१९६२ सालात थॉमस कुहन या अमेरिकन विचारवंताचे ‘द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्युशन्स’ हे वादग्रस्त पण क्रांतिकारी पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्याने वैज्ञानिक प्रगतीच्या प्रक्रियेबद्दल संपूर्णत: नवे विचार मांडले होते. त्यातला मुख्य विचार म्हणजे वैज्ञानिक प्रगती ही कधीही क्रमाक्रमाने  होत नाही. विज्ञानाच्या विविध शाखांमधले सिद्धांत हे नेहमी एका स्थिर स्थितीत असतात; ज्यांच्यात मध्येच कधी तरी खूप मोठे बदल घडतात व काही काळासाठी त्या स्थिर स्थितीतील व्यवस्थेचा समतोल बिघडतो. पण परत थोडय़ाच काळात एक नवी स्थिर व्यवस्था तयार होते. स्थिर जलाशयातल्या पाण्यात  दगड टाकला तर काही काळासाठी तरंग तयार होऊन पाण्याचा समतोल बिघडतो, पण काही काळातच जलाशय परत स्थिर स्थिती प्राप्त करतो तसलाच हा प्रकार.

जेव्हा कोपर्निकसने सिद्धांत मांडला की पृथ्वीसकट सर्व ग्रह पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती फिरतात किंवा न्यूटनने जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला तेव्हा ते दोघेही त्यांच्या आधीच्या काळात ज्ञात असलेल्या माहितीत फक्त जराशी भर टाकत नव्हते. ते खरे तर आधी माहीत असलेल्या सिद्धांताची पुनर्रचना करत होते, पूर्वी माहीत असलेल्या सत्याचे पुनर्मूल्यांकन करत होते. ही एक प्रकारची वैचारिक क्रांतीच होती. कुहनने विज्ञानातल्या या क्रांतिकारी प्रक्रियेला ‘व्यवस्थेमधील आमूलाग्र बदल’ असे समर्पक नाव दिलेय.

rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

हे आमूलाग्र बदल विज्ञानाप्रमाणेच आपल्या भोवतालच्या औद्योगिक किंवा व्यावसायिक विश्वातदेखील वेळोवेळी घडत असतात. कुठलाही बदल हा काही लगेच स्वीकारला जात नाही. प्रस्थापितांकडून त्याला कडवा विरोध होतोच. त्याचप्रमाणे अशा आमूलाग्र बदलांमुळे व्यवस्थेमध्ये होणारे सगळेच परिणाम लगेच दिसून येत नाहीत. काही परिणाम मात्र इतके दूरगामी असतात की ते जुन्या व्यवस्थेलाच मोडून किंवा त्यांची पुनर्बाधणी करून एक नवी व्यवस्था जन्माला घालतात.  संगणकविश्वात असाच एक आमूलाग्र बदल घडला १९८१ मध्ये! जेव्हा आयबीएमने आपल्या वैयक्तिक वापरासाठीच्या संगणकाची (आयबीएम पीसीची) निर्मिती प्रमाण भागांपासून केली व प्रथमच आपल्या आयबीएम पीसीचे हार्डवेअर आरेखन व स्थापत्य सर्व जगास खुले केले. यामुळे कोणताही संगणक उत्पादक आयबीएम पीसीसदृश संगणक तयार करून विकू शकणार होता. थोडय़ाच कालावधीत आयबीएम पीसीचे हार्डवेअर आरेखन हा वैयक्तिक वापरासाठीच्या संगणकाचा प्रमाण आराखडा बनला; ज्याने याआधी अस्तित्वात असणाऱ्या सर्व प्रकारच्या संगणकांना निकालात काढले.

