मुंबईचे माजी (निलंबित) पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे सध्या ‘बेपत्ता’ आहेत आणि तपास यंत्रणांना सापडून येत नाहीत. त्यांनी माजी (राजीनामा दिलेले) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हप्तावसुलीचे बेछूट आरोप केले होते. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे आठ पानी पत्र लिहिले होते ते सोडल्यास त्यांच्याकडे ‘याबाबत इतर कोणतेही पुरावे नाहीत’ असे शपथपत्र त्यांनी निवृत्त न्या. कैलाश चांदीवाल यांच्या चौकशी आयोगापुढे सादर केलेले आहे. (बातमी : लोकसत्ता- ४ नोव्हेंबर).

 याबाबत काही कायदेशीर आणि इतर प्रश्न निर्माण होतात, ते असे : (१) न्यायालय किंवा चौकशी आयोगापुढे दाखल केलेले शपथपत्र हे कोर्टाच्या अधीक्षकांपुढे किंवा नोटरी पब्लिक या सरकारनियुक्त शपथ अधिकाऱ्यापुढे स्वत: हजर राहून शपथेवर साक्षांकित करावे लागते. त्यानंतर साक्षीदार म्हणून हजर राहून त्या शपथपत्राची पुष्टी करावी लागते. तसेच विरुद्ध बाजूच्या वकिलांना उलटतपासणी घेण्याचाही अधिकार आहेच. त्यानंतरच असे शपथपत्र पुरावा म्हणून नोंदले जाऊ शकते. (२) सदर शपथपत्र कोणत्या कायदा अधिकाऱ्यांसमोर साक्षांकित केलेले आहे? (३) त्यावरून परमबीर सिंह या फरार आरोपीचा माग शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी काय प्रयत्न केले? (४) नसल्यास एका तरी सुबुद्ध पत्रकाराने तपास यंत्रणांना याबाबत काही प्रश्न विचारले आहेत का? विचारले असल्यास तपास यंत्रणांनी काय उत्तर दिले? (६) चौकशी आयोगाने याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत का?

या प्रश्नांची योग्य तड लावणे गरजेचे असून त्यामुळे या आरोपीला पकडणे शक्य होईल आणि आरोपातील हवा पूर्णपणे निघून जाईल. महाराष्ट्र सरकारने या मुद्द्यांची योग्य दखल घेणे गरजेचे आहे. – अ‍ॅड. संदीप ताम्हनकर, पुणे

अशा कारवाईनंतर, पुढे काय होते?

‘केंद्रीय कारवायांचे सत्र’ ही बातमी (लोकसत्ता- ३ नोव्हेंबर) वाचली. अनिल देशमुख यांना ‘ईडी’ कोठडी, अजित पवार कुटुंबीयांच्या मालमत्तांवर टाच, अजोय मेहता यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाची कारवाई… अशा बातम्या वाचून मध्यमवर्गीय माणसे प्रथमत: खूश होतात, पण कालांतराने हा प्रकार म्हणजे एक राजकीय स्टंट होता हे नेहमीच जाणवते! अशा प्रकारच्या कारवाईनंतर एखादा सर्वसामान्य माणूस हादरून जाईल; परंतु राजकारणी मात्र आपल्या अशा प्रसिद्धीचे चाहते असतात! पुढे जाऊन त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतर सरकारदरबारी छानसे मलईदार मंत्रिपद मिळण्याची शक्यताही वाढते!  – प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>

दृश्यवैभवाला ‘गूगल’-ठिगळे!

‘दीपावलीचे दृश्यवैभव!’  हे संपादकीय (४ नोव्हें.) वाचले. दीनानाथ दलाल, वसंत सरवटे, शि.द.फडणीस, यांबरोबरच सुभाष अवचट, आजकालचे रविमुकुल वगैरे चित्रकारांच्या चित्रांनी दिवाळी अंकाच्या आकर्षकतेविषयी व साहित्यिक सौष्ठवाविषयी अटकळ बांधली जायची. पण हल्ली वेळेचे आणि आर्थिक गणित जुळवताना ‘गूगल गुरुजीं’चा उपयोग दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठापासूनच केलेला दिसून येऊ लागला आहे.

