एखादा रोगी औषध घेऊ लागतो. काही प्रमाणात औषध पोटात जाऊ लागल्यावर प्रकृती सुधारल्यासारखं वाटतं आणि मग तो औषध घेणं मधेच सोडून देतो. औषधाची निर्धारित मात्रा पोटात न गेल्यानं रोग पुन्हा बळावतोच. साधनपथावरही काहीसं असंच आहे. भवरोगानं ग्रासलेला साधक साधना सुरू करतो. ती साधना थोडीबहुत होऊ लागताच मन शांत होत जाणं, अकारण समाधान वाटू लागणं, दुसऱ्याच्या क्रियांची प्रतिक्रिया मनात उमटत नसल्यानं मन स्थिर होत असल्याचं वाटणं; अशा काही गोष्टी घडू शकतात. मग आपण कुणीतरी झालो, या भ्रमात मन अडकतं. हा भ्रम टळला तरी, माझं नाम सतत चालूच आहे, मला सद्गुरूंचं अखंड स्मरण आहेच; असा सूक्ष्म भ्रमही होऊ शकतो! सद्गुरुंशिवाय मला दुसऱ्या कोणाचंही स्मरण नाही, असं तोंडानं म्हणणारे साधक प्रत्यक्षात मानसिक, भावनिक अपेक्षांमध्ये हेलकावतानाही दिसतात. खरी साधना आणि खरी सद्गुरूमयता म्हणजे काय, हेच साधना सातत्यातून उमजू लागलं नसताना सद्गुरूमय झाल्याच्या स्वयंघोषणेत काय अर्थ आहे? तेव्हा साधनेतलं सातत्य सुटू लागलं असलं तरी साधना सतत सुरू आहे, असा भ्रमही होत जातो. यालाच समर्थ दीर्घसूत्री म्हणतात. मग असा साधक सद्गुरूंची खरी आंतरिक तळमळही अवमानित करण्याइतपत कृतघ्न होतो. सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे आचरणाचा अभ्यास करून आपल्या मनोवेगांवर ताबा आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो त्या मनोवेगांनुसारच वर्तन करू लागतो. यालाच समर्थ कुकर्मी म्हणतात. मग या वर्तनाचीच तो भलामण करू लागतो आणि हीच खरी साधना आहे, हेच खरं अध्यात्म आहे, असं मानू लागतो आणि दुसऱ्यानंही मानावं, असा आग्रह धरू लागतो. यालाच समर्थ कुतर्की विकल्पी म्हणतात. असा साधक तोंडानं सद्गुरूंचं नाम घेतो आणि त्यांचा म्हणवतो, पण मनानं तो त्यांच्यापासून विभक्त आणि जगाशी जखडलेल्या आंतरिक आसक्तीनं युक्त असतो. म्हणून तो अभक्त पदाची पायरी गाठतो. साधक जीवनाची ही घसरण होऊ द्यायची नसेल तर समर्थ बजावतात त्याप्रमाणे, नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें। हे मना, अहंकारयुक्त बुद्धीचं द्रव्य, आसुरी संपत्ती नकोच. कारण त्यानं तू अधिकाधिक संकुचित होशील. त्यानं स्वार्थबुद्धीच वाढत जाईल आणि त्यायोगे परमात्म्यापासून दुरावा निर्माण करणारी दुर्बुद्धी वाढत जाईल. भगवंताच्या विस्मरणाइतकं मोठं पाप नाही आणि ते पाप या स्वार्थबुद्धीनं साचत जाईल. म्हणूनच, नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें। अति स्वार्थबुद्धीन रे पाप सांचे।। असं पाप साचत गेलं की मग सारी कर्मच पापयुक्त होत जातील. ज्या कर्मानं पाप उत्पन्न होतं आणि त्याचं दु:ख भोगावंच लागतं त्या कर्मात काय अर्थ आहे? उलट अशी र्कम मनाच्याच ओढीनं होत असल्यानं अवास्तव असतात. त्यामुळे अपेक्षाभंगाचं मोठं दु:खं वाटय़ाला येतं. म्हणूनच समर्थ सांगतात, घडे भोगणें पाप तें कर्म खोटें। न होतां मनासारिखें दु:ख मोठें।। तर मनोबोधाच्या नवव्या श्लोकाचं विवरण संपलं. हा श्लोक व त्याचा मननार्थ असा:
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें।
अति स्वार्थबुद्धीन रे पाप सांचे।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें।
न होतां मनासारिखें दु:ख मोठें।।९।।
मननार्थ : हे मना तुझ्यापुढील अहंकारयुक्त बुद्धीच्या जोरावर चित्तात आसुरी संपत्ती साठू देऊ नकोस. कारण त्या योगे स्वार्थबुद्धीच वाढत जाईल आणि पाप साचत जाईल. ज्या कर्मानी दु:खभोगच वाटय़ाला येतात त्या कर्मात काय अर्थ आहे? अशी खोटी, अवास्तव कर्मे अपेक्षाभंगालाच कारणीभूत होतात आणि मनाच्या अपेक्षेप्रमाणे न होणं, यासारखं मोठं दु:ख जिवाला माहीत नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 11-04-2016 at 03:09 IST