वैज्ञानिकांसाठी प्रतिष्ठेच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवलेले राजेश गोखले अगदी पहिलीपासून दिल्लीत शिकले. दिल्लीच्या क्रिकेटविश्वातून ‘आउट’होऊन अभ्यासाला लागले आणि पुढे दिल्लीपासून १५ वर्षे दूर राहून, संशोधकवृत्ती अंगी बाणवूनच परतले. केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ आणि खासगी उद्योजक अशी त्यांची आजची ओळख आहे.
बालपणी राजेश गोखलेंचे ध्येय होते क्रिकेटर होण्याचे. शाळेत लांब उडी आणि स्प्रिंट शर्यतींमध्येही ते भाग घ्यायचे. त्याच सुमाराला चष्मा लागला नसता तर आज ते भारतीय हवाईदलात बडय़ा पदावर राहिले असते. पण तीन दशकांनंतर आज ते संशोधन क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्याचे लक्ष्य ठेवून एक अशी मॅरेथॉन धावत आहेत, जिचा प्रचंड दमछाकीनंतर अंतिम टप्पा अजूनही दृष्टिपथात आलेला नाही. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेंतर्गत येणाऱ्या दिल्लीतील इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बॉयोलॉजी या संस्थेचे संचालक आणि व्योम बॉयोसायन्सेस या बायोफार्मास्युटिकल कंपनीचे सहसंस्थापक ही राजेश गोखले यांची खरी ओळख. मुळात प्रतिभा असली की ती कुठल्याही स्वरूपात प्रगटल्याशिवाय राहत नाही, हे खेळात तसेच शैक्षणिक जीवनात मोक्याच्या क्षणी संधी हुकलेल्या राजेशनी आपल्या ४६ वर्षांच्या वाटचालीत दाखवून दिले आहे.
राजेश गोखले यांचा जन्म नागपूरचा. त्यांचे आजोबा दत्तात्रेय गोखले नागपुरातून प्रसिद्ध होणाऱ्या दै. ‘महाराष्ट्र’चे संपादक, त्यांचे घर वसंतनगरच्या पत्रकार कॉलनीत. वडील सुधीर गोखले ब्रिटिश इन्सुलेटेड केबल्समध्ये नोकरीला होते. त्यांच्या आई सरोज यवतमाळच्या. मामांसह आईकडचे बहुतांश नातेवाईक शिक्षण क्षेत्रातले. वडिलांची दिल्लीला बदली झाली तेव्हा राजेश तीन वर्षांचे असताना, १९६९ साली गोखले दिल्लीला आले. तेव्हाचा मराठी ‘गढम्’ असलेल्या करोलबागमध्ये रामजस रोडला राहू लागले. चौथीपर्यंत हिंदूी माध्यमात शिकलेल्या राजेश यांचे शालेय शिक्षण करोलबागच्या आसपास सरस्वती शिशु मंदिर, चौगुले विद्यालय, पुसा रोडच्या रामजस स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना अॅथलेटिक्समध्ये भाग घेणारे राजेश क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजी करायचे. सॉनेट क्लबमध्ये त्यांना भरपूर गोलंदाजी करायला लावून यथेच्छ सराव करणारे मनोज प्रभाकर, सुरिंदर खन्ना, रमण लांबा यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे क्षितिज गाठले. पण राजेशच्या वाटय़ाला सामन्यांमध्ये मैदानावर टॉवेल घेऊन जाण्याचेच वैफल्य आले. १४ वर्षांखालील संघात त्यांची निवड झाली नाही तेव्हा वडिलांनी त्यांना अंतर्मुख व्हायला व अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडले. अकरावीनंतर राजेशची निवड नॅशनल डिफेन्स अॅकाडमीमध्ये झाली. पण तिथेही ते कमनशिबी ठरले. एनडीएमध्ये निवड झाल्याझाल्या त्यांना चष्मा लागला आणि हमखास मिळणारी हवाई दलाची संधी निसटली. एनडीएचा पर्याय आईवडिलांना मान्य नसल्याने भरपाईची रक्कम भरून ते पुण्याहून दिल्लीला परतले. सामंजस्याने वागणाऱ्या आईवडिलांनी त्यांच्या क्षमतेवरील विश्वास ढळू दिला नाही. बारावीला चांगले गुण मिळूनही वर्षभराचा खंड पडल्यामुळे दिल्लीत