देहच मी, या कल्पनेच्या प्रभावातून सुटण्यासाठी त्या देहाचा मनावरचा प्रभाव सुटला पाहिजे. तो सुटण्यासाठी देहापलीकडे मनाला नेणारा अभ्यास पाहिजे. त्यामुळेच देह जरी माझा असला तरी मी म्हणजे केवळ देह नाही, या धारणेचा अभ्यास प्राथमिक स्तरावर करायला हवा. मग देह माझा असल्यानं त्याची आवश्यक ती काळजी घेणं, त्या देहाच्या क्षमता योग्य प्रकारे प्रकट होतील या रीतीनं त्या देहाची जोपासना करणं, यात काही गैर नाही. मात्र मी म्हणजे केवळ देह नाही. देहच काय हे मन, ही बुद्धी, हे चित्त हे सारंदेखील मी नाही. मन माझं आहे, पण मी म्हणजे मन नाही. बुद्धी माझी आहे, पण मी म्हणजे बुद्धी नाही. तेव्हा माझं जे आहे त्यापलीकडे मी असलो पाहिजे. तो खरा मी, शुद्ध मी कोणता, याचा शोध घेण्याच्या इच्छेतूनच तर आपली पावलं या मार्गाकडे प्रथम वळली. मग सत्याचाच शोध घ्यायचा असेल तर जगण्यातलं जे भ्रामक आहे, मिथ्या आहे ते सुटलं पाहिजे. वाणीनं का होईना, सत्याचाच आधार आधी घेतला पाहिजे. मग समर्थ सांगतात की आपल्या अंतरंगात भ्रामक देहबुद्धीतून प्रसवणाऱ्या सर्व कल्पना याच खऱ्या मिथ्या आहेत, मायेचे ते जणू दोर आहेत. म्हणून त्यांचा विलय झाला पाहिजे. त्यांचा त्याग साधला पाहिजे. तो कसा साधेल? मनात सदोदित प्रसवणाऱ्या कल्पना कशा ओसरतील? तर त्या नामानं ओसरतील. सत्याशी सदोदित जोडलेल्या, सत्यापासून क्षणभरही विभक्त नसलेल्या नामातून आपणही सत्याशी जोडले जाऊ. जे नामसाधक नाहीत, त्यांनी इथे सद्गुरूंनी सांगितलेली साधना, हा अर्थ गृहीत धरावा. तर सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेतच सत्याच्या आकलनाचं बीज असतं. त्यांच्या सांगण्यानुरूप साधना आणि त्यांच्या बोधानुरूप जगणं जेव्हा सुरू होतं, तेव्हाच जगण्यात सार काय आणि असार काय, सत्य काय आणि मिथ्या काय, वास्तविक काय आणि भ्रामक काय, याची समज वाढू लागते. जीवनातील घटनांकडे थोडं अलिप्तपणे पाहणं साधू लागतं. त्यामुळे त्या प्रसंगांच्या संगानं त्यामागे वाहवत जाणं कमी होऊ लागतं. मनाच्या आवेगांनुसार दुसऱ्याच्या क्रियांवर तात्काळ प्रतिक्रिया उमटणं कमी होऊ लागतं. तरी मायेची ताकद काही कमी नसते! माया कधी आपल्याला वेढून टाकील, याचा नेम नसतो. त्या धोक्याचंच वर्णन मनोबोधाच्या २०व्या श्लोकात आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा :
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं।
नको रे मना यातना तेचि मोठी।
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी।।२०।।
प्रचलित अर्थ : हे मना, मिथ्या प्रपंचातून विरक्त होण्यास आणखी एक कारण ऐक.. अरे, जन्मकाळच्या यातना किती आहेत पाहा.. आईच्या उदरी नऊ महिने अत्यंत दु:खकष्ट काढावे लागतात. गर्भात असताना चहूंकडून जीव कोंडला जाऊन नुसता उकडून निघतो. अधोमूख स्थितीतील त्या बाळकाला तर अत्यंत वेदना सोसाव्या लागतात.
या श्लोकाचा जो गूढार्थ आहे तो मोठा विलक्षण आहे. साधनपथावर वाटचाल सुरू झालेल्या साधकाला एकदम आईच्या पोटातल्या यातना का बरं सांगाव्यात? ज्याला जीवनातलं मिथ्य सोडायला आणि सत्याचं बोट धरायला सांगितलं आहे त्याला एकदम जन्मकाळच्या वेदनांचं वर्णन का ऐकवावं? बरं, आपला प्रत्येकाचा जन्म झाला असला तरी त्या जन्मकाळच्या वेदनांचं ‘स्मरण’ आपल्याला या क्षणी आहे का? मग जर ते स्मरणच नाही तर त्या वेदनांचं दु:ख किती मोठं आहे आणि ते चुकविण्यासाठी तरी प्रपंचातून विरक्त झालंच पाहिजे, हे तरी प्रकर्षांनं कसं पटेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 03-06-2016 at 03:13 IST