जुन्या दासबोधात ‘रघुनाथ चरित्र’ प्रकरणात समर्थ म्हणतात, ‘‘कां प्रपंचीं होती थोर आघात। तेणें चित्त होय दुश्चित्त। देहासी आपदा होती अत्यंत। तरी रामासी विसरूं नये।।’’ या चरणात एक उपरोध आहे आणि तो आपल्यातल्या प्रपंचासक्तीवर बोट ठेवणारा आहे, असं गेल्या भागात सांगितलं. काय आहे तो उपरोध? समर्थ सांगतात, प्रपंचात थोर आघात होतात तरी तो प्रपंच आपण सोडतो का? या देहावर मोठमोठी रोगराईची संकटं येतात, तरी तो देह आपण त्यागतो का? अर्थात प्रपंचातल्या संकटांनी प्रपंचातली गोडी सोडतो का? प्रकृतीच्या चढउतारांनी देहातली आसक्ती सोडतो का? तसं जर करीत नसू, तर मग साधनेतल्या अडचणींमुळे साधना का सोडतो? साधनेत चालढकल का करतो? तेव्हा प्रपंचात कितीही चढउतार येऊ देत, त्या चढउतारांपायी साधनेत व्यत्यय येऊ देऊ नका..  रामाला अर्थात सद्गुरूंना विसरू नका.. अर्थात सद्गुरूंनी सांगितलेला बोध आणि त्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास सोडू नका. तर या नेमाची सुरुवात वैखरी जपानं आहे ना? म्हणून समर्थ सांगतात, ‘‘जप नेमिला तो चुकों नेदावा। त्या वेगळा सर्वदा स्मरावा। मळत्यागींही न विसंबावा। कर्मठपणें करूनि।। ४२।।’’ म्हणजे जो जप करण्याचा नेम आहे तो चुकू देऊ नयेच, पण त्या नेमाव्यतिरिक्तच्या वेळीही त्याचा विसर पडू देऊ नये. इतकेच नाही तर मलत्याग करतानाही शुचिता-अशुचितेच्या वैचारिक द्वंद्वात न अडकता मनातल्या मनात तो जप करीतच जावा. आता या नेमाची सुरुवात वैखरी जपानं आहे. वैखरी म्हणजे आपल्या कानांना ऐकू येईल इतक्याच आवाजात केला जाणारा जप. तर या वैखरीचं एक वैशिष्टय़ असं की आपल्या जन्मापासून या वैखरीची आपल्याला सोबत आहे! पाळण्यातल्या बाळाशी आई बोलते आणि मग तो जसजसा मोठा होऊ लागतो तसतसं तिच्या बोलण्यातूनच त्याला कितीतरी गोष्टींचं ज्ञान होऊ लागतं. तेव्हा वैखरी हा माणसाच्या ज्ञानाचा पहिला आधार आहे. त्यामुळे वैखरी जपाचा एक नेम आहे. समर्थ किती काटेकोरपणे हा नेम अपेक्षितात की एके ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, ‘शिंक जांभई खोकला तेवढा वेळ वाया गेला!’ म्हणजे वैखरीचा जप किती आटोकाट जपला पाहिजे, हे सांगितलंय त्यांनी. तर वैखरीचा हा नेम करावाच, पण त्यानंतर म्हणजे उरलेल्या वेळात हे नाम सदासर्वदा स्मरावं, असं समर्थाचं सांगणं आहे. याचं एक कारण आहे. काय होतं, नेम झाला की.. आता नेम झाल्यावरच कशाला, नेम सुरू असतानाही आपल्या मनात अनंत कल्पनांचा आणि विचारांचा झंझावात सुरू असतो. मनात उसळणारे हे सर्व प्रसंग, आठवणी, कल्पना, विचार हे सारे शब्दरूपच असतात. तेव्हा नेम सुरू असतानाही शब्दांचा असा झंझावात अंतरंगात सुरू असतोच, पण नेम झाल्यावर तो अधिकच उसळतो. तर त्यामुळेच व्यवहारात वावरतानाही अंतरंगात नामाचं स्मरण सदोदित राहू दे, असं समर्थ सांगत आहेत. थोडक्यात नामाचा ठसा कधीच पुसला जाऊ नये. पुढे म्हणतात, ‘‘मळत्यागींही न विसंबावा।’’  म्हणजे मलत्याग अर्थात शौचादि प्रातर्विधीच्या वेळीही मनातलं नामस्मरण निसटू देऊ नये, असं तर ते सांगतातच, पण मलत्याग या शब्दाचा दुसराही अर्थ आहे. अंत:करणातील विकार आणि वासना जेव्हा उसळतात तेव्हा साधक ते आवेग एक तर नियंत्रित करून वा नीतीनियमाच्या चौकटीत भोगून शमवतो. हे देहगत विकार आणि वासनांचं प्रकटन आणि त्यांचं शमन हे जणू मलत्यागच आहे! तर अंत:करणात विकार उसळले तरीही, ‘मी पापी आहे’, अशा अपराधी भावानं झाकोळून नामस्मरणाला अंतरू नये!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 22-07-2016 at 03:01 IST