सद्गुरूंवर विश्वास ठेवलात की तुमच्या सर्व चिंता तो दूर करील, अशी कोणतीही हमी ‘मनोबोधा’च्या ७८व्या श्लोकात समर्थानी कुठेही दिलेली नाही! या श्लोकातला ‘बाधिजे’ हा शब्द आपणच नीट वाचत नाही, त्यामुळे ही गफलत होते! सद्गुरूंवर विश्वास ठेवला, एवढय़ानं संकटं दूर होणार नाहीत, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे अडचणी आपोआप ओसरणार नाहीत. त्या असतील, पण त्या बाधणार नाहीत! भगवंतानं अडचणी दूर केल्या नाहीत, त्या सोसतही भक्ती करीत असलेल्याला जवळ केलं! संत सखूच्या अडचणी पांडुरंगानं संपविल्या नाहीत, पण तिच्याबरोबर जातं फिरवलं! बहुतांश संतांचं जीवन हालअपेष्टा, अवमान, अपमान, विरोध यांनीच भरलं होतं. त्या दूर झाल्या नाहीत, पण भगवंताच्या जवळ येण्यानं मन त्यांच्या प्रभावापासून दूर झालं. ही भगवंताची जी जवळीक आहे ती आंतरिकच आहे. आपलं अंत:करण भगवंतापाशी चिकटलं की चिंतेची पकड सुटू लागते. जे अंत:करण चिंतेनं सदोदित व्याप्त होतं ते परम भावानं व्यापू लागताच हा पालट होऊ  लागतो. हा पालट सद्गुरुंच्या बोधानुरूप आचरण साधल्याशिवाय होऊच शकत नाही. तो बोध ग्रहण करायचा तरी त्यांच्या सांगण्यावर किमान विश्वास ठेवावाच लागतो. निसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘पहिलं पाऊल टाकण्यापुरता तरी विश्वास ठेवा, पुढचं पाऊल तुम्हीच विश्वासानं टाकाल!’’ तेव्हा या विश्वासाची सुरुवात आहे ती प्रथम पहिलं पाऊल टाकण्यापुरती. हे पहिलं पाऊलच सांगतं की, नुसती चिंता करणं व्यर्थ आहे, चिंता सोडून दे! प्रयत्न सोडू नका, झगडणं सोडू नका.. पण चिंतेनं खचत राहणं सोडून द्या! कारण अडचणी बाधक नसतात, आपली चिंतासक्त होण्याची सवयच बाधक असते. कारण ही सवयच मनाला खच्ची करीत असते. सद्गुरू मनाची ही सवयच तोडत असतात. एखादा पोहायला शिकत असतो तेव्हा त्याच्या मनात पाण्यात पहिली उडी मारण्याचीच भीती असते. ती भीती घालविण्याचीच पहिली शिकवणी पोहोणं शिकवणाऱ्याला घ्यावी लागते. अगदी त्याचप्रमाणे जगात वावरताना जीवनातील द्वंद्वाला सामोरं कसं जायचं, हेच आपल्याला कळत नसतं. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडाव्यात, हीच आपली सदोदितची इच्छा असते. पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाजोगती घडत नाही. गोष्टी मनाप्रमाणे घडल्या तर त्यांची आसक्ती वाटू लागते. लोभ, मोह, दुराग्रह, हट्टाग्रह यांना वाव मिळतो. गोष्टी मनाप्रमाणे घडल्या नाहीत की क्रोध, मत्सर, द्वेष यांना वाव मिळतो. महाराजांचा एक मार्मिक प्रश्न आहे की, ‘गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, हे दु:खाचं कारण आहे की ती गोष्ट मनात आहे, हेच दु:खाचं कारण आहे?’ तेव्हा बरेचदा आपल्या मनातल्या आसक्तीमुळेच, दुराग्रहामुळेच आपल्या जीवनात नाहक संघर्ष उद्भवत असतो. तो टाळायचा तर मनाचा स्वभावच बदलावा लागतो. हा स्वभाव बदलावा याच हेतूनं सद्गुरू आज्ञा करीत असतात. मनाच्या स्वभावाला छेद देणाऱ्या या आज्ञा पाळणं सोपं नसतंच. गुरुजीही सांगतात की, ‘सद्गुरू आज्ञापालन हीच सर्वात मोठी तपश्चर्या आहे!’ तेव्हा त्यांच्या सांगण्यानुसार वागू लागलो तरच जीवनातील संकटांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहता येईल. संकटांना सामोरं जातानाही मन अधिक स्थिर, शांत राहू लागेल. थोडक्यात या संकटांची बाधा जाणवणार नाही! मग जो सद्गुरू मुक्तीचा दाता आहे त्याच्याकडे मी सामान्य चिंतांचं गाऱ्हाणं का मांडावं, असं समर्थ विचारत आहेत. आता ही मुक्ती कोणती? तर जगत असतानाच, सर्व तऱ्हेच्या सम-विषम परिस्थितीला तोंड देत असतानाही मनाची जी मुक्त, स्वतंत्र स्थिती टिकते, तीच खरी मुक्ती आहे. त्यासाठी, ही स्थिती लाभावी यासाठी काय करायला हवं आणि ही स्थिती लाभण्यात नेमकी अडचण कोणती येते, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ७९व्या श्लोकात सांगणारच  आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 11-01-2017 at 03:50 IST