पहिलीपासून नव्हे, बालवाडीपासूनच मुलाला शिक्षक लागतो. एखादी कला शिकायलाही त्या कलेतला वाकबगार असा कोणीतरी शिकवणारा लागतो. एखादं वाद्य वाजवायला शिकायचं असेल, तरी ते वाद्य शिकवणारा गुरू लागतो. गाणं शिकायचं असेल, तर त्यातल्या उस्तादाकडूनच गंडा बांधून घ्यावा लागतो.  एखादी भाषा शिकायची तर भाषाशिक्षक लागतो. एखादं तंत्रज्ञान आत्मसात करायचं, तर तंत्रशिक्षक लागतो.. या सर्व गोष्टी कशा शिकाव्यात, याची पुस्तकं असली किंवा अगदी आजच्या अत्याधुनिक युगाप्रमाणे विविध संकेतस्थळांवरही हे शिकण्याची सोय असली तरीही खरं शिक्षण त्यातून साधत नाही. खऱ्या गुरूसमोर बसून, त्याच्या सहवासात राहूनच या कला आत्मसात करता येतात. साध्या भौतिक कला, ज्ञान यांची ही गत, तर मग जे मूळ शुद्ध आत्मज्ञान आहे ते आत्मसात करण्यासाठी गुरूची गरज नाही, हे कसं शक्य आहे?   जन्मापासून जो ‘मी’पणा माझ्या जगण्यात ओतप्रोत भरून आहे त्याचा प्रभाव दूर होऊन जगणं निर्लेप होण्याचा अभ्यास माझा मी कसा करू शकेन? अर्थात ते शक्य नाही. ज्यांना असं वाटतं त्यांना समर्थ त्रिवार सांगतात, ते शक्य नाही. तुमच्या बळावर तुमचं तुम्हाला कवडीचंही काही कळणार नाही, नाही, नाही! ‘कळेना कळेना कळेना’ मग म्हणतात, ‘ढळेना’. काय ढळणार नाही? तर संशय ढळणार नाही. एका मित्राला कर्नाटकात नोकरी मिळाली. कानडी कसं बोलाल, हे शिकवणारी काही पुस्तकं त्यानं मिळवली आणि अभ्यास सुरू केला. पण तरीही आपण बोलतो ते वाक्य खरंच तसंच आहे का, आपले उच्चार बरोबर आहेत का, हा संशय काही मिटला नव्हता. ऐनवेळी बोलताना जो प्रश्न विचारायचा आहे किंवा जे उत्तर द्यायचं आहे तेच आपण बरोबर विचारत वा देत आहोत ना, ही शंकाही पूर्ण मिटली नव्हती. जेव्हा मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा उत्तम बोलणाऱ्याची भेट झाली तेव्हा त्याच्या सहवासात त्यानं कन्नडचा सराव सुरू केला. पुस्तकापेक्षा ते सोपं झालंच, पण त्याचं कानडी बोलणं सतत कानावर पडून पडून त्यालाही बोलताना आत्मविश्वास आला. तर अध्यात्मज्ञानाची पुस्तकं अनंत आहेत, आत्मसाक्षात्कार कसा साधालं, हे सांगणारी पुस्तकंही बरीच आहेत. जगापासून मनानं मोकळं कसं होता येईल, हे तत्त्वचिंतनही वाचायला मिळेल, पण म्हणून ते आचरणात येईल थोडंच? वाचायला जे आवडलं, वाचताना जे सोपं वाटलं ते जगताना साधलं नाही, तर त्या ज्ञानाचीही शंका येईलच ना? पण जेव्हा खऱ्या सत्संगाचा लाभ होतो तेव्हा हा संशय लोप पावू लागतो. कारण जगण्यात ज्ञान कसं सहजतेनं विलसत असतं, हे प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असतं! तर स्वबळावर वाचीव ज्ञान कितीही आत्मसात केलं, तरी त्या ज्ञानाबाबतही संशय निर्माण व्हावा, असे प्रसंग घडतील आणि हा संशय स्वबळावर कधीच ढळणार नाही, असं समर्थ स्पष्ट करतात. असं आत्मज्ञान वाचून खूप कमावलं, पण त्यानं आपल्या स्वत:च्या थोरपणाविषयीही कल्पना निर्माण होतील! आपला अहंकार अधिकच पोसला जाईल. आपल्याला गहन ज्ञान शब्दांनी समजत असल्याचा, ते उत्तम बोलता येत असल्याचा, त्या जोरावर दुसऱ्याचा प्रतिवाद करता येत असल्याचा अहंकार सहजतेनं चिकटेल. म्हणून समर्थ म्हणतात, ‘‘गळेना गळेना अहंता गळेना।’’ हा अहंकार वाढतच जाईल तो गळून पडणार नाही. तेव्हा खरं ज्ञान काय, ते कळणार नाही. त्या ज्ञानाबाबतचा संशयही ढळणार नाही आणि त्या अर्धवट ज्ञानानंसुद्धा जो अहंकार वाढत जातो तो गळून पडणार नाही. मग समर्थ म्हणतात, ‘‘बळें आकळेना मिळेना मिळेना।।’’ अरे! हे आत्मज्ञान तर बळे मिळवता येणार नाहीच, पण त्या ज्ञानाचा जो स्रोत, जो उगम, जो आधार आहे तो सद्गुरूदेखील बळे मिळणार नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 14-11-2017 at 02:28 IST