‘सावरकरांच्या चिंतनाचे पाच पैलू..’ हा रवींद्र माधव साठे यांचा लेख (१० जून) वाचला. अस्पृश्यतेबाबत ‘केवळ आपद्धर्म म्हणूनच नव्हे तर धर्म म्हणून, लाभधारक म्हणूनच नव्हे तर न्याय्य म्हणून, उपकाराकरिता नव्हे तर माणुसकी म्हणून अस्पृश्यतेचे उच्चाटन केले पाहिजे’ ही सावरकरांची भूमिका अगदी रास्त आणि न्याय्य असली तरी ती सवर्ण बांधवांमध्ये रुजविण्यात ते अयशस्वी ठरले, असे दिसते. कारण ती भूमिका सवर्ण बांधवांनी स्वीकारली असती, तर वेगळे पतितपावन मंदिर उभारण्याची गरजच भासली नसती. तसेच त्यांनी नाशिकच्या सवर्ण बांधवांना एवढे निक्षून सांगूनसुद्धा काळाराम मंदिर आंदोलन अयशस्वी ठरले नसते. कदाचित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मातरदेखील करावे लागले नसते. सावरकरांची ही भूमिका सवर्णानी आजही स्वीकारलेली नाही.
अंधश्रद्धेविरोधात सावरकरांचे विचार (‘क्ष किरणे’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कथा’ ही पुस्तके आणि काही लेख) नि:संशय क्रांतिकारी आणि तर्कसंगत होते. परंतु ते विचारदेखील आपल्या हिंदू बांधवांमध्ये रुजविण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. अंधश्रद्धेविरोधात आणि व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी लढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा सनातनी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेला खून हेच दर्शवितो. आज जर सावरकर हयात असते आणि त्यांनी आपले अंधश्रद्धेबाबतचे विचार व्यक्त केले असते, तर त्यांनाही दाभोलकर यांच्या मार्गाने जावे लागले असते अशी परिस्थिती आहे. सावरकर यांच्या विचारांचा अंगीकार करण्याऐवजी आजचे नवहिंदूत्ववादी, ‘हिंदूंच्याच अंधश्रद्धांना विरोध का?’सारखे खुळचट प्रश्न विचारून त्यांच्या विचारांचा वारंवार खून करीत आहेत.
खरे तर, सावरकरांच्या या विचारांचा पराभव सावरकरांचेच नाव पदोपदी वापरणाऱ्या लेखकांच्या मातृ-संघटनेने आणि त्यांचे राजकीय अंग असलेल्या पक्षाने कसा केला आहे, हे अलीकडच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या ‘परिवारा’ने पसरवलेल्या विविध जुन्या आणि नवीन अंधश्रद्धा, पराकोटीची गाय-भक्ती इत्यादी बाबी दर्शवितात. सावरकरांचा वापर सोयीस्करपणे कसा केला जात आहे, हेच यावरून दिसून येते.
– उत्तम जोगदंड, कल्याण
सावरकरांचे अनुयायीच पथभ्रष्ट!
