आपला वारसा मुलानं अधिक जोमानं पुढे न्यावा, ही पित्याची सुप्त इच्छा असतेच. हिरण्यकशिपुचीही तीच भावना होती. त्याच अनुषंगानं शुक्राचार्याच्या आश्रमात आपल्या या लाडक्या लेकाचं उत्तम अध्ययन सुरू असेल, हे त्यानं गृहित धरलं होतं. त्यामुळे एकदा त्याला मांडीवर घेत पित्यानं प्रेमानं विचारलं, ‘‘बाळा सांग तुला या जगात काय आवडतं?’’ आपला पुत्र वैभवाचे गोडवे गाईल, या भावनेनं त्याचे कान आतुर झाले होते. प्रल्हाद मात्र उत्तरला, ‘‘बाबा, या जगातले जीव ‘मी’ आणि ‘माझे’च्या भ्रामक हट्टाग्रहात पडून सदोदित अतिशय उद्विग्न राहातात. या जिवांचं खरं हित यातच आहे की त्यांनी आपल्या अध:पाताचं मूळ कारण असलेल्या या भ्रमाच्या तृणानं आच्छादित ‘मी’पणाच्या अंधारविहीरीतून बाहेर पडावं  आणि श्रीहरिला शरण जावं!’’ इतकं लहान मूल स्वत:हून का असं काही बोलेलं? हा आपल्याच मनातला प्रश्न हिरण्यकशिपुच्या मनातही साहजिकपणे आला आणि त्यानं खदखदा हसत फर्मावलं, ‘‘शुक्राचार्याच्या आश्रमात शत्रूपक्षाचे हस्तकही शिरलेले दिसतात. लहान मूल, बिचारं दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकतं आणि बोलतं. याच्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष ठेवावं.’’ प्रल्हादाला गुरूगृही पोहोचवलं गेलं. हिरण्यकशिपुचं फर्मान तोवर तिथल्या ज्ञानदात्यांच्या कानी पोहोचलं होतंच! तिथं शिकवणाऱ्या गुरूंनी त्याला मोठय़ा प्रेमानं विचारलं, ‘‘बाळा, इथला अन्य एकाही मुलाची बुद्धी अशी विपरीत झालेली नाही. मग खरं सांग, तू जे वडिलांना सांगितलंस ते तुझ्या मनचं होतं की तुला कुणी पढवलं आहे? तू तुझ्या बुद्धीनुसारच बोललास की कुणी तुला भ्रमित केलं आहे?’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जग कसं आहे? भक्तीविषयीच्या अज्ञानालाच ते ज्ञान समजतं. जो ‘मी’ टिकणारा नाही आणि त्यामुळेच त्याचा ‘माझेपणा’चा पसाराही ठिसूळ पायावरच तग धरून आहे तो भ्रामकपणा पोसण्याच्या कलेलाच ह जग सर्वोत्तम ज्ञान मानतं. हा भ्रम तोडणारी, या भ्रमापासून जिवाला विभक्त करणारी आणि शाश्वताशी जोडणारी जी भक्ती आहे तिलाच हे जग भ्रम मानतं! जिवंतपणी जो नाम घेत असतो त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा, ‘वाचविण्याचा’ प्रयत्न हे जग अखंड करतं आणि त्याच्या देहातून प्राण गेला की त्या मृतदेहाला खांद्यावर घेत, ‘‘बोला रामनाम सत्य आहे!’’ असा घोषा लावतं. त्यामुळे प्रल्हादाची बुद्धी अशी भक्तीमय होणं हे घातक अज्ञानाचंच लक्षण आहे, असं पुरोहितदेखील मानत होते.. आणि त्या बिचाऱ्यांनाही ज्ञानापेक्षा प्राणच अधिक प्रिय होते ना!  हिरण्यकशिपुच्या अर्निबध साम्राज्यातला ते एक क्षुल्लक घटकमात्र होते. त्यामुळे सत्ता म्हणेल तेच ज्ञान, सत्ता म्हणेल तीच श्रेष्ठ कला, सत्ता म्हणेल तीच खरी प्रज्ञा ही स्थिती होती. त्यांच्या या प्रश्नावर हसून प्रल्हाद म्हणाला, ‘‘माणसाची मी आणि माझेपणाची पाशवी बुद्धी त्याच्या प्रयत्नांनी पालटत नाही.. भगवंत जेव्हा कृपा करतो तेव्हाच त्याची भेदबुद्धी नष्ट होते! त्या भगवंताला जाणणं कठीण आहे. त्यानंच माझी बुद्धी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बिघडवली आहे!’’ मग प्रल्हादानं आपली आंतरिक स्थिती फार मनोरम शब्दांत उलगडली. तो म्हणाला, ‘‘गुरूजनहो, चुंबकाकडे लोखंड जसं आपोआप खेचलं जातं तसं भगवंताच्या स्वतंत्र इच्छाशक्तीनं माझं चित्तही जगातून विलग होऊन त्याच्याकडे खेचलं जात आहे!’’ गुरूजन घाबरून ओरडले.. ‘‘आनीयतामरे वेत्रम्!.. वेताची छडी आणारे! याची बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी साम, दाम, भेद नव्हे, आता दंडच आवश्यक आहे..’’ दुसऱ्याला आपलं मत स्वीकारायला भाग पाडून ‘ज्ञानी’ बनविण्यासाठी त्याला ठोकून काढण्याची ही जगाची इतकी प्राचीन परंपरा!

 

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy part
First published on: 24-03-2017 at 03:39 IST