उपासनेनं माणूस निर्वासन अर्थात वासनामुक्त होत गेला पाहिजे. प्रत्यक्षात ही उपासनाच नव्या रूपात चंचुप्रवेश करीत अहंकार जोपासू लागते. या जाळ्यातून सुटायचं तर खरा सत्संगच हवा. समर्थही सांगतात, ‘‘तीर्थे व्रतें तपें ज्यालागी शिणावें। त्यासी कां नेणावें विवेकानें।।’’ तीर्थ, व्रत, तपाची सारी धडपड ज्या गोष्टीसाठी करायची ती विवेकानंच का जाणून घेऊ नये? म्हणजेच या तीर्थ, व्रत, तपाची दगदग तरी वाचेल! आता इथं तीर्थ, व्रत किंवा तपाचं महत्त्व कमी लेखलेलं नाही, पण खऱ्या सत्संगाशिवाय खरी तीर्थयात्रा कोणती, खरं व्रत कोणतं आणि खरं तप कोणतं, हे उमगत नाहीच. आणखी एके ठिकाणी समर्थ स्पष्ट सांगतात, ‘‘सर्व धर्म कर्म हातीचें सांडावें। सत्वर धुंडावें शाश्वतासी।। शाश्वतासी ठाईं पाडावें विवेकें। निरूपणें येके साधुसंगें।।’’ (दोन्ही दाखले – स्फुट प्रकरणे, समर्थ ग्रंथ भांडार, संपा. ल. रा. पांगारकर.) म्हणजे जे धर्म कर्म हाती घेतलं आहे ते सोडून द्या आणि शाश्वत तत्त्वाचा शोध त्वरेनं घ्या. आता इथंही धर्म-कर्माचं महत्त्व कमी लेखलेलं नाही, मात्र शाश्वताच्या आधाराशिवाय खरा धर्म आणि खरं कर्मही जाणता येत नाही. या शाश्वत तत्त्वाचा आधार कसा मिळवावा, याचं आकलन, ग्रहण हे विवेकानंच होऊ शकतं आणि हा विवेक सत्संगाशिवाय उमगत नाही! थोडक्यात वासनेच्या जाळ्यांतून सुटायचं तर खरा सत्संगच हवा. सत् जे आहे त्याचा संग हवा. प्रत्यक्ष सद्गुरूंचा संग शक्य नसेल तरी एक आंतरिक सत्संग या घडीला सुरू करता येतो. तो सत्संगच पुढील चरणापासून समर्थ उकलत आहेत.. समर्थ म्हणतात, ‘‘मना सर्वथा पापबुद्धी नको रे। मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सारवीचार राहो।।’’ हे मना, वासना दुष्ट आहे हे ऐकून माहीत झालं, पण तिच्यातून सुटणं एवढं सोपं नाहीच. त्यासाठी या तीन चरणांत तीन गोष्टी समर्थानी साधकाला सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पापबुद्धीनं वागू नकोस. दुसरी गोष्ट म्हणजे नीतीचा त्याग क्षणमात्र करू नकोस आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंत:करणात सदोदित सार काय आणि असार काय, याचा विचार करीत राहा. आता या गोष्टी पूर्णत्वानं साधणं हे खऱ्या सत्संगाशिवाय अशक्य आहे, पण इथेच याच तीन चरणांतून एक आंतरिक सत्संगही समर्थ उलगडून दाखवत आहेत. पहिला सत्संग आहे पापबुद्धीचा आधार सोडण्याचा, अर्थात सद्बुद्धीचा आधार घेण्याचा! आता मोठा प्रश्न असा की, पाप नेमकं कशाला म्हणावं? हे सगळे प्रश्नही अगदी अनादि कालापासून माणसाला पडत आलेत बरं का! तर पाप कशाला म्हणावं? पापबुद्धी म्हणजे दुर्बुद्धी कशाला म्हणावं? परत इथे श्रीगोंदवलेकर महाराजांच्या वचनाचा आधार घ्यावासा वाटतो. आपल्या या चिंतनात श्रीगोंदवलेकर महाराजांच्या वचनांचा आधार असा वारंवार येईल. श्रीसमर्थ आणि श्रीगोंदवलेकर महाराज यांच्यातला आंतरिक दुवा ज्यांना माहीत आहे, त्यांना त्यात काही गैरही वाटणार नाही. तर श्रीमहाराज काय म्हणाले? ‘‘भगवंतापासून दूर नेते ती दुर्बुद्धी!’’ या एका व्याख्येतून अवघ्या चिंतनाची वाट कशी उजळून निघते! आणि याच व्याख्येच्या आधारावर म्हणता येईल की भगवंतापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच पाप! आणि भगवंताच्या जवळ नेते ती प्रत्येक गोष्ट म्हणजे पुण्य!! पाप आणि पुण्याच्या व्याख्याजंजाळातून किती अलगद सुटता येतं पाहा.. आता हे भगवंताच्या जवळ होणं आणि भगवंतापासून दूर होणं हे सारं आंतरिक आहे बरं का. तर अंत:करणातून भगवंताच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण करणाऱ्या पापाचरणाची वकिली करणारी, त्यात आसक्त असलेली बुद्धी हीच पापबुद्धी. ती सोडायला समर्थ सांगत आहेत.
-चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas swami manache shlok
First published on: 12-02-2016 at 04:01 IST