साधनारत राहाणं हा गुण आहे, पण अनंत दोष आणि विकार असताना नुसत्या साधनेनं ते कसे दूर होतील? ते आपणच दूर नकोत का करायला? असे प्रश्न साधकाच्याही मनात उत्पन्न होतात. ‘मनोयोगा’तच त्याचं उत्तर आलंही आहे. २९व्या श्लोकाच्या विवरणात आपण पाहिलं होतं की, जो सद्गुरूबोधानुरूप जगण्याचा अभ्यास करीत आहे आणि साधनारत आहे त्याच्या विकाररूपी शत्रूंकडे त्या परमात्म्याचंच लक्ष आहे! एकदा गुरुजींना म्हणालो, ‘‘माझ्यात किती विकार आहेत. ते आधी दूर करायला नकोत का?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘विकार संपवण्यामागे लागशील तर आयुष्य संपेल, पण विकार संपणार नाहीत! त्यापेक्षा मी सांगतो तेवढं करीत जा, मग त्या विकारांकडे मी पाहीन!!’’ तेव्हा विकार सोडण्याची धडपड करीत राहाण्यापेक्षा नाम घेण्याची धडपड करीत गेलो तर हळूहळू विकारांकडे असलेली सहजप्रवृत्ती मावळू लागेल. नाम घेऊ लागताच मनात वाईट विचारांचं मोहोळ उठतं. त्यावरही महाराजांनी फार सुरेख सांगितलंय. त्याचा आशय असा की, एखाद्या खड्डय़ात स्वच्छ पाणी जोरात टाकत गेलं की आतलं खराब पाणीच प्रथम बाहेर येऊ लागतं ना? तेव्हा आधी आपल्या वागण्यातला वाईटपणा जाणवतही नव्हता. विकारांचा अडसर उमगतही नव्हता. अंतरंगातील दोष हे व्यावहारिक गुणच वाटत होते. साधना करीत गेल्यानं केवळ त्यांचं खरं रूप जाणवू लागलं! साधना करीत गेल्यानंच आपल्यातला संकुचितपणा, तापटपणा, हेकेखोरपणा, अहंकार हे सारं सारं जाणवू लागलं आणि ते दोष दूर होत नाहीत, या जाणिवेनं तळमळही वाढू लागली तर ते यश तोडक्यामोडक्या साधनेचंच असतं! तेव्हा माझ्यातल्या एखाद्या क्षीण गुणाचा आधार घेत सद्गुरू मला साधनेच्या क्रमाकडेच वळवतात. कारण दोष अनंत असतात, गुण एखादाच असतो. त्या एखाद्या गुणाचा उपयोग ते ठिणगीसारखा करतात आणि मग त्या गुणाचं कौतुक करीत, त्या गुणाची ठिणगी फुलवू लागतात! ती ठिणगी फुलली की मग अंतरंगातील अनेक दोषांना ती जाळू लागते! म्हणजे एखाद्या गुणाचं सद्गुरू कौतुक करीत असतील आणि त्या गुणाला चालना देत असतील, तर मग हळुहळू आपल्यातल्या दोषांचीही जाण वाढू लागते. त्या दोषांची लाज वाटू लागते. सद्गुरूंना आवडतील असे अनंत गुण आपल्यात यावेत, अशी आस लागते. आपल्या ज्या गुणाचं कौतुक सद्गुरू करीत आहेत त्या गुणाचाही तोकडेपणा उमगू लागतो. म्हणजे तो गुणही खरंतर पूर्णपणे माझ्यात नसताना आपण त्या गुणाचं बाह्य़दर्शन मी केवळ घडवतो, हे जाणवू लागतं. माझ्यातला गुणदेखील माझ्यातल्या सात्त्विक अहंकाराचा आधार बनतो, हे जाणवतं. त्या गुणातूनही कर्तेपणा कसा चिकटतो, हे जाणवतं. त्यातूनही मग साधना अधिक सजगतेनं होऊ लागते. ही सर्वच प्रक्रिया फार सूक्ष्म आहे. ती घडविणारे श्रीसद्गुरू अकर्तेपणानंच  जगात वावरतात. कर्तेपण भगवंताकडे देऊन त्याचं दास्य कसं करावं, हेच शिकवत राहातात. सेवेचा अखंड ध्यास ज्याला असतो तोच खरा दास असतो. तो ध्यास ज्या भक्तीनं साधतो ती भगवंताची भक्ती शिकवणारे सद्गुरू हे त्या सर्वोत्तमाचे सर्वोत्तम दास आहेत.. म्हणूनच तर, ‘‘जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।’’ असं समर्थ सांगतात आणि हा जो परमसेवेचा ध्यास आहे त्याचंच वर्णन मग पुढील श्लोकात करतात.. मनोबोधाचा हा ४८वा श्लोक या सेवेची परमावधि दर्शवितो आणि सेवारत असताना आंतरिक धारणाही शिकवतो. हा श्लोक असा आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 13-10-2016 at 03:50 IST