बुद्धी, भावना आणि क्रियाशक्ती या तीन गोष्टींची जोड हे मनुष्य जीवनातलं मोठं वैशिष्टय़ आहे. या तिन्हीच्या साह्यानं माणूस खरं तर व्यापकतेकडे वाटचाल करू शकतो. असं असताना प्रत्यक्षात मात्र या तिन्हींचा वापर माणसानं आपला संकुचितपणा पोसण्यासाठीच केला. आपला ‘मी’पणा जपण्यापुरतं आणि वाढविण्यापुरतं या तिन्ही क्षमतांना त्यानं सतत राबविलं. त्यामुळे ज्या आत्मज्ञानानं हा ‘मी’ मावळावयाचा आहे, त्या आत्मज्ञानासाठी आताची त्याची बुद्धी, भावनाक्षमता आणि क्रियाशक्ती निश्चितच निरुपयोगी आहे. त्याकरिता बुद्धी, भावना आणि क्रिया म्हणजेच विचार, उच्चार आणि आचार ही त्रयी शुद्ध झाली पाहिजे, व्यापक झाली पाहिजे. म्हणजे कसं? बुद्धी काय करते? तर बुद्धी ही निर्णय करते. निर्णय प्रक्रियेचा आधार विचार हाच असतो. आता सार काय आणि असार काय, याचा विचार करून जे सारतत्त्व आहे, जे योग्य आहे, शाश्वतनिष्ठ असं जे आहे, त्याची निवड बुद्धीच्या योगे होणं अपेक्षित आहे. पण आपली बुद्धी निर्लिप्त राहून, मोकळी राहून सार काय आणि नि:सार काय, याचा विचार करते का? तर नाही! बुद्धी ही मूलत: स्वतंत्र असणं अभिप्रेत असलं तरी ती मनाच्या ताब्यात असते. मन कसं आहे? ते देहाशी जन्मजात चिकटलेलं आहे, त्यातही विशेष भाग असा की या देहानं ज्या ‘मी’चं जीवन धारण केलं आहे, तो ‘मी’ ही या देहाची ओळख ठरली आहे. ‘मी’ म्हणजेच देह आणि देह म्हणजेच ‘मी’! या ‘मी ‘ची जी ओळख आहे त्या परिघातच मन जखडून आहे. या परिघाच्या जपणुकीशी मनाच्या समस्त भावना जखडल्या आहेत. मनाच्या या भावना व्यक्त झाल्याशिवाय राहात नाहीत. हे व्यक्त होणं म्हणजेच ‘उच्चार’ आहे. आता बुद्धी ही मनाच्या ताब्यात आहे. अर्थात विचारक्षमता ही भावना क्षमतेच्या ताब्यात आहे. त्यामुळे सार काय आणि निस्सार काय, हे बुद्धी मनाच्या भावनेनुसार ठरवते आणि मनाला वाटतं तेच कसं सार किंवा असार आहे, हे मांडण्यासाठी वकिली करते! मग या मनोभावांनुसार जे हवं-नकोपण आहे ते साधण्यापुरती म्हणजे हवं ते मिळवणं व टिकवणं आणि नको ते टाळणं, यापुरती माणसाची क्रियाक्षमता वापरली जाते. अर्थात माणसाचा आचार म्हणजेच आचरण, हे मनोभाव जपण्याच्या विचारानुसारच होत राहतं. म्हणजेच बुद्धी, भावना आणि क्रियाक्षमतेच्या जोरावर माणूस सत्, रज आणि तम या त्रिगुणांच्या जोखडातून मुक्त होऊ  शकत असताना या तिन्ही क्षमतांचा वापर करीत तो या त्रिगुणांमध्ये रुतत चालला आहे. हे त्रांगडं कसं सोडवायचं? तर त्यासाठी विचार (बुद्धी), उच्चार (मनोभाव) आणि आचार (क्रिया) शुद्ध होण्यावाचून गत्यंतर नाही. विचार आणि उच्चार म्हणजेच बुद्धी आणि मनोभाव जर शुद्ध झाला तर आचार अर्थात क्रियाही अशुद्ध राहणार नाही! त्यासाठी देहभावात जखडलेल्या बुद्धीतली सद्बुद्धी जागी करावी लागेल. विचारांचं अविचारात होणारं रूपांतर थांबवावं लागेल. त्या विचारांचं रूपांतर चिरस्थायी सद्विचारांत करावं लागेल. देहभाव पोसण्यापुरता भावनाक्षमतेचा सुरू असलेला गैरवापर थांबवावा लागेल. मनोभावांतली सद्भावना जागी करावी लागेल. त्याचबरोबर देहभावाच्या ओढीतून सुरू असलेल्या क्रियांना सत्क्रियेकडे वळवावं लागेल. ही सर्वच प्रक्रिया व्यापक आणि अत्यंत सूक्ष्म आहे. त्यासाठी व्यापक आणि सूक्ष्म अशा नामाचाच आधार अनिवार्य आहे! हे नाम साधकाला हळूहळू त्याच्या जगण्यातल्या गुंत्याबाबत सावध करू लागतं. मन कुठं आणि कसं अडकत आहे त्याबाबत सजग करतं. एवढय़ानं गुंता सुटत नाही, अडकणं थांबत नाही.. पण सूक्ष्म धारणेत बदल घडविण्याची व्यापक प्रक्रिया सुरू झाली असतेच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 27-04-2017 at 04:04 IST