भारताच्या आदिवासी किंवा दुष्काळी प्रदेशांत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. संधी मिळाली तर तिचे ते सोने करतात. केरळच्या अविकसित प्रदेशातून जन्मलेली पायोली एक्स्प्रेस पी. टी. उषा, सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ख्याती मिळविलेली कविता राऊत या धावपटूंचा वारसा पुढे नेण्याची क्षमता महाराष्ट्राच्या ललिता बाबर हिच्याकडे आहे. सातारा जिल्हय़ातील माण परिसरात असलेल्या मोही या छोटय़ाशा खेडेगावात जन्म झालेली ललिता ही जागतिक स्तरावर उषा व कविता यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेली खेळाडू आहे. शेतमजूर कुटुंबातील या खेळाडूने जिल्हा स्तरावरील शालेय मैदानी स्पर्धामध्ये मध्यम व लांब अंतराच्या शर्यतींमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले. त्यानंतर तिने राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला. तिची ही कामगिरी व तिच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल यश मिळविण्याची असलेली क्षमता या दोन्ही गोष्टी रेल्वे क्रीडा मंडळाच्या अ‍ॅथलेटिक्स संघटकांनी हेरल्या. त्यांनी तिला नोकरीची संधी दिली. अ‍ॅथलेटिक्समध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द साकारण्यासाठी तितक्याच दर्जाचे बूट, अन्य किट तसेच पोषक आहार, फिजिओ, पूरक व्यायामाच्या सुविधांचीही गरज असते. रेल्वेत खेळाडू म्हणून नोकरी मिळाल्यानंतर ललिता हिच्या या समस्या दूर झाल्या. तिला पूर्णपणे आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करता आले. गेली चार वर्षे ललिता हिने भारतामधील अनेक मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉन, १० हजार मीटर, ५ हजार मीटर धावणे आदी विविध लांब अंतराच्या शर्यतींमध्ये अव्वल कामगिरी केली आहे. मुंबई मॅरेथॉन शर्यतीत तिने लागोपाठ तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे. स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात ललिता हिने गतवर्षी दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत आपण स्टीपलचेसमध्येही चांगली कामगिरी करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन शर्यतीत तिची विजेतेपदाची मालिका ओ. पी. जैशा या युवा खेळाडूने खंडित केली. मात्र या शर्यतीमधील रौप्यपदकाबरोबरच तिने जागतिक मैदानी स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले आहे. यंदाची जागतिक स्पर्धा २०१६ मध्ये रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळेच जागतिक स्पर्धा तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेत तिने पदक मिळवीत ऑलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित करावा, अशीच तिच्याकडून चाहत्यांची अपेक्षा आहे.