या चराचरातला प्रत्येक जीवमात्र हा भयाच्या पकडीत आहे. प्रत्येकाच्या जन्मासोबतच मरणभयाचाही जन्म झाला आहे. केवळ मनुष्यप्राणी मात्र असा आहे, की ज्याला मरणाहूनही काही वेळा जगण्याचीच अधिक भीती वाटते.. आणि म्हणूनच त्याला त्याच्याचसारख्या परिस्थितीत निर्भयतेनं जगणाऱ्या संतांचं अप्रूप वाटतं. ही निर्भयता आपल्यालाही लाभावी, या भावनेनं तो त्यांच्याकडे आकर्षित होतो. पण संत निर्भय का असतात? कारण ते अनंताला पाहतात! त्यांचा समस्त जीवनव्यवहार हा व्यापक शाश्वत नित्य अशा भगवंताशी जोडला गेलेला असतो. ‘मी’ आणि ‘माझे’च्या संकुचित भावनेचा त्यांना कधी स्पर्शही होत नाही. त्यांच्या दृष्टीला सर्वत्र केवळ एक भगवंतच दिसतो! त्यामुळे त्या भगवंताला, त्या अनंताला, जो एकवार पाहतो त्याला अन्य, दुजं असं काही दिसतच नाही.. समर्थ म्हणतात की, ‘‘जया पाहतां द्वैत कांहीं दिसेना। भय मानसीं सर्वथा ही असेना!’’ आणि जरी जीवनातलं समस्त द्वैत मावळावं आणि आप-पर भाव उरू नये, हे ध्येय असलं, तरी ते संतांनाच फक्त सहज साधतं किंवा जे त्यांच्या बोधाशी एकरूप आहेत त्यांनाच साधतं, हे लक्षात ठेवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती स्थिती आली नसताना त्या स्थितीचं ढोंग करता येत नाही किंवा केलं तरी ते टिकत नाही. रमण महर्षीना एकानं विचारलं की, ‘‘दुसऱ्यांशी मी कसं वागू?’’ महर्षी तात्काळ उद्गारले की, ‘‘या जगात दुसरं कुणी नाहीच!’’ थोडक्यात जगात केवळ एक परमात्माच भरून आहे, ही धारणा होणं. मी स्वत: ‘मी’पणाच्या खोल धारणेत बुडून जगतो आणि त्यामुळे या ‘मी’व्यतिरिक्त जे जे उरतं ते परकं वाटतं. त्या परक्यातही मग अनुकूल आणि प्रतिकूल, जवळचे आणि दूरचे, लाभदायक आणि धोकादायक, सुखकारक आणि दु:खकारक, असे अनेक स्तर पडतात आणि द्वैत पक्कं होत जातं. संतांना मात्र सर्वच आपले वाटतात आणि त्यामुळे सर्वावरच त्यांचं एकसमान प्रेम असतं. शरीराचा एखादा भाग रोगग्रस्त असला तर जसं संपूर्ण शरीराला पूर्ण निरोगी मानता येत नाही, त्याप्रमाणे एक जरी जीव भगवंतापासून विलग असला तरी संपूर्ण चराचर पूर्ण तृप्त होऊ  शकत नाही. याच भावनेनं संत प्रत्येक मनुष्यमात्राला व्यापक तत्त्वाकडे वळवीत असतात. त्यांच्या निर्भय, नि:शंक स्थितीकडे पाहून, आपणही त्यांच्यासारखं निर्भय व्हावं, असं माणसालाही वाटतं. त्या निर्भयतेच्या प्राप्तीसाठी तो सज्जनांकडे वळतो. संतजन त्याला सांगतात की, ‘‘बाबा रे! द्वैतभावानं जगात वावरत असल्यानं तूच अनेक द्वंद्वं निर्माण केली आहेस. त्यामुळेच भीतीच्या जाळ्यात तू सापडला आहेस. केवळ भगवंतच खरा आहे, या धारणेनं त्याला सत्यत्व दे. ज्या गोष्टीवर विसंबावं ती गोष्ट टिकत नाही, हा अनुभव आहेच. ना व्यक्ती अखेपर्यंत एकसमान राहते, ना वस्तू राहते, ना परिस्थिती!

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 30-10-2017 at 03:56 IST