‘श्रीमनाचे श्लोक’ अर्थात ‘मनोबोधाचे श्लोक’ अवतरित होण्यास कोणते आध्यात्मिक निमित्त कारणीभूत ठरले, ते आपण पाहिलं. पण मुळात समर्थानी मनालाच बोध करण्यामागे आणखी काही दूरगामी हेतू होता का? निश्चितच! याचं कारण समर्थ यत्नवादी, पुरुषार्थवादी होते, अनेकानेक चळवळींचे उद्गाते होते, सामाजिक आणि राजकीय शक्ती चेतवणारे होते, त्यांनी अनेक मठ स्थापले, मंदिरे स्थापली, महंत घडविले तरीही तरीही या सर्वाची कालगत मर्यादाही ते जाणून होते. कालप्रवाहात राजेरजवाडे अस्तंगत होतील, मठही नामशेष होतील, उत्तुंग व्यक्तिमत्त्व येतील आणि जातील, मोठमोठय़ा संस्था उभ्या राहतील आणि अस्तंगतही होतील, पण माणसाचं मन, त्या मनाची घडण, त्या मनाच्या क्षमता आणि उणिवा आणि त्या मनाशी सुरू असलेला त्याचा संघर्ष सृष्टीच्या अंतापर्यंत कायम तसाच राहील आणि म्हणूनच या मनाची जडणघडण जोवर होणार नाही तोवर समाजमनही खऱ्या अर्थानं एकसंध आणि सक्षम होणार नाही, हे सत्य सर्वच संतांप्रमाणे तेही जाणून होते. माणसाचं मन निर्भय, नि:शंक व्हायला हवं असेल तर भगवंताच्या आधाराशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे भगवंताचा तो आधार मनाला दृढपणे कसा पकडता येईल आणि मनाचं न-मन करून आंतरिक शक्ती कशी प्रकट करता येईल, याचा बोध हे एक युगप्रवर्तक कार्यच होतं. मनाच्या जडणघडणीची गरज मन आहे तोवर अर्थात सृष्टीच्या अंतापर्यंत भासणार आहे. त्यामुळेच समर्थानी मनालाच बोध केला. त्यावेळच्या परिस्थितीच्या परिशीलनातूनही हेच सत्य समर्थाना निश्चितच जाणवलं आहे. काय होती ती परिस्थिती?
वयाच्या बाराव्या वर्षी समर्थ पंचवटीजवळच्या टाकळी गावी आले. तिथं गोदावरीच्या पात्रात बारा वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. तिथंच गोमय हनुमंताचं मंदिर स्थापलं आणि त्या मंदिरासमोरील जमिनीखालील विश्रांतीस्थानी जगाच्या उद्धाराचंच अविश्रांत चिंतन केलं. परचक्राचं सावट भयकारी रूप घेत होतं. आक्रमकांच्या अत्याचाराच्या कहाण्याही कानी येत होत्या. त्यातूनच त्या गुंफेतील विचारयज्ञातून स्वातंत्र्याची अग्निशलाका उद्भवली असावी. पण जोवर माणसाचं मन स्व-तंत्र होत नाही तोवर खरं स्वातंत्र्य आणि खरं स्व-राज्यही नाही, हेही समर्थ जाणून होते. म्हणूनच स्वराज्याचा पाया भक्कम करायचा असेल तर माणसाच्या मनाचा पायाही पक्का हवा, हे समर्थ जाणून होते. तिथून मग समर्थ देशाटनास निघाले ते तब्बल बारा वर्षे भ्रमंती करीत होते. समर्थ साहित्याचे आर्त अभ्यासक शंकरराव देव यांना समर्थ साहित्यात १०२९ गावांची नोंद असलेला कागद सापडला आहे. आसेतुहिमाचल विखुरलेल्या या सर्व गावी समर्थानी अल्प ते दीर्घकाल मुक्काम केला होता. या मुक्कामांदरम्यान शेकडो गावं त्यांनी पालथी घातली होती, यातही शंका नाही. गावं म्हणजे नुसती घरंदारं-शेतवाडय़ा नव्हेत. रस्ते आणि गल्ल्या नव्हेत. गावं म्हणजे गावातली जितीजागती माणसं. त्या माणसांची मनंच समर्थानी वाचली. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीच्या हेलकाव्यात भ्रामक निश्चिंती आणि भ्रामक भीती अनुभवणारी.. आपल्याच क्षमतांचा विसर पडलेली आणि आपल्याच उणिवांच्या सापळ्यात अडकून त्यांची गुलामी भोगणारी मनं.. ‘सामथ्र्य आहे चळवळीचे’ हे जरी खरं तरी त्याला भगवंताचं अधिष्ठान आवश्यक आहे, हे समर्थ जाणत होते. म्हणूनच मग सर्वात चळवळ्या अशा मनाला भगवंताचं अधिष्ठान देण्यासाठीच मनोबोध आवश्यक होता! समर्थ त्यासाठीच सरसावले.
चैतन्य प्रेम

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !