समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनोबोधा’च्या बाराव्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळात देहबुद्धीनं अडकून माणूस जे दु:ख भोगत आहे त्याचा प्रथम संकेत आहे. हा पूर्ण श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा :
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे।।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी।। १२।।
प्रचलित अर्थ : हे मना, चित्तात दु:खाचंच चिंतन करीत कढत बसू नकोस. हे मना शोक आणि चिंता यांना कदापि थारा देऊ नकोस. दु:ख, शोक आणि चिंता या तिन्ही गोष्टी देहबुद्धीमुळेच उत्पन्न होतात म्हणून विवेकानं देहबुद्धी सोडून आणि आपण देहातीत आनंदस्वरूप आहोत, हे जाणून मुक्तीचं सुख भोग.
आता या श्लोकाच्या मननार्थाकडे वळू. या श्लोकाचा पहिला चरण ‘मना मानसीं दु:ख आणूं नको रे’ हा दु:खाचा उल्लेख करतो आणि ‘मना सर्वथा शोक चिंता नको रे’ हा चरण शोक आणि चिंतेचा उल्लेख करतो. मानसशास्त्रीयदृष्टय़ाही ही गोष्ट अगदी क्रमसंगत आहे बरं का! आता हे तिन्ही शब्द फार रहस्यमय आहेत. हे तिन्ही तीन काळांचा संकेत आहेत. माणूस जे प्रतिकूल घडून गेलं त्या भूतकाळातील गोष्टींचा शोक करतो, जे प्रतिकूल घडत आहे त्या वर्तमानातील गोष्टींचं दु:ख करतो आणि भविष्यात जे प्रतिकूल घडू शकतं, असं त्याला वाटतं त्याची चिंता करतो. आता भूतकाळात जे दु:खद घडून गेलं ते जर मनानं कायम जपत राहिलो तर त्या दु:खाचं मनावरचं ओझं वाढतच राहातं. ‘दासबोधा’त समर्थ सांगतात, ‘‘जेणें करितां दु:ख जालें। तेंचि मनीं दृढ धरिलें। तेणें गुणें प्राप्त जालें। पुन्हा दु:ख।।’’ (दशक ५, समास ३, ओवी क्र. १००). असं असूनही माणूस या शोक, दु:ख आणि चिंतेच्या पकडीतच जगत राहातो. समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी एका श्लोकाचा उल्लेख केला आहे. तो असा : ‘‘गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत्। वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणा:।।’’ म्हणजे जे घडून गेलं त्याचा शोक करू नये, भविष्यकालीन गोष्टींची चिंता करू नये आणि वर्तमानकाळातही वाटय़ाला आलेली प्रतिकूलता भोगताना दु:ख करू नये आणि चित्त स्वस्वरूपी लावावे. आता हे आपल्याला साधत नाही कारण चिंता आपल्याला स्वाभाविक वाटते, निश्चिंत होणं अपवादात्मक वाटतं. पण ते साधावं, यासाठी समर्थ प्रथम सांगतात ते ‘‘मना मानसीं दु:ख आणूं नको रे!’’ इथे मनालाच सांगितलं आहे की, दु:ख आणू नकोस! आणि ते कुठे आणू नकोस तर मानसी! आता मानसी या शब्दाचा एक अर्थ आहे मन आणि दुसरा अर्थ म्हणजे मनाची धारणा, मनातला विचार. आपण म्हणतो ना, ‘‘माझा मानस असा आहे..’’ तर, तुझ्या जगण्यात दु:ख असलं तरी तुझ्या धारणेवर, विचारक्षमतेवर त्या दु:खाला स्वार होऊ देऊ नकोस. कारण मन जर दु:ख भोगतानाही दु:खापासून अलिप्त राहायला शिकलं तर ते दु:ख धीरानं भोगता येईल आणि ती दु:खकारक परिस्थिती बदलण्याचा विचारही योग्यपणे करता येईल. दुसरा चरण सांगतो ते, ‘‘मना सर्वथा शोक चिंता नको रे।।’’ शोक आणि चिंता सर्वथा म्हणजे कधीही करू नकोस. याचं कारण उघड आहे. दु:ख हे वर्तमानातलं असतं, पण शोक आणि चिंता यांना खरं तर अस्तित्व उरलेलं नसतं. जे घडून गेलं त्याचा शोक करून काही उपयोग नसतो. ते बदलता येत नाही आणि जे घडणार आहे ते नेमकं घडेलच, याचीही शाश्वती नसताना जी चिंता लागते तिचाही काही उपयोग नसतो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 29-04-2016 at 03:15 IST