श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘वासना मारणे कठीण आहे. वासनेत आपला जन्म आहे. ती मारणे म्हणजे स्वत: मरणे आहे. ते कोण पत्करील?’’ अंतरंगातला प्रपंच सोडणं म्हणजे ही वासना मारणंच आहे. ज्या वासनेतून ‘मी’पणा फोफावला, लाडावला, सुखावला, आश्वासिला, जपला जातो ती वासना मारणं म्हणजे ‘मी’च नष्ट होणं आहे. ते कुणाला हवंय? आपल्याला पारमार्थिक यशही हवं आहे ते ‘मी’सकटच! आपल्याला भगवंताचा साक्षात्कार हवा आहे पण नंतर ‘मला’ साक्षात्कार झाला, हे सांगायचीही ओढ आहे. ‘मी’ नष्ट झाल्यावर साक्षात्कार होईल, या वाक्यानं म्हणूनच आपल्याला हुरूप येत नाही. ‘मी’च उरलो नाही तर साक्षात्काराचा तरी काय उपयोग, असं आपण मानतो. आपली ही मनोधारणा आणि प्रपंचाची ओढ लक्षात घेऊनच श्रीमहाराज भगवंताच्या आधारानं प्रपंच सुखाचा करा, असे सांगत खुबीनं प्रपंचात अडकलेलं माझं चित्त भगवंताकडे वळवायला शिकवतात. देह आणि मन मिळून माणूस बनतो, त्यामुळे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही त्यानं साधलं पाहिजे, अशी महाराजांची शिकवण आहे. ते ऐहिक धुडकावत नाहीत पण याचा अर्थ ते समसमान साधायला सांगत नाहीत. मला रोज चहा आणि जेवण लागतंच, असं आपण म्हणतो तेव्हा जेवढं जेवतो तेवढा चहा काही आपण पीत नाही. तेव्हा प्रपंचही हवा आणि परमार्थ तर हवाच. पण प्रपंच भाकरीतल्या मिठाइतपत हवा, असं श्रीमहाराजांचं सांगणं आहे. आपण मिठाचीच भाकरी करतो आणि ती खारट लागते, तो खारटपणा कमी करा, म्हणून भगवंताला आळवत राहातो! त्यामुळे प्रपंचात रुतलेल्या मला परमार्थाकडे वळविण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी श्रीमहाराज प्रपंचाबाबत चुचकारत मुख्य ध्येयाकडे ध्यान आकर्षित करू पाहतात. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘प्रपंच व परमार्थ वेगळे वाटतात पण ते तसे नाहीत. ते रुपयाच्या दोन बाजू आहेत. सुखी जीवनाकरता दोन्ही आवश्यक आहेत.’’ (बोधवचने, अनु. ३४०) मग ते प्रपंच आणि परमार्थ यांच्या स्वरूपाकडे संकेत करतात. ते म्हणतात, ‘‘परमार्थ ही वृत्ती आहे. प्रपंच ही कृती आहे. दोन्हीचा संयोग झाला की दोनपणा उरत नाही, एकपणा येतो. तेथे आनंद असतो.’’ (बोधवचने, अनु. ३४१) ‘‘वृत्ती बनविणे म्हणजे परमार्थ, बाकीच्या गोष्टी प्रारब्धाने होतील.’’ (बोधवचने, अनु. ३४२) ही तिन्ही वाक्ये एकापाठोपाठ आहेत आणि त्या प्रवाहातून एकाच गोष्टीकडे स्पष्ट संकेत आहे. ही वाक्ये योगायोगानं एकापाठोपाठ आलेली नाहीत. त्यात एक अदृश्य असा क्रम आहे. तो क्रम कोणता, हे पाहतानाच आणखी एक वाक्य लक्षात ठेवू. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘वासनेने युक्त परमार्थ म्हणजे प्रपंचच, तर वासनारहित प्रपंचसुद्धा परमार्थच होय.’’ हे वाक्य वरील वाक्यांचा अंतप्रवाह उकलते आणि श्रीमहाराजांच्या बोधाची बैठकही सूचित करते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
९.प्रपंच आणि परमार्थ
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘वासना मारणे कठीण आहे. वासनेत आपला जन्म आहे. ती मारणे म्हणजे स्वत: मरणे आहे. ते कोण पत्करील?’’ अंतरंगातला प्रपंच सोडणं म्हणजे ही वासना मारणंच आहे. ज्या वासनेतून ‘मी’पणा फोफावला, लाडावला, सुखावला, आश्वासिला, जपला जातो ती वासना मारणं म्हणजे ‘मी’च नष्ट होणं आहे.
First published on: 11-01-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Living with family and theology