दिवाळी अंकातील कथा/ लेख/ कविता यांच्या आशयाशी मिळतेजुळते इंग्रजाळलेलं चित्र सापडले तरी ते त्या साहित्याबरोबरच नव्हे तर मुखपृष्ठावरही डकवून टाकायचा सोपा मार्ग हल्ली काही अंकांत चोखाळलेला दिसतो. ‘लोकसत्ता’ संपादकीयातील अपेक्षित सौंदर्यभान, सन्माननीय व दर्जाचे सातत्य राखणारे अपवाद वगळता काही दिवाळी अंकातून, नको तो भाग कातून नव्हे, तर अख्खी चित्रंच कुठूनतरी कातून डकवण्याची नको ती पद्धत रूढ होत चालली आहे! तिला आवर घालायला हवा असे वाटते.  – श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

जिव्हाळा आणि जाणकारी

‘लोकसत्ता’च्या दीपावली- विशेष संपादकीयांच्या मालिकेतील ‘दीपावलीचे दृश्यवैभव’ (४ नोव्हेंबर) वाचले. एक म्हणजे आज वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना या अग्रलेखाने पुन:प्रत्ययाचा आनंद दिला आहे आणि दुसरे, अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे दीनानाथ दलालांपासून ते र. कृ. जोशी, प्रभाकर बरवे, वसंत सरवटे, जॉन फर्नांडिस, के.बी. कुलकर्णी, बाळ ठाकूर, गोपाळराव देऊसकर यांच्यासारख्या मराठी दिवाळी अंकांचे दृश्यवैभव समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या थोर चित्रकारांची अतिशय जिव्हाळ्याने आणि जाणकारीने आठवण काढली आहे.  – मृदुला प्रभुराम जोशी, मुंबई

वैद्यकशाखांतील आदानप्रदान संशोधनाधारित हवे

‘आरोग्य विद्यापीठात आंतरविद्याशाखा संशोधनावर भर : कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन’ वृत्त (लोकसत्ता – २ नोव्हेंबर) वाचले.  नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी नुकताच स्वीकारला आहे. त्यांचे हे मत स्वागतार्हच आहे. परंतु काही मुद्दे मांडावेसे वाटतात. आपल्याकडे अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नेचरोपॅथी या स्वतंत्र विद्याशाखा असून त्यांच्यात ज्ञानाचे आदानप्रदान होताना दिसत नाही. वस्तुत: रुग्ण बरे करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून सर्वसमावेशक उपचारपद्धती विकसित करण्याची गरज आहे. अलीकडील करोना विषाणू महासाथीच्या पार्श्वभूमीवर याची गरज अधिकच अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि विद्यापीठाला संलग्न असलेली  राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये यात आंतरविद्याशाखा संशोधनावर भर दिल्यास हे होऊ शकेल.जैवतंत्रज्ञान, जैवमाहिती तंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, जैवभौतिकशास्त्र, जैववैद्यकीय अभियांत्रिकी अशा नवनवीन विद्याशाखा उदयाला आल्या असून या विद्याशाखा अध्यापन, संशोधनाद्वारे विकसित करणे हे कार्य नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे होऊ शकेल. त्यासाठी विद्यापीठाने राज्यस्तरावरील तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषध उत्पादन कंपन्यांसमवेत संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत. त्यासाठी विद्यापीठाचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ बनवावे आणि विद्यापीठाच्या अल्प, मध्यम, दीर्घ पल्ल्याच्या कामकाजाची दिशा निश्चित करावी. – डॉ. वि. हे. इनामदार, पुणे

loksatta@expressindia.com