पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील मेट्रो लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ‘वर्षांतून एकदा नदी उत्सवाचे आवाहन’ (लोकसत्ता – ७ मार्च ) पुणेकरांना केले आहे. मध्यंतरी ‘विश्व नदी दिन परंपरेशी सुसंगत’ असल्याचे सांगत मोदींनी नद्यांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले होते. मोदींचे नदीप्रेम सर्वश्रुत आहेच. मोदी सरकारने ‘नद्यांना व्यक्तिमत्त्व’ असल्याचा कायदा आपल्या पहिल्याच सत्ताग्रहण काळात केला. पण, त्यानुसार सरकारची कृती मात्र शून्य आहे. मागील पाच वर्षांपासून पुणे महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. तर मुठा नदीची पूररेषा बदलून नदीपात्रातील शेकडो हेक्टर जमिनीचे निवासीकरण करण्याचे घाटत असल्याचे वृत्त मध्यंतरी वाचनात आले. बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी मुठा नदीची पूररेषा हेतुत: बदलली जात आहे. मुठा नदी ही पुणे उपनगरांपासून शहराच्या मध्यवर्ती भागांतून वाहते. नदीची पूररेषा कुठे ८० मीटरने आत घेण्यात आली आहे तर कुठे ५० मीटरने वाढवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे ज्या भागांतील पूररेषा वाढवली आहे तो भाग पूररेषेच्या निळय़ा भागांत येणार आहे तर कमी केलेला भाग निषिद्ध पूररेषेत आल्याने तिथे बांधकाम करण्याचा मार्ग यामुळे सहाजिकच मोकळा होणार आहे. या खटाटोपामागे बांधकाम व्यावसायिक आणि पुणे महानगरपालिकेचा ‘अर्थ’पूर्ण परस्पर संबंध असणार हे काही चाणाक्ष पुणेकरांना सांगायची गरज नाही. आजवर नदीच्या पात्रात अनेक अनधिकृत बांधकामे झाली असल्याचेदेखील वास्तव आहे पण म्हणून भविष्याचीही काळजी न घेता पूररेषाच बदलायची हे कुणाला कसे पटेल? आजकाल दरवर्षी पुणे शहर पावसाळय़ात तुंबताना दिसते. त्यात ही पूररेषा बदलण्याचे घाटत आहे. त्यामुळे  मुठा नदीची पूररेषा बदलली जात नसून पुण्याची ‘भाग्यरेषा’ बदलली जात आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

भूमिपूजन, ‘जलपूजनव (अर्धवट) उद्घाटन

‘यशवंतरावांनी नाही का असेच केले?’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस – ७ मार्च)  वाचले. यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यावर कोकण रेल्वेला दशकानुदशके लागली, मोदींच्या कार्यक्रमावेळी पाच किलोमीटर मेट्रो प्रकल्प पूर्ण तरी झाला, असा त्यातील सूर आहे. फक्त पाच किलोमीटर मेट्रो प्रकल्प नसतो, म्हणजे अर्धवट प्रकल्पाचे उद्घाटन करतात हे पत्रलेखकासही मान्य असावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास नसत्या तर कदाचित हे कथित उद्घाटन झालेही नसते. भूमिपूजनानंतर मात्र प्रकल्पास कितीही वेळ लागू शकतो, अगदी प्रकल्प बासनातही जाऊ शकतो.  उदाहरणार्थ, पाच वर्षांपूर्वी मुंबईत छत्रपतींच्या स्मारकाचे जलपूजन आपल्या पंतप्रधानांनी केले होते, नंतर त्याचे काय झाले हे आपण पाहातच आहोत!

राजेंद्र ठाकूर, बोरिवली (मुंबई)

खतांपेक्षा मेट्रो महत्त्वाची?

