साम्ययोग : मार्क्‍सवादी परिभाषेत सर्वोदय 

विनोबा, सत्याग्रह, अहिंसा या संकल्पनांची फेरमांडणीच करतात. सत्याचा आग्रह कशासाठी हा त्यांचा रोकडा सवाल आहे.

vinoba-bhave
विनोबा भावे,

अतुल सुलाखे

आपण एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी राखतो तेव्हा त्या विचारसरणीचा प्रचार करण्यापूर्वी तिची चिकित्सा करायची असते. स्वत:ला प्रथम ऐरणीवर ठेवणे म्हणजे सौजन्य. आजच्या अभिनिवेशाच्या जमान्यात ही गोष्ट नक्कीच अमान्य होईल. तथापि सर्वोदय विचार याला फार मोठा अपवाद आहे.

गांधीजींच्या निकटवर्तीयांमधे विनोबा, नेहरू, पटेल, मीराबेन, कुमारप्पा, आचार्य धर्माधिकारी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. गांधीजींशी प्रसंगी टोकाचे मतभेद ठेवून ते त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत राहिले. स्वत: गांधीजी नित्यपरिवर्तनशील होते. तीव्र विचार भिन्नता ही काँग्रेससाठी केव्हाच नवी नव्हती, म्हणूनच हा पक्ष दीर्घकाळ ‘विचारधारा’ म्हणून टिकला. सर्वोदयाच्या जवळपास अखेरच्या समीक्षाकांमध्ये विनोबा व धर्माधिकारी यांचे नाव घ्यावे लागते. विनोबांनी, सर्वोदयाला जवळची विचारधारा म्हणून साम्यवादाची निवड केली. सर्वोदय, अहिंसक क्रांतीसाठी प्रयत्न करतो तर साम्यवाद हिंसा वज्र्य मानत नाही. दोन्ही विचारसरणींत करुणेला स्थान आहे, असे ते म्हणत.

विनोबा, सत्याग्रह, अहिंसा या संकल्पनांची फेरमांडणीच करतात. सत्याचा आग्रह कशासाठी हा त्यांचा रोकडा सवाल आहे. ज्याचा आग्रह धरावा लागतो ते सत्य नव्हे. अनाग्रह हे सत्याचे मूलभूत लक्षण आहे, अशी त्यांची भूमिका दिसते.

सत्यापेक्षाही अहिंसेचे त्यांनी केलेले विवेचन अधिक मूलगामी आहे. अहिंसा म्हणजे हिंसा नसणारी अवस्था हा त्यांच्या मते, नकारात्मक अर्थ झाला. उदा. अनैतिक वर्तन नाही इतकीच गोष्ट पुरेशी नसते. नैतिक वर्तनाचा आग्रह हे खरे रचनात्मक कार्य ठरते. त्यामुळे अहिंसारूपी अभावाच्या जागी कोणते विचार ठेवायचे. यादृष्टीने विनोबांनी सत्य, प्रेम आणि करुणा या संकल्पना मांडल्या आहेत. यातील सत्य आणि प्रेम ही सनातन नैतिक संकल्पना आहेत तर करुणा हे समाजरचनेचे आधार तत्त्व आहे. कार्यप्रवृत्त करते ती करुणा ही त्यांची करुणेची व्याख्या स्पष्ट आहे.

शिक्षण म्हणजे सत्संगती आणि सत्ता म्हणजे सेवा असे ते सांगतात तेव्हा आपल्या पठडीबाज व्याख्यांना धक्का बसतोच. सर्वोदयाला असा आयाम देताना विनोबांनी ही विचारसरणी साम्यवाद्यांच्या परिभाषेतही मांडल्याचे आढळते.

अहिंसक यथास्थिती हा थीसिस, क्रांतिकारी हिंसा हा अँटीथिसिस आणि क्रांतिकारी अहिंसा हा सिंथेसिस या सिंथेसिसच्या प्राप्तीसाठी विनोबा पंचसूत्री कार्यक्रम सांगतात. 

१.सत्तेचे विकेंद्रीकरण. खालच्या स्तरांना जास्तीत जास्त सत्ता. वर कमीत कमी सत्ता. सर्वात वर नैतिक सत्ता.

२.सहकारिता

३.व्यक्तीच्या विकासासाठी पूर्ण संधी.

४.समाजाला समर्पण करण्याची भावना.

५.शिक्षणात ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय.

आज काम करणाऱ्यांना ज्ञान नाही आणि ज्यांच्यापाशी ज्ञान आहे ते काम करत नाहीत. यामुळे समाजाचे दोन वर्गात विभाजन झाले आहे – बुद्धिजीवी आणि श्रमजीवी. सर्वोदयी विचारसरणीतून उभी राहिलेली अनंत रचनात्मक कामे, भूदान, ग्रामदान, प्रखंडदान आदी कार्ये हे अहिंसक क्रांतीचे रूप होते. त्याची आपण िनदा केली त्यापेक्षा दोषास्पद म्हणजे वारेमाप स्तुती केली. परंतु ते आत्मसात केले का? jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave biography acharya vinoba bhave ideology zws

Next Story
शेतकऱ्याचा भरवसा उसावरच, असे का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी