सूर्याच्या अस्तित्वानं या जगातील जीवन प्रवाहित होतं, पण मुळात या सूर्याचं अस्तित्व कोणामुळे आहे? या चराचरातील प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व हे दुसऱ्या गोष्टीच्या उत्पन्न होण्याचं, स्थितिशील होण्याचं आणि अस्तंगत होण्याचं कारण आहे. पण मुळात उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांच्या या क्रमवारीचं आणि त्यासाठी जीवमात्राला निमित्त करण्याचं ‘कर्तेपण’ कुणाचं आहे? अनंत तऱ्हेच्या जीवजंतूंपासून अवाढव्य प्राण्यांपर्यंतची, अनंत तऱ्हेच्या झाडा-फुलांची, ऋतुमानाची तसेच विविध क्षमता लाभलेल्या माणसांपर्यंतची ही सृष्टी कोणी निर्माण केली?  या प्रश्नांवर थोडा विचार केला तरी जाणवतं की याचा कर्ता ‘मी’ नक्कीच नाही! या विराट आणि अद्भुत सृष्टीत मी केवळ आहे आणि माझं हे असणंदेखील माझ्या हाती नाही, इतकं माझं कर्तेपण सामान्य आहे! हा जो चराचराचा कर्ता, नियंता, धर्ताहर्ता आहे त्याला माणसानं ईश्वर किंवा परमशक्ती या रूपात मानलं. जे नास्तिक आहेत आणि नास्तिक असण्यात काही गैरही नाही; त्यांनी जीवनशक्तीकडे हे कर्तेपण सोपवलं. ही जी जीवनशक्ती आहे तिच्याशी आपली आंतरिक लय साधावी, हा जो ईश्वर आहे त्याचा साक्षात्कार व्हावा, ही इच्छा जेव्हा माणसाच्या मनात उत्पन्न झाली तेव्हा या चराचराच्या अस्तित्वामागील सत्याचा वा रहस्याचा शोध सुरू झाला. ज्यांना हे परमसत्य गवसलं आणि जे त्या परमसत्याच्या व्यापक धारणेत सहजस्थित होऊन माणसाला त्या सत्याकडे वळवू लागले, त्यांना अवतार म्हणून, ईश्वराचा दूत म्हणून, प्रेषित म्हणून श्रद्धा आणि विश्वासपूर्वक स्वीकारलं गेलं. आजही असा जो आहे तोच खरा सद्गुरू म्हणून अभिप्रेत आहे. तर त्या खऱ्या ‘कर्त्यां’ची जाणीव मनात उत्पन्न करणारा, त्या जाणिवेनुसार जगण्याची कला शिकवत जीवाचं संकुचित जगणं व्यापक करणारा खरा कर्ता सद्गुरूच! श्रीसद्गुरूंच्या ‘कर्ते’पणाचं हे आकलनही खरं तर मर्यादितच आहे, हे  समर्थानी ‘मनोबोधा’च्या अगदी अखेरच्या टप्प्यात स्पष्ट नोंदलं आहे. पण त्यासाठी ९८ श्लोक आपल्याला धीर धरावा लागेल! तर अशा सद्गुरूंची माझ्या जीवनावर सत्ता असताना मी माझ्या गुणगानात आणि स्वयंस्तुतीपर कीर्तनात का रममाण व्हावे? आता हे ‘गुणगान’/ ‘कीर्तन’ म्हणजे  काय, हे समजलं नाही तर गोंधळ होईल. हे गुणगान आणि कीर्तन म्हणजे ‘हरी हरी’ करीत निष्क्रिय बसण्याची शिकवण नाही. विद्यार्जनासाठीचा ब्रह्मचर्याश्रम, वंशनिर्मितीतील सहभागासाठीचा अर्थात प्रजनन, पोषण, संवर्धन यासाठीचा गृहस्थाश्रम आणि पुढील पिढीही जबाबदाऱ्या पेलण्यासाठी समर्थ व्हावी, यासाठी मनानं निवृत्त होण्याचा अभ्यास असा वानप्रस्थाश्रम ज्या संस्कृतीनं मांडला ती निष्क्रियता कशी शिकवील? तर मग हे ‘हरिकीर्तन’ आणि ‘गुणगान’ काय आहे? तर ‘मी’चा अहंभाव आणि त्याची जपणूक यातूनच जे समस्त भवदु:ख आणि भवभय निर्माण झालं आहे त्या ‘मी’चाच निरास करून समस्त भवभयाचं हरण करणारा खरा श्रीहरी जो सद्गुरू, त्याच्या बोधाचं श्रवण आणि मनन करून तो आचरणात उतरवणं हे खरं ‘हरिकीर्तन’ आहे! त्यांचे गुण अंगी बाणविण्याचा अभ्यास हे खरं ‘गुणगान’ आहे!! बघा, अंगापिंडानं अगदी लेच्यापेच्या असलेल्या माणसानं व्यायामानं शरीर कमावण्याच्या महत्तेचं गुणगान केलं तर ते कसं वाटेल? अगदी त्याचप्रमाणं स्थूल माणसानं उपास-तापासाचं गुणगान केलं, तर कसं वाटेल? तेव्हा सद्गुरुंचं गुणगान करायचं असेल तर निदान त्या गुणांना विपरीत जगणं थांबवावं लागेल! माझ्या प्रत्येक कृतीतून भौतिकाची भूक दिसत असताना सद्गुरूंच्या वैराग्यशील वृत्तीचं गुणगान माझ्या तोंडी शोभेल का? माझ्या प्रत्येक कृतीतून अहंभावाचे दर्शन होत असताना त्यांच्या निरहंकारी वृत्तीच गुणगान माझ्या तोंडी साजेल का? तेव्हा माझ्या कृतीतून त्यांच्या कर्तेपणाची जाण आणि भान प्रकटलं तर खरं ‘कीर्तन’ आणि खरं ‘गुणगान’ साधू लागेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 05-01-2017 at 02:39 IST