओतले. एवढय़ावर थांबले तर ते स्वामी कसले. स्वामी यांनी वादग्रस्त विधाने करण्याचे टाळावे, असा सल्ला त्यांना पक्षाने दिला असता पक्षशिस्त पाळली नाही तर रक्ताचे पाट तर वाहणार नाहीत, असे उत्तर दिले. मर्यादा सोडून बोलू नये हा पक्षाचा सल्ला स्वामी गांभीर्याने घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. साधू, स्वामी, संत, साध्वी यांना महत्त्व देणाऱ्या भाजपला एक स्वामी भारी पडू लागला आहे. जेटली यांच्या विरोधात उघडउघड भूमिका घेणाऱ्या स्वामी यांना कोणाचा आशीर्वाद आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संघ परिवाराचा पाठिंबा असल्याशिवाय स्वामी यांची गाडी एवढी सुसाट पळणे कठीणच आहे. मोदी-शहा यांच्यापुढे भलेभले भाजपचे नेते शेपूट घालतात. अगदी बिहार पराभवानंतर अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांनी विरोधात सूर लावला तरी त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. तरीही स्वामी पक्षाचेच मंत्री जेटली यांना आव्हान कसे देऊ शकतात, असा राजधानीतील चर्चेचा विषय आहे. जेटली यांच्याकडून वित्त खाते काढून घेण्यासाठी स्वामी यांचा वापर केला जात आहे का, असाही शंकेचा सूर आहे. स्वामी यांना मोदी किंवा संघ परिवाराचा पाठिंबा असल्यानेच भाजपचे अन्य नेतेही गप्पच आहेत.

स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्याचे जाहीर केले आहे. स्वामी काय किंवा केजरीवाल, दोघेही वाचाळवीर. दिल्लीचे मुख्यमंत्रिपद असले तरी सातत्याने बेताल किंवा वादग्रस्त विधाने करीत प्रसिद्धीत राहण्यावर केजरीवाल यांचा भर असतो. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला आम आदमी पार्टीचे आव्हान असल्याने काँग्रेसलाही आपचा काटा काढायचा आहे. लाभाच्या पदावरून २१ आमदारांना अपात्र ठरविले जाण्याच्या शक्यतेने केजरीवाल संतापले आहेत. उद्या या २१ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाल्यास सर्व २१ जण पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे. पंजाब निवडणुकीच्या दरम्यान किंवा आधी या पोटनिवडणुका झाल्यास आपचे नुकसान होऊ शकते. यातूनच केजरीवाल दररोज भाजपच्या विरोधात वक्तव्ये करीत आहेत. यापुढे स्वामी आणि केजरीवाल यांच्यात शाब्दिक चकमकी उडू लागल्यास दिल्लीकरांचे मनोरंजनच होईल.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने सध्या वातावरण तापविण्यावर भर दिला आहे. पक्षाच्या अलाहाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कैरानामधील हिंदूचे स्थलांतर या मुद्दय़ाला स्पर्श करीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मतांच्या ध्रुवीकरणाला सुरुवात केली. साधू, संत, साध्वी अशी वाचाळवीरांची मोठी फौज भाजपकडे तयारच आहे. शिक्षणाचे भगवेकरण हा वादाचा मुद्दा आहे. रा. स्व. संघाच्या कार्यक्रम पत्रिकेवरील तो अग्रणी विषय आहे. शिक्षणाच्या भगवेकरणाला काँग्रेस, डावे पक्ष किंवा अन्य निधर्मवादी पक्ष किंवा संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असता शिक्षण खात्याची जबाबदारी असलेल्या कथोडिया या राज्यमंत्र्याने सरळसरळ भगवेकरणाचे समर्थन केले.

काँग्रेसमध्ये पूर्वी दिग्विजय सिंग हे वाचाळ नेते म्हणून ओळखले जायचे. कोणत्याही घटनेवर ते प्रतिक्रिया व्यक्त करायचे. पुढेपुढे सिंग यांच्या मतांना कोणी गांभीर्याने घेत नसे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी जवळपास निश्चित झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेखही अमेरिकन माध्यमांमध्ये वाचाळवीर असाच केला जातो. स्वामी काय किंवा केजरीवाल वा भाजपला अनुकूल भूमिका घेणारे साध्वी, साधू वगैरे यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यानेच हे सारे सुसाट सुटले आहेत. वास्तविक अशा या वाचाळवीरांना आवरण्याकरिता पक्षातून प्रयत्न अपेक्षित आहेत, पण राजकीय फायद्याकरिता पक्षाचे नेतेही अशा वाचाळ नेत्यांना मुक्त वाव देतात. दिग्विजय सिंग यांच्या वादग्रस्त विधानांचा कधी कधी काँग्रेसला फायदाच व्हायचा. दिग्विजय यांचे एखादे विधान अंगाशी आल्यास पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही हे सांगून पक्षाचे प्रवक्ते मोकळे व्हायचे. केजरीवाल हे स्वयंभू नेते आहेत. पक्षाचे प्रमुखच ते असल्याने त्यांच्यावर कोणाचाच  वचक वा अंकुश नाही. सुब्रमण्यम स्वामी यांना भाजपने अजून तरी मोकळीक दिली आहे. स्वामी, केजरीवाल, दिग्विजय सिंग अशी नेतेमंडळी किंवा विविध स्वामी, साध्वी, साधू यांना वेळीच आवरले नाही तर हेच डोईजड ठरू शकतात. साधू, संतांप्रमाणेच आपण वेगळे आहोत हा संदेश भाजपच्या स्वामी यांनी दिला आहे.