काम अर्थात कामना विकारातूनच उत्पन्न होणारा दुसरा विकार म्हणजे क्रोध. ‘दासबोधा’च्या दुसऱ्या दशकातील तमोगुण लक्षणाच्या सहाव्या समासात समर्थ म्हणतात, ‘‘संसारी दु:खसंमंध। प्राप्त होतां उठे खेद। का अद्भुत आला क्रोध। तो तमोगुण।।’’ संसारात दु:ख आलं की मन खेदानं आणि क्रोधानं व्यापून जातं. आता हे ‘दु:ख’ तरी कोणतं? याच मनोबोधाच्या श्लोकात समर्थानी पुढे म्हटलं आहे की, ‘‘न होता मनासारिखे दु:ख मोठे।’’ म्हणजे मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत की माणसाला मोठं दु:ख होतं. याचाच अर्थ कामना अपूर्ती हेच दु:खाचं कारण आहे आणि या कामना अपूर्तीतून होणारं जे दु:ख आहे, त्याला समर्थानी माणसाचं सर्वात मोठं दु:ख म्हटलं आहे. मोठं दु:ख म्हणजे या दु:खाचा प्रभाव माणसावर सर्वात मोठा असतो. हा क्रोध किती घातक असतो, हे समर्थानी याच समासात पुढे सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, ‘‘शेरीरी क्रोध भरतां। नोळखे माता पिता। बंधु बहिण कांता। ताडी तो तमोगुण।। भरलें क्रोधाचें काविरें। पिशाच्यापरी वावरे। नाना उपायें नावरे। तो तमोगुण।।’’  एकदा का हा देह क्रोधानं व्यापला की माणसाची बुद्धीच लोपून जाते. मग तो आई, बाप, बहिण, भाऊ, बायको.. कुणालाच ओळखत नाही, त्यांनाही तो प्रताडित करतो, मारतो! ‘अभंगधारा’चा अपवाद सोडला तर कुठल्याही सदरात प्रासंगिक घटनांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला जातो. याचं कारण अनेक वर्षांनी जेव्हा हे विचार वाचले जातात तेव्हा प्रासंगिक संदर्भ माहीत असतीलच, असं नाही. त्यामुळे शक्यतो सार्वकालिक चिंतनाचाच स्तर कायम राखला जातो. तरी ‘‘शेरीरी क्रोध भरतां। नोळखे माता पिता। बंधु बहिण कांता। ताडी तो तमोगुण।।’’ ही ओवी वाचली तेव्हा गेल्याच आठवडय़ात एका तरुणानं रागाच्या भरात घरातल्या चौदाजणांची केलेली हत्याच डोळ्यांपुढे आली. तेव्हा हा क्रोध म्हणजे जणू तमोगुणाचं प्रकट रूप. आता हा क्रोध कृतीतून जसा प्रकट होतो, त्यापेक्षा अधिक तो वाणीद्वारे प्रकट होतो. कृतीद्वारे क्रोध प्रकटतो तेव्हा दुसऱ्याला शारीरिक इजा पोहोचवली जाऊ शकते. वाणीतून तो प्रकटतो तेव्हा मानसिक हिंसा घडते. ही हिंसाच सर्वाधिक प्रमाणात होते आणि तीच सर्वाधिक प्रमाणात प्रभावही टाकते. पुन्हा प्रासंगिक संदर्भात पाहिलं तर, आज आमच्या दृश्य माध्यमांची सूत्रं जणू क्रोधाच्या हाती गेली आहेत आणि समाजालाही क्रोधाच्याच एकांगी वळणावर ती कसं नेत आहेत, ते जाणवेल! आणि माणूस जेव्हा साधनापथावर चालू लागतो तेव्हा क्रोधाबाबत तो सजग होऊ लागतो. कृतीतून व्यक्त होणाऱ्या क्रोधावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न तो करू लागतो. असं असलं तरी बोलण्यातून दुसऱ्याला दुखावताना जी मानसिक हिंसा होते, त्या हिंसेची मात्र तो तितकासा सजग नसतो. समर्थानी ‘दासबोधा’च्या बाराव्या दशकात फार सुंदर मार्गदर्शन केलं आहे. ते म्हणतात, ‘‘कठिण शब्दें वाईट वाटतें। हें तों प्रत्ययास येतें। तरी मग वाईट बोलावें तें। काये निमित्य।। आपणास चिमोटा घेतला। तेणें कासाविस जाला। आपणावरून दुसऱ्याला। राखत जावें।। जे दुसऱ्यास दु:ख करी। ते अपवित्र वैखरी। आपणास घात करी। कोणियेके प्रसंगीं।। पेरिलें तें उगवतें। बोलण्यासारिखें उत्तर येतें। तरी मग कर्कश बोलावें तें। काये निमित्य।।’’ आपल्याशी कुणी कठोर बोललं तर वाईट वाटतं, ही गोष्ट प्रत्ययाचीच आहे. दुसऱ्याला कठोर बोलताना मात्र त्या प्रत्ययाचं पूर्ण विस्मरण होतं. आपल्याला चिमटा घेतला तर जीव कासावीस होतो, मग दुसऱ्याला चिमटा का काढावा? दुसऱ्याचं मन दुखावणारी वैखरी अपवित्र आहे. ती आपलाही घात करते. पेरावं तसं उगवतं. वाईट शब्द पेरले तर आपल्या पदरातही वाईट शब्दांचंच पीक पडेल! क्रोधानं क्रोधच वाढत जाईल!!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasbodh book
First published on: 08-03-2016 at 05:04 IST