पुणे मेट्रोच्या उद्घाटनाची आणि  खरिपातील संभाव्य खतटंचाईची अशा दोन्ही बातम्या (लोकसत्ता – ७ मार्च) वाचल्या. वास्तविक आपल्या देशात  मेट्रोपेक्षा खतांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त. खतटंचाई किंवा साठेबाजी यांसारख्या समस्या दरवर्षीच्याच. त्याबद्दल कुठल्याही उपाययोजना नाहीत.

 मग आपणास मेट्रो आणि बुलेट ट्रेनची एवढी काळजी का? का हा सगळा सोस फक्त प्रसिद्धीसाठी? मेट्रोला पर्याय आहेत पण खताला नाहीत. पण काय करणार.. आपल्या कारभाऱ्यांना खतांपेक्षा मेट्रो महत्त्वाची!

नीळकंठ (बाळासाहेब) प्रकाशराव लांडे, एरंडी (लातूर)

बुरसटलेल्या विचारांमुळे जीव मुठीत

परराज्यातून माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील नोकरीसाठी आलेल्या तरुणी तोकडे कपडे घालतात म्हणून पुणे उपनगरातील खराडी येथील घरात घुसून तरुण मारहाण करतात ही अत्यंत शरमेची घटना आहे. स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. येथील ग्रामस्थांची मानसिकता स्त्रियांच्या बाबत अद्याप बुरसटलेली आहे. राज्यघटनेनुसार पुरुष आणि स्त्री हे समान आहेत. त्यांना समान अधिकार आहेत. पुरुषांची स्त्रियांबाबतची मानसिकता आता बदलणे गरजेचे आहे. मारहाण आणि दमदाटी करणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे. ‘आयटी’मुळे हिंजवडी, खराडी, हडपसर, बावधन अशा पुणे शहरालगतच्या भागांचा विकास झाला आहे. येथे नोकरीनिमित्त येणाऱ्या मुलींना जीव मुठीत घेऊन एकटे राहावे लागू नये. कठोरपणे कायद्याचा वापर करून या प्रवृत्तीचा बीमोड करणे आवश्यक आहे.

अ‍ॅड. बळवंत रानडे, पुणे

अंगभर कपडय़ांची अपेक्षा चुकीची आहे?

तोकडे कपडे घालण्यावरून पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोन तरुणींना मारहाण झाल्याची घटना सर्वथा गैर आहे. स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत, फॅशनचा किती अतिरेक करावा, याबाबत मतभेद असू शकतात. हे त्यांनी घरात केले, तर त्याची दखल घेतली जाणार नाही, परंतु हेच जर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी केले तर ते आक्षेपार्ह ठरू शकते. आजकाल पैशाचा माज स्त्रियांच्या साजशृंगारात उतरत आहे. याचा स्रोत अर्थातच सिनेमा, फॅशन शो यात आहे. तेथे अशा अर्धनग्न पोझेस देणाऱ्या तरुणी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत सिनेमातील नाटकातील नग्नता कॅश केली जाणारच! शेवटी विचारावेसे वाटते की, समाजात वावरताना स्त्रियांनी अंगभर कपडे घालण्याची अपेक्षा ठेवणे, म्हणजे त्यांच्या कृतीस्वातंत्र्यावर मोठी गदा आणणे ठरते का?

अरिवद करंदीकर, तळेगाव दाभाडे

शैलीदार क्रिकेटपटूंच्या दोन पिढय़ा..

‘शेन वॉर्नचे नसणे’ हे संपादकीय (७ मार्च) वाचले. संघ कोणताही असो खेळाशी वचनबद्धता (कमिटमेंट) कशी असावी याचा आदर्श त्याने राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देऊन घालून दिला. विव्ह रिचर्डस, मियाँदाद यांच्या अस्तानंतर शेनचा उदय झाला; अन्यथा वेगळीच मेजवानी क्रिकेट रसिकांनी अनुभवली असती.