रवींद्र साठे यांचा ‘सावरकरांच्या चिंतनाचे पाच पैलू’ हा लेख (१० जून) वाचला. त्यांनी उल्लेख केलेले सावरकरांचे सामाजिक विचार सुपरिचितच आहेत. प्रश्न हा आहे की सावरकरांना आदरस्थानी मानणाऱ्या त्यांच्या किती अनुयायांकडून त्यांच्या सामाजिक, विज्ञानवादी विचारांचा अवलंब केला जातो? ‘मी सागरात मारलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विस्मरणात जाऊ देऊ नका,’ असे सावरकर स्वत: म्हणत हे खरे आहे. परंतु प्रत्यक्षात समुद्रात उडी मारणारे आणि अंदमानात शिक्षा भोगणारे इतकेच सावरकर त्यांच्या अनुयायांना प्रिय आहेत. आज देशाच्या आणि अनेक राज्यांच्या सत्तेवर सावरकरांना प्रेरणास्थान मानणारे लोक स्थानापन्न आहेत. सावरकरांच्या सामाजिक आणि वैज्ञानिक विचारांचा अवलंब करून हे लोक कारभार करत आहेत, असा दावा कोणी करू शकेल काय? लेखात डॉ. आंबेडकरांचे दाखले देऊन सावरकरांच्या जातीयता निर्मूलनाच्या कार्याचे कौतुक केले आहे. प्रत्यक्षात घोडय़ावरून वरात काढली म्हणून, उच्चवर्णीयांच्या वस्तीतून वरात नेली म्हणून, इतकेच काय अगदी पीळदार मिशी वाढवून खुन्नस दिली म्हणून मागासवर्गीयांच्या निर्घृण हत्या होत आहेत आणि हे घडणाऱ्या राज्यांत सावरकरांचे परमभक्त सत्तेत आहेत. गोरक्षणाच्या मुद्दय़ावरून, जात्यंधतेतून लोकांचे बळी घेतले जात आहेत. हे सारे सावरकरांच्या विचारांना काळिमा फासणारे नाही का? हे कोण करत आहे? सावरकरांच्या वैज्ञानिक, सामाजिक विचारांना तिलांजली देण्यात त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारेच अग्रेसर आहेत, हे वास्तव आहे.
सावरकरांच्या लिखाणात, भाषणांत अनेक ठिकाणी गांधीजींविषयी प्रचंड तिरस्कार आणि चीड जागोजागी वाचायला, अनुभवायला मिळते. असे असताना ‘महात्मा गांधी यांच्याविषयीही सावरकरांच्या मनात कृतज्ञतेची भावना होती,’ हा या लेखातील उल्लेख वाचून तर हसू आले. असो..
– रवींद्र पोखरकर, ठाणे
‘आमूलाग्र’ बदल कसे होणार?
अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली, की आम्ही उच्च शिक्षणात ‘आमूलाग्र’ बदल घडवून आणू. हे आमूलाग्र बदल कोणते? त्यांनी म्हटले आहे की तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे मानधन वाढवण्यात येणार आहे. तासिका तत्त्वावरील नेमणुका ही एक प्रकारे उच्च शिक्षणातील वेठबिगारीच आहे. ही पद्धत बंद व्हावी यासाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत. आता मानधनवाढीची घोषणा करून, हे शोषण पुढेही सुरूच ठेवण्याची सोय सरकारने केली आहे. शासनाने १०० टक्के साहाय्यक प्राध्यापक भरती भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने करावी, अशी आमची मागणी आहे. साहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी संस्थाचालकांना ४०-५० लाखांची लाच द्यावी लागते, हे सर्वश्रुत आहे. असे असताना उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत अडीच वर्षांपासून केवळ पोकळ आश्वासने देत आहेत. प्राध्यापक भरतीची फाइल दोन वर्षे वित्त विभागात अडकल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केला. मग आता दोन वर्षांनी तुम्ही फाइल पाहिली आणि लगेच घोषणा केल्या का?
अजित पवार असेही म्हणाले की, ५० टक्के प्राध्यापक भरतीला मान्यता देऊ, पण त्यासाठी ‘नॅक’ मूल्यांकनाची अट असेल. राज्यातील ‘नॅक’ मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांची संख्या मोजकीच आहे. आता त्यातीलसुद्धा ५० टक्के म्हणजे नेमकी किती पदे भरणार? आणि त्यातून आमूलाग्र बदल साधता येईल का?
आज शिक्षण क्षेत्र हे शिक्षणसम्राट आणि या क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. १२ वर्षांत प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे ‘नेट’, ‘सेट’, ‘पीएचडी’ झालेले पात्रताधारक घरखर्च चालवण्यासाठी चहाची टपरी चालवतात किंवा रोजगार हमीच्या कामावर जातात. एवढय़ा समस्या असताना कोणतेही नियोजन न करता उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल कसे होणार हे कळण्यास मार्ग नाही.
