रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांनी सर्व बँकांना ताळेबंद साफ करण्यास मुदतवाढ देणार नाही, असे सांगितल्याची बातमी (३० जाने.) वाचली. बँकांना हजारो कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाची वसुली करण्याचे अशक्यप्राय आव्हान पेलवणारे नाही. कर्जे देताना अनेक प्रकारचे दबाव.. सरकारी, राजकीय, जातीय, धार्मिक असतात. शिवाय काही बँक अधिकारीपण आपला स्वार्थ साधून घेतात. खासगी बँकासुद्धा बुडीत कर्जाच्या समस्येतून सुटल्या नाहीत. कर्जवसुलीसाठी लवाद निर्माण केले, कर्जवसुली शाखा निर्माण केल्या, वसुलीसाठी एजंट नियुक्त केले, सगळा खर्च केला, पण हाती काही आले नाही आणि येणारपण नाही. बँकांचे विलीनीकरण हासुद्धा कर्जवसुलीस मदत करणारा उपाय नाही. आपल्याकडील कायदेही वसुलीला पोषक नाहीत. ते कर्जबुडव्यांनाच मदत करतात.
सरकार असे समजते की, दिलेली कर्जे परत येणारच. इतका खुळचट विचार असणारी माणसेच बँकांचे हितशत्रू असतात. शिवाय बँका बिगरबँक धंदा, जसे पेन्शन, विमा विक्री, सरकारी कर गोळा करणे, मुद्रांक विकणे/ गोळा करणे, लेखकांची पुस्तके विकणे वगरे कामे करतात. मग वसुलीसाठी वेळ कधी काढणार? ‘हम होंगे कामयाब एक दिन’ म्हणजे फारच दूर भविष्यामध्ये कधी तरी, असेच कर्जवसुलीचे झाले आहे.
– सुधीर केशव भावे, जोगेश्वरी (मुंबई).

मनाई करूच नका!
‘भेदण्या शनिमंडला..’ हा दिनेश गुणे यांचा लेख (रविवार विशेष, ३१ जाने.) वाचला. एक अत्यंत साधा वाटणारा, पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा शनििशगणापूरबाबतच्या वादात सांगावासा वाटतो. कोणत्याही गोष्टीला मनाई केली की, ती करण्याची माणसांची सहज प्रतिक्रिया उसळून वर येते, हे शिक्षणशास्त्रात सांगितलेले सर्वाना माहीत असलेले आणि अनुभवयाला येणारे तत्त्व आहे. महिलांना प्रवेशबंदी म्हटल्यावर नास्तिक, पुरोगामी वगरे लोकांनाही त्यात अन्यायाच्या वेगवेगळ्या छटा दिसू लागल्या आणि मुख्य म्हणजे चळवळ उभारण्याची शक्यता लक्षात आली. मंदिराच्या व्यवस्थापकांनीदेखील ताणून धरल्याने शासनाला महिलांच्या बाजूने उभे राहून आपली पुरोगामी वगरे प्रतिमा निर्माण करता आली. कालांतराने मंदिराच्या व्यवस्थापनात शिरकाव करून तिजोरीच्या किल्ल्या कनवटीला लावण्याची शक्यतादेखील दूरदृष्टीच्या नेत्यांच्या लक्षात आली असणार. मनाई उठविण्याबाबत इतिहास काय सांगतो पाहा. पूर्वीप्रमाणे आता वेदांचा अभ्यास करण्यावर बंधने राहिली नाहीत, पण किती लोक वेदांचा अभ्यास करताना दिसतात? तसेच या चळवळीला यश आल्यावर शनीच्या चौथऱ्यावर आरोहण करण्यात विशेष काही साध्य केल्याचे श्रेय उरणार नाही!
