आता मनाच्या श्लोकांची थोडी व्यक्तिगत पृष्ठभूमीही सांगावीशी वाटते. लहानपणापासून आपण बरीच स्तोत्रं वाचतो, तसे मनाचे श्लोक वाचले जात. अगदी अनेक श्लोक पाठही असत. या मनाच्या श्लोकांना श्रीगोंदवलेकर महाराज यांनी इंजेक्शनची उपमा दिली होती. मनाला उभारी आणणारे, जाग आणणारे आणि दिशा देणारे हे जणू रामबाण औषधच आहे, असं हे सांगण्यामागचा रोख होता. असं असलं तरी श्लोकांचा समग्र अर्थ मनाला भिडत होता, असं म्हणता येत नाही. मग खूप वर्षांनी श्रीसद्गुरूंकडे गेलो. उत्तर प्रदेशातली ती टळटळीत दुपार होती आणि श्रीमहाराज मंदिरात बसले होते. मी तेव्हा मनाच्या श्लोकांचं थोडं चिंतन करीत असे. त्यांनी विचारलं, ‘‘मनाच्या श्लोकांचं काय वेगळेपण जाणवलं?’’ मी म्हणालो, ‘‘अकराव्या श्लोकात एक प्रश्न आहे आणि त्यातच त्याचं उत्तरही आहे.’’ मी श्लोक म्हणून दाखवला.. ‘‘जनी सर्व सूखी असा कोण आहे? विचारी मना तूची शोधूनि पाहे! म्हणजे या जगात सर्वात सुखी असा कोण आहे? तर हे विचारी मना तूच सुखी आहेस.. जे मन विचारी आहे, तेच सुखी आहे!’’ मी थोडय़ा तोऱ्यातच सांगितलं. हसून श्रीमहाराज म्हणाले, ‘‘विचार तर काय कैदीही करतो, वेडाही करतो, कपटी माणूसही करतो.. म्हणून काय ते सुखी असतात? भगवंताचा विचार हाच खरा विचार. बाकी सगळा अविचारच आहे. तेव्हा जे मन भगवंताचा विचार करतं तेच सुखी असतं!’’ श्रीमहाराजांच्या बोलण्यानं मनाच्या श्लोकांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. श्रीसद्गुरू विचारांच्या सत्संगात त्या दृष्टीला मनाच्या श्लोकांच्या नवनव्या अर्थछटा उमगताहेत, असं वाटू लागलं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मग जाणवलं, या मनाला भगवंताचं अधिष्ठान देण्यासाठीच मनाचे श्लोक आले आहेत. कारण मन ज्या विचारांवर अधिष्ठित असतं तसं ते घडत जातं. हीन विचारांच्या पायावर उभं असलेलं मनही कमकुवतच असतं. भक्कम सद्विचाराचा पाया असेल तर मनही भक्कम असतं. समर्थानीही ‘‘भाग्यासी काय उणें रे। यत्नावांचुनि राहिलें। यत्न तो करावा कैसा। तेंचि आधीं कळेचिना।।’’ असं म्हटलंय. यत्न आहे तिथे भाग्य आहे. पण यत्न नेमका कोणता करावा आणि कसा करावा, तेच कळत नाही! हा मुख्य यत्न कोणता आहे? तर ‘‘मुख्य यत्न विचाराचा!’’ विचार हाच मुख्य यत्न आहे. कारण माणसाच्या प्रयत्नांत, त्याच्या वागण्यात त्याच्या विचारांचंच तर प्रतिबिंब असतं. त्यामुळे या मनाला भगवंताच्या विचाराचं अर्थात सद्गुरू बोधाचं अधिष्ठान देण्यासाठी समर्थानी मनाचे श्लोक सांगितले आहेत. मनाच्या श्लोकांची पृष्ठभूमी ही अशी व्यापक आहे. कारण कार्य कालौघात अस्तंगत होतं, पण विचार टिकून राहतो. समर्थानी अनेक मठ स्थापन केले. पण त्यांच्या अवतारसमाप्तीनंतर त्यांचं तेज आणि संख्याबळ ओसरू लागलं आणि हे अगदी स्वाभाविक आहे.  संतही हे जाणतात आणि आपण विचाररूपानं उरणार आहोत, हे सांगतात. समर्थानीही ‘दासबोध’ आणि ‘आत्माराम’ हेच आपलं अक्षरस्वरूप असल्याचं सांगून ठेवलं होतंच. पण तसं पाहता त्यांचं सगळंच साहित्य कालातीतपणे टिकणार आहे. त्यातला विचारच भावी काळातही अनेक तऱ्हेच्या कार्याला  प्रेरणा देणार आहे. मनाच्या श्लोकांच्या विचार संस्कारांद्वारे साधकाचं मन घडविण्याचं असंच उत्तुंग कार्य समर्थ आजही करीत आहेत! साधकाच्या मनाला सद्गुरूमयतेचा खरा आधार दृढपणे घेता यावा, यासाठीच जे श्लोक अवतरले त्यांची सुरुवातही म्हणूनच ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।।’ अशी सद्गुरू वंदनेनं होणं अगदी स्वाभाविक आहे!

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consider rite on manache shlok
First published on: 08-01-2016 at 05:41 IST