– डॉ. विवेक कोरडे, मुंबई
तात्पुरत्या उपाययोजना पुरेशा नाहीत
‘रुपयाचा ऐतिहासिक तळ’ ही बातमी ( लोकसत्ता- १० जून) वाचली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय गुंतवणुकीचे निर्गमन ही याची तात्कालिक कारणे आहेत. युक्रेन युद्ध सुरूच असल्याने व चलनवाढीमुळे एकूण जागतिक अर्थव्यवस्थेपुढे मंदीचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकी डॉलरला पसंती देतात. परिणामी, रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आहे. केवळ रुपयाच नव्हे, तर सर्वच आशियाई चलने कमजोर झाली आहेत.
रुपयाची ही जी ऐतिहासिक घसरण झाली आहे, त्यामागे केवळ तात्कालिक कारणे नसून सपशेल चुकीची आर्थिक धोरणे, सतत वाढणारी महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता इत्यादी मूलभूत कारणे आहेत. जोपर्यंत अंतर्गत भावपातळी रोखली जात नाही तोपर्यंत डॉलरच्या
तुलनेत रुपयाचे मूल्य स्थिर होऊ शकत नाही. रिझव्र्ह बँक तात्पुरत्या उपाययोजना करू शकेल, पण तेवढे पुरेसे नाही. अर्थव्यवस्थेच्या मूलभूत गोष्टींवर काम केल्याशिवाय अर्थस्थिती सुधारणार नाही.
– प्रा. एम. ए. पवार, कल्याण
बीडीडी चाळींना स्थानिक नेत्यांची नावे द्यावीत
नवीन बीडीडी चाळींना ‘बाळासाहेब ठाकरे नगर’, ‘शरद पवार नगर’ व ‘राजीव गांधी नगर’ अशी नावे देण्याची चर्चा आहे; परंतु त्याऐवजी या चाळींची ‘गणपत महादेव जाधव ऊर्फ मडकेबुवा नगर’, ‘आर. डी. भंडारे नगर’ व ‘बी. सी. कांबळे नगर’ अशी नावे ठेवण्यात यावीत कारण..
मुंबईच्या ज्या भागांत या चाळी आहेत तो वरळी- नायगाव भाग हा आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक बालेकिल्ला आहे. या भागात आंबेडकरी चळवळीतील वरील तीन दिग्गज नेत्यांचे वास्तव्य होते व त्यांनी केलेल्या कार्यामुळेच या भागाचा विकास झाला. त्यामुळे राजकीय नेत्यांची नावे देणे हे आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेवर आणि या परिसराच्या सांस्कृतिक इतिहासावर आक्रमण ठरेल. ठरावीक घराण्यांतील तीच तीच नावे पुन:पुन्हा निरनिराळय़ा प्रकल्पांना, योजनांना, रस्त्यांना व स्मारकांना देण्याऐवजी त्या विशिष्ट भागात भरीव कार्य केलेल्या व्यक्तींची नावे तेथील प्रकल्पांना द्यावीत. याबाबत पक्षीय दृष्टिकोन बाळगू नये.
– राजेंद्र भास्करराव भोसले, पुणे
पालक आणि सरकारनेही सजग राहावे
‘पबजी खेळण्यावरून मुलाकडून आईची हत्या’, हे वृत्त (लोकसत्ता- ९ जून) धक्कादायक आहे. मोबाइल आणि त्यातील विविध अॅप्स हा आता रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहेत. याचा लहान मुलांच्या मनावर फार गंभीर परिणाम होतो. मुले हट्टी, चिडचिडी आणि काही वेळा हिंसकही होऊ लागली आहेत. या खेळांचे व्यसन त्यांच्यावर विपरीत मानसिक परिणाम करत आहे. आपण आजवर जे प्रकार केवळ अमेरिकेतच घडतात, असे मानत होतो, ते आता भारतातही घडू लागले आहेत. पालकांनी वेळीच जागरूक व्हायला हवे आणि सरकारनेही अशा खेळांवर बंदी घालायला हवी.
– सुरेश आपटे, पुणे