राजपुत्र ध्रुव आणि ऋषिपुत्र उपमन्यू या दोन बालभक्तांच्या कथांचा संकेत समर्थानी केला आहे आणि त्या कथांमध्येही काही रूपकं आणि काही संकेत दडले आहेत! या दोघांनाही त्यांच्या आईनं सांगितलं की, ‘देवाची भक्ती आपण केली नाही म्हणून हे दु:ख वाटय़ाला आलं आहे.’ दोघंही निरागस होते म्हणून त्यांना ते पटलंच, पण हे दु:ख दूर करण्याच्या उपायाकडेही ते म्हणूनच निग्रहानं आणि विश्वासानं वळले. मोठे असते, तर कदाचित त्यांनी, भक्ती न केल्यानं दु:ख देऊ  करणाऱ्या देवावरच टीका केली असती किंवा तो नाहीच, या ठाम समजुतीनं त्याचं दर्शन हीदेखील कल्पनाच आहे, हे गृहीत धरून सगळा जन्म जगाच्या भक्तीतच घालवला असता! लहानपणी भातुकली खेळताना रिकाम्या लाकडी बोळक्यातला भातही खराच वाटतो, मग न दिसणारा देव तरी खोटा का वाटावा? दोघं मोठे असते तर कदाचित भातुकलीसारखा प्रपंचही खराच वाटला असता का आणि खरी साधना भातुकलीच्या खेळासारखी खोटीच वाटली असती का? देवच जाणे! आता ध्रुव कथेतली रूपकंच पाहा. राजाचं नाव आहे उत्तानपाद! म्हणजे जीव जन्माला आला तो भगवंताच्या भक्तीसाठी. प्रत्यक्षात त्याची चाल उन्नतीकडे नाही, तर अवनतीकडे आहे. ही चाल उन्नत नाही तर उत्तान आहे.. आणि म्हणूनच त्याला ‘सुनीती’ प्रिय नाही, तर ‘सुरुची’ म्हणजे आपल्या मनाच्या ओढीनुसारची आवड, रुचीच प्रिय आहे. जे श्रेय आहे ते प्रिय नाही आणि जे प्रिय आहे ते श्रेयसाधक नाही. त्यामुळे त्या सुरुचीला सुनीतीशी संबंधित असलेली कोणतीच गोष्ट कुठून आवडणार? बाळ ध्रुवासारख्या निरागस, सरळ वृत्तीला व बुद्धीला हृदयसिंहासनावर स्थान मिळणं तिला कुठून रुचणार? पण अखेर हीच सूक्ष्म बुद्धी जर भक्तीकडे वळली तर अढळपद प्राप्त करते. म्हणजेच जे शाश्वत आहे त्याचीच प्राप्ती करून देते. ध्रुव जसा भगवंताच्या शोधासाठी तात्काळ राजमहालाचा त्याग करून वनात गेला आणि तपसिद्ध झाला, त्याप्रमाणे जर या सूक्ष्म बुद्धीच्या योगे माणसाला शुद्ध वैराग्याचा स्पर्श झाला तरच ही परमप्राप्ती होते. उपमन्यूची कथा काय सांगते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर साधं गाईचं दूधही ज्या दारिद्रय़ामुळे वाटय़ाला आलं नाही ते दारिद्रय़ भगवंताच्या भक्तीच्या अभावी वाटय़ाला आलं आहे, ही जाणीव उपमन्यूला झाली. म्हणजे गाईचं दूध न मिळणं हे एक निमित्त होतं. दारिद्रय़ हे त्यामागचं कारण होतं.. आणि भगवंताच्या भक्तीचा अभाव हे मूळ कारण होतं! मग उपमन्यू थेट भक्तीकडेच वळला. आपल्या जीवनात जो काही अभाव आहे तो दूर करायचा असेल तर भावसंपन्न करणारी भक्ती हाच एकमेव उपाय आहे. त्या भक्तीचंच बीज रोवलं पाहिजे, हे उपमन्यू आपल्याला सुचवतो. अभाव कुणाला आवडतो? अर्थात कुणालाच नाही. माणूस अपूर्ण आहे, पण पूर्ण होण्यासाठीच तर त्याचा जन्म आहे! त्यामुळे जन्मभर पूर्ण होण्याकडेच प्रत्येक जीवमात्राची वाटचाल सुरू आहे. मात्र खरं पूर्णत्व कोणत्या प्राप्तीनं लाभेल, हे उमजत नसल्यानं अपूर्ण वस्तू आणि अशाश्वत व्यक्तींच्या संग्रहासाठीच आपली अविरत धडपड सुरू असते.  जे आपल्याकडे या घडीला नाही ते मिळालं की आपण पूर्ण सुखी होऊ , या भावनेनं जीव ऐहिकातली अपूर्णता संपविण्यासाठी धडपडत आहे. मात्र कितीही मिळालं तरी जोवर मिळालेली प्रत्येक गोष्ट कालांतराने अपूर्ण वाटते तोवर पूर्ण समाधान लाभणं अशक्य! जेव्हा ही जाणीव होईल तेव्हाच अभावाचं जे मूळ कारण म्हणजे भक्तिहीनता ते दूर करण्याकडेच जीव वळेल. तेव्हा  या भक्तीसाठी भौतिकातला जो अभाव कारणीभूत ठरला त्याचंही विस्मरण त्याला होईल आणि भक्तीतच तो बुडून जाईल. मग त्याचं हृदय म्हणजे दग्ध अंत:करणाला शांत करणारा भक्तीरूपी दुग्धसागरच होईल!

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotion to god
First published on: 31-07-2017 at 01:21 IST