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)
मुंबईची बग्गी विसरणे अशक्य
‘घोडय़ांचा मार्ग बिकट’ हे शनिवारचे संपादकीय (३० जाने.) वाचले. येत्या सहा महिन्यांच्या काळात बग्गी, टांगा, घोडागाडी इतिहासजमा होईल व येणाऱ्या पिढीला चित्रातून ती दाखवावी लागेल. खरेच अत्यंत देखण्या अशा घोडा या प्राण्याची भुरळ पडली नाही असा माणूसच विरळा. ऐतिहासिक लढायांमधून घोडय़ाने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. लढायांमध्ये तर घोडय़ांशिवाय पर्याय नव्हता. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडय़ांच्या चपळतेच्या गुणाचा विचार करून उत्तम अशा घोडदळाची उभारणी केली होती. असा हा दिमाखदार घोडा िहदी चित्रपटातूनही ऐटीत वावरला. विशेषत: ५० ते ६० च्या दशकात एकापेक्षा एक सरस आणि सदाबहार गाणी घोडागाडीवर चित्रित झाली होती. ‘यूं तो हमने लाख हंसी देखे हैं’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले’, ‘पिया पिया मेरा जिया पुकारे’, ‘जरा हौले हौले चलो मोरे साजना..’ ही काही उदाहरणे. पन्नास-साठ वर्षांनंतर आजही ही ‘टमटम’ची गाणी लोकांच्या मनात रुंजी घालत आहेत. बदललेल्या काळात घोडय़ाची उपयुक्तता कमी झाली हे खरेच आहे आणि प्राणिमित्र संघटनांनी त्यांच्या बचावासाठी घेतलेली भूमिकाही योग्यच आहे; पण मुंबईतील घोडय़ांचे, घोडागाडीचे अस्तित्व नष्ट होणार असल्यामुळे त्याची रुखरुख प्रत्येक अश्वप्रेमीला नेहमीच वाटत राहील यात शंका नाही.
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)
हा देशद्रोह मानायला हवा
‘आपण हिंदू आहोत, हे सार्वजनिकरीत्या म्हणण्याची आपल्याला भीती वाटते’ हे अभिनेते अनुपम खेर यांचे वक्तव्य (३१ जाने.) वाचले. असे वक्तव्य करून हा देश असहिष्णू बनत चालला आहे या आरोपाला आपण अप्रत्यक्ष पुष्टीच देत आहोत हे त्यांच्या ध्यानात आलेले नाही. असुरक्षित मुस्लिमांना वाटो किंवा िहदूंना वाटो, तो असहिष्णुतेचाच परिपाक मानायला हवा. तरीही ते वरील वक्तव्य करतात याचाच त्यांच्या दृष्टीने अर्थ असा की, हिंदुत्ववाद्यांच्या आक्रमक कृत्यांकडे अंगुलिनिर्देश करून देश असहिष्णू झाल्याचा आरोप करणे गर, मात्र िहदूंबाबत हा देश असहिष्णू बनत चालला आहे असे म्हणणे मात्र वस्तुस्थिती निदर्शक. दुसरे म्हणजे, गर-िहदूंनी विशेषत: मुस्लिमांनी ‘नवीन सरकार आल्यापासून देशात जे काही वातावरण बनले आहे त्याने आम्हाला देशात असुरक्षित वाटू लागले आहे’ अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे तो देशद्रोह असेल, तर त्याच न्यायाने ‘िहदू म्हणून मला असुरक्षित वाटू लागले आहे’ ही प्रतिक्रियाही देशद्रोह मानायला हवा. पण अशा प्रकारच्या वैचारिक भ्रष्टाचाराला राजकारण्यांबरोबर या देशातील विचारवंतही तितकेच, किंबहुना जनमत घडवणारे म्हणून अधिक जबाबदार आहेत. या विचारवंतांनी स्वत:ला विशिष्ट विचाराच्या कप्प्यात बंदिस्त करून घेतले. यामुळेच गोध्रा िहसाचार आणि गुजरात दंगलीदरम्यानचा िहसाचार तसेच काश्मिरी पंडितांची ससेहोलपट आणि दादरी प्रकरण अशा वेळी या विचारवंतांच्या संवेदना समानरीत्या आणि समान पातळीवर जागृत न होता त्या वैचारिक बांधिलकीनुसार आणि सोयीनुसारच जागृत होतात.
– अनिल मुसळे, ठाणे</strong>
रंगत जाणारा ‘व्यापार’ आठवला..
