‘ऑस्कर’ची बाहुली- म्हणजे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसतर्फे दिला जाणारा पुरस्कार- अभिनयासाठी तिने १९३६ आणि १९३७ अशी लागोपाठची दोन वर्षे मिळवला होता, हेच तिचे कौतुक सध्या सुरू आहे. वास्तविक, २६-२७ वर्षांची असताना ऑस्कर मिळवणारी लुइझ रायनर ही ३० डिसेंबर २०१४ रोजी वयाच्या १०४व्या वर्षी वारली, तर मग ती पुढली पाऊणशे वर्षे कशी जगली हेही महत्त्वाचे होते.. पण त्याचे कौतुक पुरेसे झालेले नाही.
ती मजेत जगली, आरोग्यपूर्ण जगली आणि मुख्य म्हणजे मानाने जगली. ज्या काळात अभिनेत्रीला सर्रास ‘नटी’च म्हटले जाई, तेव्हाच्या हॉलीवूडी दुनियेत तिने – हल्ली ज्याला ‘आत्मसन्मान’ म्हणतात तो- जपला! स्वत्व जपण्यासाठी सत्त्व असावे लागते. अभिनयकौशल्य आणि भूमिकेसाठी परिश्रमाची तयारी हेच तिचे सत्त्व होते. ती जर्मन ज्यू.. १२ जानेवारी १९१० रोजी जन्मली, १९२८-२९ पासूनच रंगभूमीवर अभिनय करू लागली आणि हिटलरी छळापासून वाचण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकेत येऊन, ‘एमजीएम’ स्टुडिओशी सात वर्षांसाठी करारबद्ध झाली. तिची १९३६ सालची जी ‘ऑस्करविजेती’ भूमिका होती ती फक्त एकाच दृश्याची होती.. नायकाकडून प्रेमभंग झालेली एक युवती.. ती दूरध्वनीवर नायकाला, त्याचे लग्न ठरल्याबद्दल शुभेच्छा देते आहे.. तिची तगमग, असूया, द्वेषप्रेमाच्या भावनांचा कल्लोळ काही केल्या लपवता येत नाही तिला.. इतकेच! ‘द ग्रेट झिग्लर’ या चित्रपटातील एवढा एक प्रसंग ऑस्करच्या तोडीचा ठरला. निर्मात्याला ‘हवे ते’ अजिबात न देतासुद्धा मग तिला नायिकेच्या भूमिका मिळाल्या. मात्र याच तिला कंटाळवाण्या वाटत.. अभिनयाऐवजी बाकीचेच सारे करावे लागते, म्हणून. अखेर निर्मात्याच्या ‘अपेक्षा’ पूर्ण केल्या नाहीत म्हणून ऐकावे लागणाऱ्या टोमण्यांना वैतागून, तिनेच करार मोडला.
तिचे पहिले प्रेम नाटक होते, आणि पहिले लग्नही डाव्या विचारांचा नाटककार क्लिफर्ड ओडेट याच्याशी (१९३७) झाले होते. हा संसार १९४३ मध्ये मोडला, याचे तिच्या बाजूचे कारण ओडेटचा अतिसंशयी, ताबेदारीचा स्वभाव. आणि ओडेटच्या बाजूचे कारण : आल्बर्ट आइन्स्टाइनशी असलेली तिची मैत्री! आणखी दोन वर्षांनी रॉबर्ट नाइट या प्रकाशकाशी ती विवाहबद्ध झाली आणि अभिनय जवळपास सोडूनच देऊन गृहिणी बनली. हे दाम्पत्य स्वित्र्झलडमध्ये स्थायिक झाले. तिचा चित्रपटसंन्यास सुटला तो थेट १९९७ मध्ये, ‘द गॅम्बलर’ या चित्रपटातील आजीच्या भूमिकेने.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2015 रोजी प्रकाशित
लुइझ रायनर
‘ऑस्कर’ची बाहुली- म्हणजे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसतर्फे दिला जाणारा पुरस्कार- अभिनयासाठी तिने १९३६ आणि १९३७ अशी लागोपाठची दोन वर्षे मिळवला होता,

First published on: 06-01-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luise rainer won back to back oscars