या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्यकर्त्यांच्या अंगात रग येण्यासाठी त्यांना शत्रू दाखवावा लागतो, तो स्पष्टपणे दाखवण्याचे काम भाजपच्या मेळाव्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना शत्रू क्रमांक एक मानणाऱ्या भाजपने शिवसेनेची साथ जाहीरपणे मागितली खरी; पण आक्रमक बाज कायम ठेवला..

कोणताही राजकीय पक्ष एखादा मेळावा घेतो तेव्हा केवळ आपल्या पक्षाच्या धोरणांची- सत्तेवर असल्यास सरकारच्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे इतका मर्यादित हेतू नसतो. तर एक स्पष्ट राजकीय संदेश देणे हेच त्याचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने पाहता भाजपच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, ६ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या महामेळाव्यात काही स्पष्ट राजकीय संदेश दिले गेले. पहिला संदेश भाजप नेत्यांच्या विधानांमधून दिला गेला तो म्हणजे ‘शत-प्रतिशत भाजप’ नव्हे, तर ‘मित्रपक्षांसह युतीचे सरकार’ हेच २०१९ साठी भाजपचे धोरण आहे. दुसरा संदेश या महामेळाव्यासाठी जमवलेल्या कार्यकर्त्यांच्या विराट गर्दीतून दिला गेला तो म्हणजे आमची युतीची इच्छा असली तरी शिवसेनेने स्वबळाचा निर्धार कायम ठेवल्यास या राज्यव्यापी ताकदीशी शिवसेनेला झुंजावे लागेल. आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याशिवाय लढण्यास आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे आपल्यात लढून सत्ता जाण्याचा धोका पत्करायचा की दोघांनी मिळून काँग्रेस-राष्ट्रवादीशी दोन हात करत सत्ता राखण्याचा प्रयत्न करायचा याचा निर्णय घेताना, शिवसेनेला युती करणे अधिक हिताचे वाटावे हेच भाजपच्या महामेळाव्यात विराटदर्शन घडवण्यामागचे उद्दिष्ट होते.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातही भाजप एकाकी पडत चालल्याचे चित्र आहे. गेली चार वर्षे केंद्रात सत्तासाथ देणारे चंद्राबाबू नायडू भाजपला सोडून गेले, तर महाराष्ट्रातील शिवसेनेने सत्ता न सोडता आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मित्रपक्ष दुरावत असताना समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष, ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस हे सारे एकवटत आहेत. अद्याप त्यास ठोस राजकीय आघाडीचे स्वरूप आले नसले तरी विरोधक एकत्र येणे हे कोणत्याही सत्ताधारी पक्षासाठी चिंतेचीच बाब ठरते. आता तर २०१४ सारखी मोदी लाट असे वातावरण उरलेले नाही. उलट सत्तेविरोधातील जनतेच्या रोषाचा (अँटी इनकम्बन्सी) सामना करून त्यांना पाच वर्षांचा हिशेब द्यायचा आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी त्यांच्या पारंपरिक जातीय मतपेढय़ांची जुळवाजुळव सुरू केल्याने मतदानावर परिणाम करणाऱ्या या कळीच्या मुद्दय़ावर उतारा शोधावा लागणार आहे. राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेतून सत्ताधारीविरोधातील वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एकटय़ाच्या जिवावर केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवता येईल, हा आत्मविश्वास आता भाजपकडे उरलेला नाही. या गोष्टींचे आणि त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या वातावरणाचे सावट भाजपच्या महामेळाव्यावर होते. साहजिकच ही संधी निर्णायक राजकीय भूमिका घेण्यासाठी व त्याबाबतचा संदेश देण्यासाठी भाजपने वापरली. शत-प्रतिशतची भाषा गुंडाळून ठेवण्यात आली आणि शिवसेनेसह निवडणूकपूर्व युती व्हावी ही भाजपची हार्दिक इच्छा आहे व केंद्रात रालोआचे, तर राज्यात युतीचे सरकार आले पाहिजे, अशी विधाने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजप-शिवसेना मैत्रिपर्वाचे पुरस्कर्ते अशी काही अमित शहा यांची ओळख नाही. त्यामुळे शहा यांनी युतीचे विधान केल्याने भाजप हा युतीसाठी खरेच इच्छुक आहे, हे स्पष्ट झाले; पण त्याच वेळी युती करायची आमची इच्छा आहे, पण नाही झाली तर आम्ही समर्थ आहोत, असाच संदेश शहा यांनी देहबोलीतून आणि स्वरातून दिला. एकंदरच तुमच्यासह किंवा तुमच्याशिवाय असाच त्यांचा नूर होता. तर शिवसेनेशी युती करण्याचे खंदे पुरस्कर्ते अशी ओळख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यातील भाषणात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख करताना भाजपच्या साथीने महाराष्ट्र धर्म जागवणारे हिंदुहृदयसम्राट असा गौरव केला. शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप कसा आसुसलेला आहे हेच त्यातून दिसून आले. मात्र त्यानंतरही शिवसेनेची स्वबळाची भाषा कायम आहे. स्वबळावर सत्ता येणार नाही याची जाणीव झाल्यानेच भाजपला आता मित्रपक्षांचा पुळका आल्याचे विधान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. सध्या मुंबईबाहेर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच ते विधान देसाई यांनी केले असणार. तरीही हेच शिवसेनेचे अंतिम धोरण राहील असे आताच सांगता येणार नाही. निवडणुकीत युती अधिक हिताची की स्वतंत्र लढणे अधिक हिताचे याचा हिशेब मांडूनच राजकीयदृष्टय़ा व्यावहारिक असा निर्णय ठाकरे घेतील.

त्यासाठीच युतीची इच्छा व्यक्त करताना कोणत्याही राजकीय पक्षाने बाळगावीच अशा सावधगिरीने, प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवणारे शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. ‘एक बूथ २५ यूथ’ अशी तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील एकूण जवळपास ९२ हजार मतदान केंद्रांपैकी ८० हजार मतदान केंद्रांवर अशी तयारी भाजपने केली आहे. युती न केल्यास शिवसेनेला काय उपद्रव होऊ  शकतो याचाच तो अप्रत्यक्ष संदेश आहे. त्यामुळे आता युतीसाठी शिवसेनेची मनधरणी व त्याच वेळी आपल्या पक्षाच्या निवडणूक यंत्रणेची पायाभरणी करण्यास भाजपने सुरुवात केल्याचे या मेळाव्यातून दिसून आले.

ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्र सरकारच्या प्रचाराचे एकखांबी तंबू आहेत; त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भाजपच्या प्रचाराचा एकखांबी तंबू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हेही त्यांच्या आक्रमक व आवेशपूर्ण भाषणातून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आधी नेत्यांनी चांगली भाषणे केली, पण कार्यकर्त्यांच्या अंगात जोश येईल असे वातावरण नव्हते. फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच हाकारा घातला. काँग्रेस-राष्ट्रवादीला व देशातील इतर विरोधकांना सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आलेल्या ‘लांडग्यांच्या टोळी’ची उपमा दिली. त्यांची भाषा प्रचंड आक्रमक असली तरी त्यामुळेच मेळाव्यातील वातावरण जिवंत झाले. कार्यकर्ते उत्साहात येऊन जोरदार प्रतिसाद देत होते. शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्यानंतर फडणवीस हे शरद पवार यांच्यासह एकाच व्यासपीठावर येणे टाळत आहेत. जळगावमधील कार्यक्रमाला मारलेली दांडी हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचे सांगण्यात येते. आपल्या सरकारच्या व सर्वोच्च नेते मोदी यांच्याविरोधात काम करणाऱ्या पवार यांच्यासमोर आपण महाराष्ट्रातच आव्हान उभे करणार. प्रसंगी त्यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अत्यंत आक्रमक पावले उचलायची वेळ आलीच तर मागेपुढे पाहणार नाही, असे फडणवीस आपल्या भाषणातून ठसवीत होते. मेळाव्याच्या दोन दिवस आधीच नागपूर खंडपीठामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी दोन एसआयटी नेमल्याची माहिती दिली होती. तसेच मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांच्या शेजारच्या दोन कोठडय़ा रिकाम्या असल्याचे उद्गार काढत सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार व सुनील तटकरे यांना नाव न घेता इशारा दिला. आपला शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार हे आहेत व त्यांच्याशी मवाळपणे वागणार नाही तर शिंगावर घेऊ , हेच सूचकपणे सांगून फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी मैत्रीच्या साडेतीन वर्षांपूर्वीच्या गावगप्पांना अखेरचा पूर्णविराम दिला. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे वगैरे ठीक; पण कार्यकर्त्यांच्या अंगात रग येण्यासाठी त्यांना शत्रू दाखवावा लागतो. तो स्पष्टपणे दाखवण्याचे काम फडणवीस यांच्या भाषणाने केले. फडणवीस यांचे वैयक्तिक राजकीय कौशल्य यातून दिसून आले; पण त्याचबरोबर ते एकटेच आक्रमक लढवय्ये आहेत असे चित्र दिसल्याने ती भाजपसाठी पक्ष म्हणून एक मर्यादाही आहे. गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र सभास्थानी नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले, तेव्हा हे प्रकर्षांने लक्षात आले. फडणवीस यांना आपल्यासह निवडक सहकाऱ्यांचा एक संघ उभा करावा लागेल याची गरजही त्यातून अधोरेखित झाली आहे. फडणवीस यांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. कारण सर्वच प्रश्नांशी ते एकटेच लढू शकणार नाहीत.

swapnasaurabha.kulshreshtha@expressindia.com

मराठीतील सर्व लाल किल्ला बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mumbai meet maharashtra government shiv sena congress ncp
First published on: 10-04-2018 at 02:53 IST