या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समर्थ विचारतात, ‘‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे?’’ समर्थाचा जो सेवक आहे त्याच्याकडे वाकडय़ा नजरेनं पाहण्याची शक्ती या सर्व भूमंडळात, या जगात, या चराचरात कुणाकडेच नाही. हा परमलाभ ‘सेवका’लाच मात्र आहे आणि खरी ‘सेवा’ होत नसेल, तर खरा सेवकही होणं शक्य नाही! या सेवेच्या आड काय येतं हो? तर मी सेवा करतो, मी समर्थाचा सेवक आहे, हा ‘मी’च आड येतो! ‘श्री अवध भूषण रामायणा’त म्हटलं आहे : ‘‘गुरु पद सेवा अहम भाव ते।। होइ न तम आवरण चाव ते।।’’ श्री सद्गुरूंची सेवा अहंभावानं होऊच शकत नाही. ‘आवरण’ म्हणजे देह आणि ‘तम आवरण’ म्हणजे देहाची आसक्ती. या देहाचीच आसक्ती असेल, आवड असेल तर ही सेवा होऊच शकत नाही. कारण गेल्याच भागात म्हटल्याप्रमाणे खरी सेवा म्हणजे त्यांच्या बोधाचं सेवन आणि त्यानुरूप आचरण हीच आहे. अशा ‘सेवे’च्या आड म्हणजेच त्यांचा बोध पटण्याच्या आणि त्यानुसार आचरण करण्याच्या आड माझा अहंकार, माझी देहासक्तीच येत असते! कारण माझ्यासाठीची त्यांची प्रत्येक आज्ञा, माझ्यासाठीचा त्यांचा बोध हा माझ्यातल्या अहंकाराच्याच विरुद्ध असतो. माझी देहातली आवड मोडणाराच असतो. माझा स्वभावदोष दूर करणारा असतो. माझा अहंकार, ‘मी’ आणि ‘माझे’चा हट्टाग्रह अर्थात देहासक्ती आणि माझ्यातले स्वभावदोष यामुळेच तर माझ्यात आणि जगात ताण असतो! श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास जसजसा वाढू लागेल तसतसा ‘मी’ खरा कोण आहे, ‘मी’ खरा कुणाचा आहे, हे उमगू लागेल. मग ‘माझे’पणाची दृष्टीही बदलू लागेल. ‘मी’ खरा कोण आणि कुणाचा आहे, हेजितकं उमगू लागेल तितकं ‘माझे’ खरे कोण आहेत, हेही उमगू लागेल. जगाचं खरं स्वरूप उकलू लागलं की या जगाची ओढ, या जगाचा हव्यास ओसरू लागेल. जगाकडूनच्या भ्रामक अपेक्षा कमी होऊ लागतील. मग जगामध्ये धावण्याची, जगाच्या दास्यत्वाची, जगाच्या सेवेची सवय तुटू लागेल. मग खऱ्या अर्थानं समर्थ अशा सद्गुरूंची अव्यभिचारी सेवा घडू लागेल! जो अशा सेवेत रत आहे त्याच्याकडे त्रिभुवनातील कुणीही वाकडय़ा नजरेनंपाहू शकणार नाही.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 02-08-2016 at 04:35 IST