‘खेळामागील अभिकल्पाचे घटक’ हा लेख (३० जाने.) वाचताना साठ ते सत्तरच्या दशकांतील ‘व्यापार’ या खेळाची आठवण झाली. हा खेळ गुजराती मंडळींनी प्रचारात आणला असावा. मुंबईमध्ये तो फारच प्रचलित होता. गुजराती, इंग्रजी किंवा मराठीत छापलेले त्याचे पट मिळायचे. किमान दोन अन् कमाल चार भिडू हा खेळ आरामात खेळत. पाचवा भिडू ‘बँक’ बनायचा. तो नसला तर कुणी तरी शहाणा ‘बँक’ बनून खजिना सांभाळायचा. बुद्धिबळासारख्या असलेल्या पटावर चारही कोपऱ्यावर छोटय़ा छोटय़ा कप्प्यांमध्ये माटुंगा, भायखळा, चिराबाजार अशी बरीच उपनगरांची नावं छापलेली असत. त्याच शीर्षकाची कार्ड्स असत. ते बँकेकडून खरेदीदाराला पसे भरल्यावर विकत मिळत. याशिवाय एका कोपऱ्यात ‘तुरुंग’ आणि काही हॉटेलं व धर्मशाळांची ‘घरं’ असायची. खेळाला सुरुवात करण्याआधी ‘चलन वाटप’ व्हायचे. म्हणजे खेळासह आलेल्या दहा, पाच, एक हजार, तसंच पाचशे, शंभर व पन्नासच्या खोटय़ा ‘नोटा’ सर्वाना समान अशा वाटल्या जायच्या. सगळ्यांनी भांडवल दिलं की बँक रीतसर स्थापन होऊन तिचं कामकाज सुरू व्हायचं. प्रत्येकाला एक सोंगटी मिळायची. जितकं ‘दान’ पडेल त्यानुसार ती पुढे सरकायची. पहिल्या फेरीत नशिबानुसार उपरोक्त ‘जागा’ किंवा ‘घरं’ विकत घेता येत. सोंगटी हॉटेलात गेली तर भाडं भरावं लागायचं. एखाद्याला दंड वा तुरुंगवास घडायचा. सगळ्या रकमा बँकेत जमा होत असत. दुसऱ्या फेरीपासून ‘उत्पन्न’ मिळू लागायचं. ‘जागा मालका’ला भाडं मिळायचं. कर भरावे लागत. जागा खरेदी-विक्रीचे दर कार्डावर छापलेले असत. एखाद्याकडे जास्त पसा झाला तर तो इतरांच्या जागा लिलाव वा कार्डानुसार खरेदी करायचा. खेळात कुणी तरी दिवाळखोरीत निघायचा. तो बाद व्हायचा. कधी बँकसुद्धा अवसायानात निघायची! दिवाळखोरीत निघलेल्या भिडूला कर्ज देऊन वाचवायचा प्रयत्न सर्वानुमते केला जायचा. असा हा सुंदर, सुरम्य, अद्भुत खेळ तासन्तास रंगत जायचा.
– विजय काचरे, पुणे</strong>
ही गोरगरिबांची चेष्टाच
विविध विभाग ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आले असून अधिकारी तसेच कर्मचारी प्रशिक्षित झाले आहेत. असे असताना वित्तमंत्र्यांच्या कार्यालयाने तीन सल्लागारांची नेमणूक केली. दुष्काळ निवारणासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, नोकरभरतीपासून अनेक योजनांना कात्री लावली जाते. धान्ये, भाजीपाला व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग झाल्याने सामान्य नागरिक रडकुंडीला आला आहे. अशी परिस्थिती असताना एक मंत्री आपल्या निकटवर्तीयांसाठी गरज नसताना दरमहा चार ते पाच लाख रुपये सरकारी तिजोरीतून उधळतो. ही गोरगरिबांची चेष्टाच वाटते.
– अमोल करकरे, पनवेल
धोरण चांगले, अंमलबजावणीचे काय?
शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन सौर ऊर्जा धोरणाप्रमाणे नवीन इमारतींच्या गच्चीवर सौर ऊर्जा संयंत्र बसविण्याची सक्ती केली जाणार आहे. अशीच सक्ती प्रत्येक नवीन इमारतीवर रेन वॉटर हार्वेिस्टगची सोय करण्याबद्दल २००२ पासून आहे. पण ते न करताही सर्व इमारतींना भोगवटा पत्र व पूर्णत्वाचा दाखला मिळतो. तसाच प्रकार या सौर ऊर्जा उपकरणाबद्दल होईल, असे वाटते. धोरणे वा योजना चांगली असली तरी त्याच्या अंमलबजावणीचे काय, हा प्रश्न उरतोच. तेव्हा जे स्वखुशीने असे यंत्र बसवतील त्यांनाच ते द्यावे. याबाबतीत सर्वजण कसे तयार होतील यासाठी उपाय योजावे लागतील.
– वि. म. मराठे, सांगली