मनात इच्छा उत्पन्न होते आणि त्यात गुणांचाच मुख्य वाटा असतो. गुण म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. कसंही झालं तरी सुख मलाच मिळावं, त्यासाठी वाटलं तर दुसऱ्याचं सुख हिरावायला लागलं तरी चालेल, ही तमोगुणाची प्रवृत्ती असते. जे मिळवायचं ते स्वबळावर मिळवेन आणि त्यासाठी उदंड प्रयत्न करीन, ही रजोगुणाची प्रवृत्ती असते. विहित मार्गानं जे मिळेल तेच मिळवायचं आणि ते मर्यादा राखून भोगायचं, ही सत्त्वगुणाची प्रवृत्ती असते. तमोगुणी हा अत्यंत संकुचित आणि प्रसंगी दुसऱ्याची पर्वा न करणारा असतो. रजोगुणी हा स्वकेंद्रित असतो खरा, पण आपल्याबरोबर दुसऱ्याचंही भलं झालं तर ते करणारा असतो. सत्त्वगुणी हा संकुचितपणा सोडू पाहणारा आणि समष्टिच्या हिताची चिंता वाहणारा असतो. सर्व जगच आनंदानं भरावं, ही त्याची इच्छा असते. तर माणसाचा जसा गुण तशी इच्छा आणि तशी वृत्ती असते. आता कुणीही माणूस पूर्णपणे एकाच गुणाचा नसतो. तर त्यात गुणप्रधानता असते. म्हणजे एखादा सत्त्वगुणप्रधान असतो, पण त्याच्यात.. त्याच्या वागण्यात, जीवन व्यवहारात रजोगुण आणि तमोगुणाचाही प्रत्यय अधेमधे येत असतो. एखादा रजोगुणप्रधान असतो, पण त्याच्याही जीवन व्यवहारात सत्त्वगुण आणि तमोगुणाचा प्रत्यय अधेमधे येत असतो. एखादा तमोगुणप्रधान असतो, पण त्याच्याही जीवनात सत्त्वगुण आणि रजोगुणाचा प्रत्यय अधेमधे येत असतो. तर जो गुण प्रधान आहे त्याचा प्रभाव माणसाच्या वृत्तीवर पडतो आणि त्यानुसारच त्याचं मन, चित्त, बुद्धी यांची जडणघडण होत असते. त्याच्या कल्पना, धारणा, विचार त्यानुसारच स्थिरावत असतात. जसा गुण तशी वृत्ती आणि जशी वृत्ती तशी इच्छा, असा क्रम असतो. सत्त्वगुणप्रधान व्यक्तीची वृत्ती सात्त्विक असते आणि त्यानुसार त्याच्या इच्छाही सात्त्विक अधिक असतात. रजोगुणप्रधान व्यक्तीची वृत्ती राजसी असते आणि त्यानुसार त्याच्या इच्छाही कर्तृत्वाकडे, प्रयत्नांकडेच झुकणाऱ्या असतात. तमोगुणप्रधान माणसाची वृत्ती तामसी असते आणि त्यानुसार त्याच्या मनात उद्भवणाऱ्या इच्छा या तामसी अर्थात प्रसंगी दुसऱ्याचं अनहित करून आपला स्वार्थ साधण्याभोवती केंद्रित झालेल्या असतात. जे पाहिलं आणि मनाला भावलं त्यावर आपलाच कब्जा असावा, ही इच्छा त्याच्या मनात क्षणोक्षणी उत्पन्न होत असते. तमोगुणप्रधान आणि रजोगुणप्रधान माणसाच्या मनातल्या इच्छा या त्याला कर्मचक्रात अधिक गुंतवतात हे खरं, पण सत्त्वगुणप्रधान माणसाच्या मनातल्या सात्त्विक इच्छाही अखेर सात्त्विक अहंकाराचंच सुप्त पोषण करीत त्याला अडकवतात. तेव्हा गुण कोणताही असो, त्याच्या पकडीतून सुटल्याशिवाय अध्यात्माच्या मार्गावर खरी वाटचाल सुरूच होऊ शकत नाही.. आणि गुणांच्या पकडीतून सुटायचं तर त्याला जो गुणातीत आहे त्याचाच आधार घ्यावा लागतो. जोवर असा आधार मिळत नाही तोवर गुणांच्या पकडीतून सुटका नाही. जोवर गुणांच्या प्रभावातून सुटका नाही तोवर वृत्तीची तशीच घडण होण्यापासून सुटका नाही आणि जोवर वृत्तीची घडण गुणांच्याच चौकटीत जखडलेली आहे तोवर इच्छांचा प्रवाहही तसाच राहणार आणि अखेर माणसाच्या मनावर अंमल गाजवणार. या इच्छांमुळे, या वृत्तीमुळे आणि या गुणांमुळे माणसाचा ‘मी’ अधिकाधिक पक्का होत गेला आहे. या ‘मी’पणामुळे जी जुनी ठेव आहे, जे आत्मसुख आहे ते अगदी जवळ असूनही, स्वत:चं असूनही त्याला मिळत नाही.  त्या सुखापासून तो पारखाच राहतो. त्यामुळे जो गुणातीत आहे अशा जाणत्याचे पाय धरायला समर्थ सांगत आहेत. ‘मनोबोधा’चा पुढील म्हणजे १४१वा श्लोक हा त्या ‘जाणत्या’कडेच नेणारा आहे आणि ‘मनोबोधा’चा हा मुख्य विषय आणि चरमबिंदू आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 09-11-2017 at 03:25 IST