‘चतु:श्लोकी भागवता’त संत एकनाथ महाराज सांगतात की सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवालाही आपण कुठून आलो, आपलं मूळ काय, हे कळेना. त्यानं आर्त पुकारा केला आणि तो अंतर्यामी जाणत्या ‘हरी’ला कळला! त्या ‘हरी’नं तप करण्याची आज्ञा केली. नाथ सांगतात, ‘‘तप तप ऐसें बोलिला। तो प्रत्यक्ष नाहीं देखिला। पाहतां अदृश्य जाहला। तो पांगेला दशदिशा।।’’ तपाची आज्ञा देणारा शरीरात दिसला नाही! पण ‘तप’ म्हणजे काय, यावर ब्रह्मदेवानं चिंतन केलं. आता चिंतन-मनन ही अगदी अंतर्यामी घडणारी प्रक्रिया असते. त्या चिंतनातून जी प्रेरणा लाभते तीही अंत:स्थच असते. ती या अंतर्यामी ‘हरी’कडूनच झाली, यात शंका नाही. नाथ म्हणतात की, त्या चिंतनातून ब्रह्मदेवाला गवसलं की, ‘‘हरि हृदयी चिंतणे चिद्रूप। तप सद्रूप त्या नांव पै।।’’ हृदयात चिद्रूप अशा ‘हरी’चं अखंड चिंतन करून सद्रूप होणं हेच तप आहे.. त्या तपानंच परमानंद गवसतो.. सद् चिद् आनंद! सर्व भवभयाचं हरण करणारा हा जो ‘हरी’ आहे तोच सद्गुरू आहे! ज्ञानेश्वर माउलींच्या ‘हरिपाठा’चा ‘अनादि अनंत’ या सदरात मागोवा घेताना हरी हाच सद्गुरू कसा, याची चर्चा आपण केली होती. ‘हरिपाठ’ म्हणजे जीवन कसं जगावं, याचा सद्गुरूंनी घालून दिलेला पाठ, हेही आपण तेव्हा पाहिलं होतं. तेव्हा मूळ सृष्टीचा कर्ता असलेल्या ब्रह्मदेवाच्याही आधी असलेला सद्गुरू हा मुळारंभच आहे. ‘दासबोधा’त तर समर्थ स्पष्ट सांगतात की, ‘‘हरीहर ब्रह्मादिक। नाश पावती सकळिक। सर्वदा अविनाश येक। सद्गुरूपद।।’’ (दशक १, समास ५). म्हणजे सृष्टीचं पालन करणारा विष्णू, तिचा लय करणारा शंकर आणि तिची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आदी समस्त देवतागण नाश पावतील, पण सद्गुरू अविनाशी आहे. हे समस्त देवी देवताही त्रिगुणाच्या पकडीत कसे असतात, हे अनेक पुराणांतील कथांत आढळून येईल. मग सर्वसामान्य साधक या त्रिगुणांत भरडला जातो, यात काय आश्चर्य? आपल्या अंतर्मनात या त्रिगुणांमुळे निर्माण होत असलेले बंध प्रामाणिकपणे साधना करणाऱ्या साधकाला जाणवत असतात. साधनेनं एकवेळ रजोगुण आणि तमोगुण कमी होत जातात, पण सात्त्विक अहंकार जोपासून अधिकच बाधक आणि घातक ठरत असलेल्या सत्त्वगुणाचं नेमकं काय करावं, हे कळत नाही. पिंजरा लोखंडाचा असो की सोन्याचा, जळणारं लाकूड साधं असो की चंदनाचं; जाच आणि दाह दोहोंत सारखाच! त्याचप्रमाणे अहंकार कोणत्याही गुणाला चिकटून का वाढत असेना, तो तितकाच घातक. त्यामुळे त्रिगुणातीत अशा राघवाच्या अर्थात सद्गुरूच्या पंथावर खरी वाटचाल करायची तर, त्यासाठीचा एकमेव आधार त्रिगुणातीत अर्थात तिन्ही गुणांवर ताबा असलेले आणि सर्व गुणांचा ईश असलेले सद्गुरूच आहेत! समर्थ सांगतात, ‘‘वृत्तीस न कळे निवृत्ति। गुणास कैंची निर्गुणप्राप्ती।।’’ (दासबोध, द. ११, स. १). प्रपंच प्रवृत्त असलेल्या आपल्याला स्वबळावर आणि स्वप्रयत्नानं निवृत्त होता येणं कदापि शक्य नाही. त्रिगुणात अडकलेल्या आपल्याला स्वबळावर आणि स्वप्रयत्नानं त्रिगुणातीत होण्याची, निर्गुणाची प्राप्ती साधण्याची कला कदापि आत्मसात करता येणार नाही. त्यासाठी जीवन विवेक शिकविणाऱ्या सद्गुरूंचीच गरज आहे. या चिद्रूप सद्गुरूंशी सद्रूपता साधणारं तपच आवश्यक आहे. पण हे खरं तपही तो हरी अर्थात सद्गुरूच सांगू शकतो! त्रिगुणांच्या पकडीतून सोडवणारं आणि इंद्रियगणांवर अर्थात मनावर ताबा आणणारं हे खरं तप माझं मला जाणता येत नाही. ते सांगणारा आणि माझ्याकडून करून घेणारा हरी अर्थात सद्गुरूच लागतो. त्याच्याशिवाय हा मनोयोग असाध्यच आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant eknath maharaj philosophy
First published on: 15-01-2016 at 06:13 IST