आयबीएमच्या या निर्णयाचा एक दूरगामी परिणाम झाला ज्याचा अदमास खुद्द आयबीएमलाही घेता आला नाही. तो म्हणजे संगणक उद्योगाचा लंबक हार्डवेअरकडून सॉफ्टवेअरकडे गेला. आपल्या पीसीसाठीची ऑपरेटिंग प्रणाली आयबीएमने मायक्रोसॉफ्ट या तेव्हाच्या चतकोर आकाराच्या कंपनीकडून विकत न घेता लायसन्सिंग तत्त्वावर घेतली ज्यात मायक्रोसॉफ्टला ती इतर कुठल्याही पीसी उत्पादकाला लायसन्सिंग तत्त्वावर वितरित करण्याचा अधिकार होता. पुढील काळात पीसीचे आरेखन खुले झाल्यामुळे व हार्डवेअरच्या उतरत्या किमतीमुळे अनेक उत्पादक संगणक-उत्पादनाच्या क्षेत्रात उतरले आणि संगणकाची (व त्याचबरोबर संगणकाच्या ऑपरेटिंग प्रणालीची) मागणी उत्तरोत्तर वाढतच गेली. अखेर १९९० नंतर आयबीएम नव्हे तर मायक्रोसॉफ्ट ही संगणक उद्योगातील सर्वात महत्त्वाची कंपनी बनली.

ओपन सोर्स ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील अशीच एक क्रांती आहे जिने सॉफ्टवेअर उद्योगव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवला आहे. हा बदल व्यापक व विविध स्तरांवरील आहे. जेवढा हा बदल तांत्रिक आहे तेवढाच तो आर्थिक आहे; जेवढा तो व्यवस्थापकीय आहे तेवढाच तो मानसशास्त्रीय आहे. हा बदल कायद्याशीही निगडित आहे, कारण बौद्धिक संपदेच्या व्यवस्थापनाला एक नवे परिमाण त्याने दिले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा बदल वैचारिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे. ओपन सोर्सच्या इतिहासाबरोबरच वरील सर्व पैलूंची विस्तृत चर्चा आपण पुढील लेखांमध्ये करणार आहोतच.

पण सर्वप्रथम कोणाही संगणकक्षेत्रात काम न करणाऱ्या व्यक्तीस हा प्रश्न पडू शकतो की हे ओपन सोर्सच्या महतीचे जे चऱ्हाट लावलेय ते ठीक आहे, पण ‘ओपन सोर्स’ म्हणजे नक्की काय? ओपन सोर्सच्या व्याख्येकडे जाण्यापूर्वी टीम ओरायली (ओरायली प्रकाशन या संगणक विषयावरील विख्यात पुस्तक प्रकाशन संस्थेचा सर्वेसर्वा) त्याच्या ओपन सोर्सवरील व्याख्यानांमध्ये श्रोतृवर्गाला जे दोन छान प्रश्न विचारतो ते मीसुद्धा तुम्हाला विचारेन. पहिला प्रश्न – ‘लायनक्स ही ओपन सोर्स ऑपरेटिंग प्रणाली तुमच्यापैकी किती जण वापरतात?’ मला खात्री आहे संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रातील काहींचा अपवाद सोडला तर बऱ्याच जणांचे उत्तर ‘नाही’ असंच असेल. आणि दुसरा प्रश्न – ‘तुमच्यापैकी किती जण गूगलचा वापर करतात?’ आता मात्र जवळपास १०० टक्के लोक ज्यांनी कधी तरी इंटरनेटचा वापर त्यांच्या संगणक, टॅबलेट वा मोबाइलवर केला आहे ते ‘हो’ असेच उत्तर देतील.

पण आता जर मी असे म्हटले की जर तुम्ही गूगलचा वापर केला असेल तर तुम्ही लायनक्स प्रणालीचाही वापर केला आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही. याचे कारण म्हणजे जेव्हा आपण गूगलवर जाऊन काही शोधतो तेव्हा गूगलच्या शोध इंजिनाचा अल्गोरिदम ज्या लाखो सव्‍‌र्हरची मदत घेऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधतो त्या सर्व सव्‍‌र्हरवर लायनक्स ऑपरेटिंग प्रणाली काम करत असते. म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या आपण सर्वच जण दररोज लायनक्स ऑपरेटिंग प्रणाली वापरत असतो.

