राफेल कराराच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी मोदी सरकारवर जे शरसंधान केले त्याचा सार्थ उल्लेख ‘मिठीत तुझिया..’ (२४ जुलै) या संपादकीयात आहे. राहुल यांनी जे शरसंधान केले त्यातील मुद्दा हा या विमानांच्या किमतीचा होता, तसेच विमाननिर्मितीच्या क्षेत्राचा जराही अनुभव नसलेल्या उद्योगपतीला ही विमाने तयार करण्याचे जे कंत्राट देण्यात आले आहे त्याविषयी होता. परंतु त्याचे प्रामाणिक उत्तर सरकार देऊ शकत नसल्याने सरकारने दोन देशांमधील ‘गुप्तता करारा’मागे लपण्याचा प्रयत्न चालविला आहे. बोफोर्स तोफांच्या खरेदीवरून जे वादळ निर्माण झाले त्या वेळी राणाभीमदेवी थाटात भाजपच नव्हता का बोलत? मग आता हाच पक्ष गप्प का?

त्यातही राफेलच्या मुद्दय़ावरून राहुल गांधींनी तोफ डागल्यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचे आक्रस्ताळे हावभाव तर निश्चितच त्यांच्या पदाला साजेसे नव्हते, हे मुद्दाम नमूद करायला हवे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी रोहित वेमुला प्रकरणावरून राज्यसभेत तत्कालीन शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांनी जे अशोभनीय वर्तन केले होते त्याची मात्र आठवण झाली. परंतु राफेल विमान खरेदी कराराच्या बाबतीत सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे त्या वेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरही त्याबाबतीत अंधारात होते. त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्याची शिक्षा त्यांना मिळालीच. त्यांना केंद्रातील इतके मोठे पद सोडून गोव्यासारख्या टीचभर राज्यात पुन्हा जावे लागले. भले ते काहीही म्हणोत!

बरे, गेल्या दोन वर्षांत खुद्द पंतप्रधानांशी निगडित ज्या घटना उघड झाल्या त्यामुळे त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती निश्चितच नाही. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा-बिर्ला डायऱ्यांमध्ये त्यांना ४२ कोटी रुपये दिल्याचा जो उल्लेख आहे त्याचे निधडय़ा -५६ इंची- छातीने उत्तर देण्याऐवजी मोदींनी न्यायालयाचा शिखंडीसारखा वापर केला. दुसरा मुद्दा त्यांच्या शैक्षणिक पदवीचा. त्याचे उत्तरही मोदींनी आजतागायत दिलेले नाही. त्यामुळे राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या अनुषंगाने राहुल यांनी थेट मोदींना लक्ष्य केले ते अवास्तव होते असे म्हणता येणार नाही. एकंदरीत राफेल हे गौडबंगाल आहे यात शंका नाही.

– अमेय गुप्ते, तळेगाव दाभाडे

छायाचित्रातला मोकळेपणा ‘असंसदीय’ आहे?

‘मिठीत तुझिया..’ या अग्रलेखाबरोबर ‘लोकसत्ता’च्या इंटरनेट आवृत्तीत प्रसिद्ध झालेले छायाचित्र बोलके आहे. त्यावरून राहुल गांधींनी या अविश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने मोदींवर मात केली हे स्पष्ट होते. राहुल गांधींवर जेव्हा बालिशपणा अथवा असंसदीय वर्तन याबाबत सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपीय मंडळी टीका करते ते वर्तन खरोखरच तसे होते का, याबाबत हे छायाचित्र स्पष्टीकरण देते. ज्या वेळेला राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना ही मिठी मारली तेव्हा संसदेत मोदींच्या आसपास बसलेल्या राजनाथ सिंह, अनंतकुमार व भाजपच्या इतर सदस्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे स्पष्टपणे अत्यंत सौहार्दाचे दिसून येतात. सर्वच जण अत्यंत मोकळेपणाने स्मितहास्य करत आहेत. मोदींच्या चेहऱ्यावरील भाव मात्र ‘ही काय नवी मुसीबत आली’ असे दिसत आहेत. ही मिठी म्हणजे राहुल गांधींनी मारलेला राजकीय मास्टर स्ट्रोक आहे असेच म्हणावे लागेल.

मोदींच्या वक्तृत्वकसबाचा काँग्रेसने व्यवस्थित अभ्यास करून या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने धोरण ठरवले. या मिठीमुळे मोदी प्रचंड गांगरले व ज्या आत्मविश्वासाने ते नेहमी भाषण करतात तो आत्मविश्वासच ते गमावून बसले हे त्यांचे भाषण ऐकताना स्पष्ट झाले. राहुल गांधी यांनी नुसतीच मिठी नव्हे तर प्रिया वारिअर स्टाइलमध्ये डोळाही मारला. हेतू स्पष्ट होता. चर्चा ही मिठीवर आणि डोळा मारण्यावर होईल- मोदींच्या २०१९ची निवडणूक समोर ठेवून केलेल्या भाषणाबाबत नाही. हा हेतू नक्कीच साध्य झाला हे भक्तमंडळींनाही मान्य करावे लागेल यात शंका नाही.

 – संजय जगताप, ठाणे.

गळामिठी हे केवळ ढोंगच!

‘मिठीत तुझिया..’ हा संपूर्ण अग्रलेख (२३ जुलै) राहुल गांधी यांची ती गळामिठी ‘खरी’ होती, या गृहीतावर बेतलेला आहे. त्यामुळे एक फार मोठा प्रश्न उपेक्षित व अनुत्तरितच राहतो. तो म्हणजे राहुलने ती गळाभेट झाल्यावर आपल्या आसनावर येऊन बसल्यावर लगेच आपल्या कुणा सहकाऱ्याला उद्देशून केलेली ‘नेत्रपल्लवी’! ती ‘गळाभेट’ खरी की ती ‘नेत्रपल्लवी’ खरी?! ती नेत्रपल्लवी ओरडून सांगत होती, की इथे क्षणभरापूर्वी जे झाले ते कितीही नाटय़मय वाटले तरी केवळ ढोंग होते!

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)

देशहितासाठी मारलेल्या मिठय़ांशी तुलना नको

‘मिठीत तुझिया..’ या अग्रलेखात राहुल गांधींच्या मिठीची तुलना मोदींनी जागतिक नेत्यांना मारलेल्या मिठीशी केली आहे. पण ही तुलनाच अयोग्य आहे. या पूर्ण अग्रलेखात त्या मिठीच्या नंतर त्यांनी मारलेला डोळा, मिठी मारायला गेल्यावर मोदींना उठा उठा असे बोलून मग ते जेव्हा उठले नाहीत तेव्हा मग स्वत त्यांच्या गळ्यात पडणे हे सर्व एका प्रमुख विरोधी पक्षाच्या अध्यक्षाला बिलकुल शोभेसे नव्हते!

मोदी जागतिक नेत्यांना मिठय़ा मारतात तेव्हा ते एक देशप्रमुख म्हणून दुसऱ्या देशप्रमुखाशी देशहितासाठी जुने नाते घट्ट करून नवे नाते जोडण्याचा प्रयत्न असतो, राहुल गांधींनी मोदींना मिठी मारावी अशी समानता कुठेही नाही. अनुभव, ज्येष्ठता, अभ्यास, वय आणि सध्याचे पद अशा सर्वच गोष्टीत प्रचंड तफावत असताना असे मिठी मारायला जाणे म्हणजे बालिशपणाचा कळस आहे.

– योगेश भागवत, चिपळूण

कोण अहंकारी आणि कोण शान राखते?

‘राहुल गांधींनी माफी मागावी’ हे पत्र (लोकमानस, २३ जुलै) वाचले. राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावादरम्यान मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले ते समस्त जनतेने अनुभवलेले आहे. (मोदींनी मात्र आपल्या भाषणात नेहमीप्रमाणेच फाफटपसारा मांडून वेळ मारून नेली हे नि:संदेह) भाषणानंतर राहुल गांधी यांनी मोदी यांना मिठी मारली, यात पत्रलेखकाला राहुल गांधी यांची ‘अहंकारी’ वृत्ती दिसली, तसेच मोदी हे ‘त्यांच्या या अहंकाराला भीक न घालता’ मिठीसाठी उभेच राहिले नाहीत, असे पत्रात म्हटले आहे. जी व्यक्ती मिठी मारण्यासाठी येते ती अहंकारी आणि ती मिठी नाकारणारी व्यक्ती ही नम्र, शालीन; हे समीकरण काही पचनी पडणारे नव्हे. ‘मोदींनी उभे न राहण्यामुळे पंतप्रधानपदाची व संसदीय संकेताची शान राखली आहे’ हे पत्रातील वाक्य तर राहुल गांधी यांच्या मिठीचा आणि ‘पंतप्रधानपदाची शान घालवण्या’चा बादरायणी संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असे वाटते. कारण राहुल गांधी यांना भले मिठी नाकारा, मात्र लोकशाही पद्धतीने निवडून आलेला एक संसदेचा सदस्य आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने मिठी मारण्यात काय ‘औचित्यभंग’ होतो, ते काही कळायला मार्ग नाही (‘मिठीत तुझिया..’ या २३ जुलैच्या संपादकीयात यावर यथोचित भाष्य केले आहेच).