आमची- आज पन्नाशीत वा त्यापुढे असलेली-  पिढी खरोखरीच भाग्यवान जिने प्रसन्न, बेदी, वेंकटराघवन यांचे फ्लाईट्स तर चंद्रशेखरचा वेगवान लेगब्रेक, गुगली पाहिला तर शेनचे हात हात वळणारे चेंडू याचि डोळा अगदी ‘लाइव्ह’ पाहिले. ते हुकमी वळण आता पाहायला मिळणार नाही ही खंत सतत वाटणार. त्याचे मैदानावरील चालणे, ती देहबोली सतत डोळय़ासमोर येणार. त्याचे मैदानावरील नसणेदेखील पुढील काही काळ तरी जाणवत राहाणार.

शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

सोबर्सच्या मते शेन वॉर्नपेक्षा श्रेष्ठ सुभाष गुप्ते!

शेन वॉर्नच्या निधनाने क्रिकेटच्या इतिहासातील एक श्रेष्ठ लेग-स्पिनर काळाच्या पडद्याआड गेला आहे. परंतु या निमित्ताने सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्सना काय वाटते हे पाहणे उद्बोघक ठरेल. शिवाजी पार्क जिमखान्याने मुंबईलाच नव्हे तर भारताला एकापेक्षा एक श्रेष्ठ क्रिकेटपटू दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जागतिक कीर्तीचे लेग-स्पिनर सुभाष गुप्ते. हा पाढा वाचण्याचे कारण म्हणजे शेन वॉर्नचा क्रिकेट जगात गवगवा होत असताना – त्याने ७०० कसोटी विकेटस घेतल्यावरही – सोबर्स म्हणाले होते की, माझ्या पाहाण्यातील सर्वश्रेष्ठ लेग-स्पिनर म्हणजे सुभाष गुप्ते.

संजय चिटणीस, मुंबई

हीच ठिकठिकाणची कथा..

‘तरुणही न इतके..’  हे शनिवारचे संपादकीय (५ मार्च) वाचताना, जणू मी माझ्या भोवतालच्या, अगदी माझ्या कॉलनीतल्या संस्थेबद्दलच वाचतो आहे असे वाटू लागले. संस्था लहान असो वा मोठी, खुर्चीवर बसण्याचा आणि एकदा बसल्यावर तिथेच चिकटून राहण्याचा मोह अगदी भल्याभल्यांनाही आवरता येत नाही.

एकदा का मुलगा कर्ता झाला की कुटुंबाचा सुकाणू त्याच्या हाती देऊन आपण सल्लागाराच्या भूमिकेत राहावे आणि विचारल्यावरच सल्ला द्यावा हे सर्वानाच कळतं पण अगदी मोजकेच याची अंमलबजावणी करताना दिसतात. असे जर न घडते तर, संपादकीयात म्हटल्याप्रमाणे, आपल्या देशात गांधींनंतर अनेक गांधी झाले असते. पण तसे झाले नाही आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली तरी गांधी गांधीच राहिले आणि राहतीलही, त्यांना कुणीही आणि कितीही मिटविण्याचा प्रयत्न केला तरी.

विनोद द. मुळे, इंदूर (मध्य प्रदेश)

आता तरी कामावर रुजू व्हा 

एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सुरू असलेला कर्मचाऱ्यांचा संप संपत नाही. कामगार न्यायालयाने बेकायदा ठरविला तरीही,  राज्य सरकार कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यास तयार असूनही विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर काही आगारांमध्ये संप चालूच ठेवला आहे. पण आता राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीने एस. टी. महामंडळ सरकारमध्ये विलीनीकरण करू नये (त्याऐवजी खासगीकरणाचा पर्याय असू शकतो) अशी शिफारस सरकारला केली आहे. परिवहनमंत्र्यांनी संपकाळातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल अन्यथा कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येईल असे जाहीर केले आहे.

 आता तरी एस. टी. कर्मचाऱ्यांनी सखोल विचार करून कामावर हजर होणेच हिताचे ठरेल.

नंदकुमार आ पांचाळ, चिंचपोकळी पूर्व (मुंबई)