निगर्वतिा आणि जगातल्या लौकिकाबद्दलची उदासीनता ही सद्गुरूंची दोन लक्षणं झाली. आता पुढचं लक्षण म्हणजे ‘क्षमाशांती भोगी’! म्हणजे तो क्षमाशील आणि शांतिदाता असतो, हा याचा सर्वसाधारण अर्थ आहे. त्याचबरोबर ‘भोगी’ हा शब्दही फार वेगळा आहे. तो क्षमाशांती भोगतो त्याचप्रमाणे क्षमाशांतीही त्याच्याशी सदैव एकरूप असते! या सृष्टीतील क्षमाशीलतेचा आणि परमशांतीचा तो आधार आहे, स्रोत आहे, उगम आहे. त्यांच्या अंत:करणाची क्षमाशीलता अपरंपार आहे. गुरुजींशी जेव्हा जेव्हा दूरध्वनीवरून बोलणं होई तेव्हा त्यांचं सांगणं मी ऐकता ऐकताच भराभर लिहून घेत असे. काही महिन्यांनी ती वही मी वाचायला घेतली तेव्हा जाणवलं की, आपले आध्यात्मिक बुरख्याआड लपणारे भौतिकाचे प्रश्नही तेच तेच, रडगाणंही तसंच, विकारशरणता आणि विकारप्रियताही नित्याचीच, तरी गुरुजींच्या प्रत्येक समजावण्यात कधीही पुसटसाही त्रागा नाही! तेच तेच सतत समजावणं आणि अत्यंत आत्मप्रेमानं! दुसऱ्याला जर एखादी गोष्ट पुन:पुन्हा सांगावी लागली तर आपण किती चिडतो! पण इथं सततच्या चुकांना सततचं समजावणं.. अगदी शांतीपूर्वक, क्षमापूर्वक. आणि हे समजावणं अनंत काळाचं.. साईबाबा शामाला काय म्हणाले? की, ‘‘गेले ७४ जन्म मी तुझ्याबरोबर आहे!’’ शामाला कुठं ते जन्म आठवत होते? पण सद्गुरूंनी जन्मोजन्मी साथ सोडली नाही, हेच दिसतं ना? श्रीकृष्णांनीही अर्जुनाला हेच सांगितलं, ‘‘हे पार्था गेले कित्येक जन्म मी तुझ्यासोबत आहे. तुला ते जन्म आठवत नाहीत, पण मला ते माहीत आहेत!’’ तर प्रत्येक जन्मी मला सहवास देणाऱ्या आणि मला मोह-भ्रमाच्या दलदलीतून बाहेर काढण्याचे कष्ट अविरत भोगणाऱ्या सद्गुरूची क्षमाशीलता आणि परमशांती किती अमर्याद आहे, हे मला कसं समजणार? क्षमा आणि शांतीसह अभिन्न असते ती दया! पण सद्गुरूंचा जो दयाभाव आहे त्याची पातळी किंवा त्याचं स्वरूपच खूप वेगळं आहे. तो नुसता दयावंत नाही तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे तो ‘दया दक्ष योगी’ आहे! हल्ली लहान मुलानं जरा हट्ट केला की त्याच्या हाती मोबाइल किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांचं निवडयंत्र (रिमोट) तात्काळ सुपूर्द केलं जातं. हा दयाभाव नव्हे. सद्गुरू निव्वळ दया करीत नाही. दया करतानाही तो त्याच्या मूळ हेतूबाबत सदैव दक्ष असतो, जागृत असतो. माझा आध्यात्मिक अध:पात करणारी दया तो कदापि करीत नाही. त्यासाठी माझ्या नजीकच्या भौतिक हानीचीही पर्वा करीत नाही. रुग्णाला अपथ्यकर जे आहे ते खाऊ दिलं, तर त्याला आत्ता सुख मिळाल्यासारखं वाटेल.. असं देत राहाणारा गुरूच त्याला खरा ताकदीचा वाटेल.. पण त्यानं तो रोग अधिक वाढेल आणि जीवित धोक्यात आणेल. त्यामुळे रोग्याला अपथ्यकर ते खाऊ न देणं, हीच त्याच्यावरची खरी दया आहे. म्हणूनच सद्गुरूही भवरोगग्रस्त असलेल्या मला भौतिकात प्रमाणाबाहेर गुंतू देत नाहीत. त्यामुळे या घडीला मला कितीही दुख झालं तरी ते त्याची पर्वा करीत नाहीत. माझ्या आध्यात्मिक हिताचीच त्यांना सर्वदा चिंता असते. मी मात्र भौतिक यशातच कृपेचा खरेपणा जोखण्याचा करंटेपणा करीत राहतो. ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी,’ असं आळवताना माझ्या आशाळभूत मनात भौतिकात अशक्य वाटणारी गोष्ट ‘स्वामीकृपे’नं शक्य होईल, हाच भाव उमटत असतो. मला अशक्य वाटणारी आध्यात्मिक उन्नती त्यांच्या कृपेनं शक्य होईल, असं मात्र कधीही वाटत नाही! अशी आपली गत आहे. सद्गुरू मात्र दयेबाबत दक्ष असतो. माझ्या आध्यात्मिक वाटचालीला बाधा येणार नाही इतपतच भौतिकाच्या प्राप्तीसाठी तो मला साह्य करतो. जो शिष्याची भौतिकासाठीची प्रत्येक मागणी पूर्ण करीत राहतो तो गुरूही अपूर्णच असतो.. दक्ष नव्हे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 18-10-2017 at 01:46 IST