लायनक्स ही ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या चळवळीमधली एक ठळक यशोगाथा आहे. पण लायनक्स प्रणाली अस्तित्वात यायच्या अगोदरच ओपन सोर्स चळवळीची सुरुवात झाली होती, जरी तेव्हा तिचे ‘ओपन सोर्स’ असे नामकरण झाले नव्हते. खरे सांगायचे तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेची व्याख्या अधिकृतपणे कोणीही केली नाहीए. या क्षेत्रातल्या विविध मान्यवर व जाणकारांनी आपल्या गरजेनुसार ओपन सोर्सची व्याख्या लवचीक ठेवली आहे. असे असले तरीही कुठल्याही ओपन सोर्स प्रकल्पाची तीन अत्यावश्यक तत्त्वे आहेत; ज्यांचे विवेचन खालील परिच्छेदात केले आहे.

१) प्रथम म्हणजे कोणतीही ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणाली ही ज्या विविध आज्ञावलींपासून बनते, त्या आज्ञावलीचा मूळ कोड (source code) हा त्या सॉफ्टवेअर प्रणालीसोबत एकत्रितपणे वितरित करणे अनिवार्य असते. म्हणजेच दुसऱ्या शब्दात, एखाद्या सॉफ्टवेअर आज्ञावलीमागे असलेले संपूर्ण तर्कशास्त्र हे ते सॉफ्टवेअर वापरणाऱ्या प्रत्येकाला खुले केले जाते, संगणक तंत्रज्ञांना समजेल अशा भाषेत!

२) दुसरे तत्त्व म्हणजे, एखादी ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रणाली जेव्हा वितरित होते, तेव्हा मूळ सॉफ्टवेअर लिहिणाऱ्याला (मग ती व्यक्ती असो वा कंपनी) कोणत्याही प्रकारे कसलेही मानधन अथवा रॉयल्टी देण्याची गरज नसते. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर विकणाऱ्या कंपन्या, सॉफ्टवेअरचे सर्व स्वामित्व हक्क स्वत:कडे राखून अशा रॉयल्टी वा लायसन्सिंग शुल्काद्वारे आपला बराचसा महसूल कमवत असतात. ओपन सोर्स सॉफ्टवेअर कंपन्या अशा पद्धतीने महसूल कमवू शकत नाहीत.

३) आणि तिसरे तत्त्व (ज्याला इंग्रजीत viral clause असेही म्हटले जाते) म्हणजे जगातील कोणत्याही माणसाला ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार बहाल केलेला असतो. पण या अधिकाराबरोबर एक बंधनही असते. ते म्हणजे जर एखादी व्यक्ती किंवा कंपनी हे बदललेले सॉफ्टवेअर पुनर्वितरित करत असेल, तर अशा सॉफ्टवेअरबरोबर बदललेल्या आज्ञावलीचा मूळ कोडसुद्धा एकत्रितपणे वितरित करावाच लागतो.  म्हणजे एकदा एखादे सॉफ्टवेअर ओपन सोर्स म्हणून वितरित केले गेले तर ते त्यानंतर कायमच ओपन सोर्स स्वरूपातच उपलब्ध करून द्यावे लागते; जरी त्यात कितीही मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले तरीही!

ओपन सोर्स प्रणालींच्या या तीन मार्गदर्शक तत्त्वांनी सॉफ्टवेअर उद्योगाचा ढाचाच संपूर्णपणे बदलून टाकला. सॉफ्टवेअर उद्योग ज्या बौद्धिक संपदा हक्क व कॉपीराइट या परंपरागत प्रोप्रायटरी तत्त्वांवर स्थिरावला होता त्या तत्त्वांनाच ओपन सोर्स व्यवस्थेने सुरुंग लावला. म्हणूनच ओपन सोर्स व्यवस्थेच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी रूढीबद्ध व परंपरागत बौद्धिक संपदा हक्क व कॉपीराइटचे तर्कशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे; ज्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ..

अमृतांशू नेरुरकर

amrutaunshu@gmail.com