‘दासबोधा’च्या बाराव्या दशकाच्या पाचव्या समासाचा प्रारंभच विलक्षण आहे. त्यात समर्थ म्हणतात, ‘‘रेखेचें गुंडाळें केलें। मात्रुकाक्षरीं शब्द जाले। शब्द मेळऊन चाले। श्लोक गद्य प्रबंद।।’’ म्हणजे अक्षरं कशी लिहीली जातात? तर रेषा वळवून! म्हणजेच रेषेच्या गुंडाळ्यातून अक्षरं झाली, त्या अक्षरांपासून शब्द झाले आणि त्या शब्दांच्या मेळ्यातून श्लोक, गद्य, प्रबंध असं विपुल साहित्य तयार झालं. पू. बाबा बेलसरे यांनी या ओवीच्या अनुषंगानं केलेल्या चिंतनात म्हटलं आहे की, ‘‘मूळ एका ओमकारातून सृष्टी निर्माण झाली. ओमकार नादरूप आहे. शब्द, अक्षरे, भाषा, संगीत सर्व नादरूप आणि ध्वनिरूप आहे. तात्पर्य सृष्टीत पुष्कळ भेद आढळला तरी त्याचं मूळ अभेदात आहे.’’ (सार्थ दासबोध) . तर रेषेपासून शब्द झाले, पण त्या रेषेचा प्रारंभही तर एका बिंदूपासून झाला! आणि त्या बिंदूच्या ठिपक्याआधीही निराकारच तर आहे! एका बिंदूपासून रेषा, रेषेपासून अक्षरं, अक्षरापासून शब्द आणि शब्दांपासून विपुल साहित्य; असा हा पसारा आहे आणि त्या पसाऱ्याचं मूळ एका बिंदूत आणि त्या बिंदूचं मूळ निराकारात आहे! तेव्हा पसाऱ्याच्या मुळाशी जे निराकार तत्त्व आहे ते जाणायचं तर पसाऱ्यात गुरफटणं थांबवून त्या मूळ बिंदूपाशी परतलं पाहिजे. ‘पंचीकरण योग’ नावाचं समर्थाचं एक फार सुंदर लघुप्रकरण आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘नादाचे शब्द होताती। शब्दाचा नाद होतसे। नाद शब्द मुळीं नाहिं। तें ब्रह्म जाणती भले।। १।।’’ काय सुरेख आहे पहा! नादातून शब्द उत्पन्न झाला आणि त्या शब्दालाही विशिष्ट नाद आहे! पण या नाद आणि शब्दापलीकडे ज्याला जाता आलं, त्याला खऱ्या अर्थानं ब्रह्म म्हणजे सर्वत्र असूनही सर्वातीत असं व्यापक तत्त्व उमगलं! मग म्हणतात – ‘‘रेखेचेनि सुन्य होतें। सुन्यापासुनी येकला। येक सुन्य मुळीं नाहिं। तें ब्रह्म जाणती भले।।२।। ’’ काय विलक्षण रूपक आहे.. म्हणतात, रेखेपासूनच शून्य काढलं जातं.. ०..आणि त्या शू्न्याच्या कडेनंच तीच रेघ खाली ओढली की एक तयार होतो.. १.. म्हणजे शून्यातून, निराकारातून तो एक परमात्माच आकारला आहे आणि या अनंत आकारांत तोच एक भरून आहे.. पण जे या साकार आणि निराकारापलीकडे जातात त्यांनाच साकार आणि निराकारापलीकडे असलेल्या व्यापक तत्त्वाची उकल होते.. म्हणजे आपलं बोलणं ज्या नाद आणि शब्दांवर आधारित आहे त्यांचा खरा उगम किती व्यापक आहे आणि त्याच वाक् शक्तीचा आपण किती संकुचित गोष्टींसाठी व्यर्थ वापर करीत असतो! मग जर ते व्यापक तत्त्वच सद्गुरू रूपात साकारलं आहे आणि त्या सद्गुरूबोधातच जीवन गुंफायचं आहे, तर साधकानं किती दक्षतेनं जगलं पाहिजे! तेव्हा ‘‘न बोलें मना राघवेंवीण कांहीं। जनीं वाउगें बोलतां सूख नाही।।’’ या चरणाची पृष्ठभूमी अशी विराट आहे. बरं बोलण्याची क्रिया बोलणाऱ्यावरही अनेक प्रकारचे आंतरिक संस्कार करीत असते. आपण बोलत असतो तेव्हा अंतरंगातील अनेक भावही अचानक जागे होतात. कधी क्रोध जागा होतो आणि मग त्या क्रोधाच्या प्रवाहाबरोबर कठोर बोलण्याचा प्रवाहच जणू सुरू होतो. कधी निराशा जागी होते आणि मग सारं बोलणं हे निराशेनंच भारून जातं.. क्रोधीष्ट होऊन आपण जे बोलतो त्याचे गंभीर परिणाम तर होतातच, पण आपल्या मनावरही त्याचे नकारात्मक परिणाम खोलवर होतात. अनावश्यक, संकुचित असं जे जे बोललं जातं त्याचे तसेच संकुचित संस्कार मनावर होतात. थोडक्यात आपण जसं बोलू लागतो तसे त्याचे भले-बुरे संस्कार मनावर होत असतात. त्यामुळे जर एक सद्गुरूच बोलण्याचा विषय झाला तर? आपल्याला हे अवास्तव वाटतं ना? पण बोलण्याच्या आणखी एका व्यापक स्तरावर ते सहज शक्य आहे बरं का!
-चैतन्य प्रेम