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचारकाळात याच ‘शान’दार पंतप्रधानांनी काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी असे विधान केले होते, तसेच देशाचे सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भूषविलेले मनमोहन सिंग यांच्यावर अनेक हास्यास्पद विधाने करताना सिंग यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित केली होती.  देशाच्या पंतप्रधानपदावरील एखाद्या व्यक्तीने पक्षीय आणि व्यक्तिगत पातळीवर येऊन विधाने करणे, माजी पंतप्रधानांवर इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे अशी ‘पंतप्रधानपदाचे अवमूल्यन’ करणारी उदाहरणे मोदी यांनी वेळोवेळी दिली आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मोदींनी (गुजरातचे मुख्यमंत्री) ‘जीएसटी’ला विरोध केला होता. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सिंग यांचे भेटीचे निमंत्रण मोदींनी नाकारले होते. तेव्हा कोण ‘अहंकारी’ आणि कशी पदाची ‘शान’ राखली हे सध्याचे युक्तिवाद निव्वळ मोदींच्या बचावासाठी आहेत. समस्त देशवासीयांनी पदाची प्रतिष्ठा राखणे हे तर आद्य कर्तव्य आहेच. उलटपक्षी जी व्यक्ती त्या पदावर बसलेली असते त्या व्यक्तीने ती बसत असलेल्या पदाची गरिमा राखणे जास्त जबाबदारीचे आहे. सध्या काही बाबतीत हे भान सुटले असल्याचे प्रकर्षांने जाणवते.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे 

अशा प्रकरणांकडे भारतातच दुर्लक्ष

‘स्वधर्म राहिला काही’ हा अन्वयार्थ (२३ जुलै) वाचला. जे प्रकार केरळमध्ये घडले, ते जगाच्या पाठीवर सर्वत्र होत आहेत. मुंबई-वसई या भागातील फादर-सिस्टर हेही यात सापडले आहेत. रोममध्ये चर्चच्या आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या कार्डिनल महाशयांना पोप फ्रान्सिस यांनी घरचा रस्ता दाखविला आहे. लैंगिक शोषण व मालमत्तेच्या अफरातफरीत अनेक कॅथोलिक धर्मगुरू सापडले आहेत. अगदी मुंबई-वसईतही. अमेरिका-ऑस्ट्रेलिया या देशांतील कार्डिनल ते स्थानिक धर्मगुरू यांना पोप यांनी काढून टाकले आहे; भारतात मात्र अशी प्रकरणे दुर्लक्षित केली जातात.

‘अविवाहित धर्मगुरू’ ही परंपरा कॅथोलिक धर्मात अकराव्या शतकात आली. त्या आधी येशूचे शिष्य विवाहित असत. येशूचा प्रथम शिष्य पीटर हा डझनभर मुलांचा बाप होता. येशूचे शिष्य विवाहित होते. हे लक्षात घेता अविवाहित असण्याची सक्ती, ही पद्धतच चुकीची ठरते. पूर्वी फादर घरोघर भेटी देत, त्यातूनही गैरप्रकरणे होत. तेव्हा पुढे चर्चने ही पद्धत बंद केली. साधू, संत, मौलवी वा फादर या मंडळीने देवाचे कितीही नाव घ्यावे शेवटी ते जमिनीवरच येतात. धर्म अफूची गोळी आहे हे कार्ल मार्क्‍सने सांगितले तेच खरे!

– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)