राजेशना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. शेवटी फारसे नाव आणि ग्लॅमर नसलेल्या राजधानी महाविद्यालयात त्यांना रसायनशास्त्रात प्रवेश घ्यावा लागला. केमिस्ट्री ऑनर्समध्ये त्यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावत दिल्ली विद्यापीठात अव्वल स्थान पटकावून राजधानी महाविद्यालयाला वलय प्राप्त करून दिले. तिथून राजेशच्या शैक्षणिक कारकिर्दीला कलाटणी लाभली. आयआयटी पवईमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेणाऱ्या राजेशना संशोधनाने आकर्षित केले. बंगळुरुला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये (आयआयएस) रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र एकत्र करून त्यांनी पीएच.डी. केली. आयआयएसचे विद्यमान संचालक प्रा. पी. बलराम यांच्यासारखे मातब्बर गुरू त्यांना लाभले. त्यांनी राजेशमध्ये वैज्ञानिक अंत:प्रेरणा विकसित केली. आयआयएसमध्ये वैज्ञानिक सहपाठी असीमा यांचा परिचय झाला आणि त्याची परिणती विवाहात झाली. पाठोपाठ कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाची त्यांना चार वर्षांसाठी फेलोशिप मिळाली. सोबत असीमाही होत्या. अमेरिकेत चार वर्षांत त्यांना आलेला अनुभव अफाट होता. आपल्या लोकांकडे कल्पना खूप असतात, पण त्यांचे आम्ही ठोस गोष्टींमध्ये रूपांतर करू शकत नाही. भारतात आपण बोलतच राहतो. आमचे शास्त्रज्ञ अतिशय कल्पक असले तरी निवृत्त होताना एखाद्या संशोधनाच्या बाबतीत उंबरठय़ापर्यंत पोहोचलो, पण तो ओलांडता आला नाही, अशीच चुटपुट त्यांच्या बोलण्यातून झळकत असते, हा राजेशना संशोधनक्षेत्रात आलेला अनुभव. प्रश्न कसे समजून घ्यायचे याचे धडे त्यांनी बंगळुरुला गिरविले होते. पण समस्या सोडवायची कशी, हे त्यांना अमेरिकेत शिकायला मिळाले. त्यांच्या मते एखाद्या समस्येवर तोडगा कसा काढायचा हे अमेरिकन लोकांकडूनच शिकायला हवे. प्रश्न लक्षात आला की अमेरिकेत पैसा, मनुष्यबळ, तंत्रज्ञान यांचा भडिमार करून निश्चित कालावधीत त्यावर मात करूनच उसंत घेतली जाते. समस्येचा वेध घेऊन तिचे निराकरण करताना भारतीय-अमेरिकन कौशल्याची त्यांनी सांगड घातली. प्रश्न कसे सोडवायचे हे आमच्या देशाने शिकायला हवे. सोडविता येण्यासारखे प्रश्न कुठले ते ओळखायला हवे आणि त्यांचे निराकरण करायला हवे. अमेरिकेत एखादी कल्पना डोक्यात आली की ते तिला व्यावसायिक महत्त्व प्राप्त करून देतात. ते कसे करायचे हे राजेशना स्टॅनफर्डला शिकायला मिळाले. आयुष्यातील अनेक लहानसहान गोष्टी चुकल्यासारखे वाटल्याने भारतात परतले. दिल्लीत १५ वर्षांनंतर परतलेले राजेश नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजीमध्ये आले. दोन शास्त्रज्ञांची कारकीर्द एकत्र चालणार नाही, हे ओळखून पत्नी असीमा यांनी मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी पत्करली.
जवाहरलाल नेहरू यांनी १९५२ साली लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशापुढच्या तीन-चार आव्हानांचा परामर्श घेतला होता. भारताला भूक, क्षयरोग, मलेरिया आणि ल्युकोडर्मा यांच्यावर मात करावी लागेल, असे ते म्हणाले होते. आज सहा दशकांनंतरही हे प्रश्न जवळजवळ कायमच आहेत. राजेशनी आपले संशोधन क्षयरोग आणि ल्युकोडर्मावर केंद्रित केले. भारतातल्या सुमारे ९० टक्के लोकांमध्ये क्षयरोगास कारणीभूत ठरणारा पॅथोजन निद्रावस्थेत का असेना, अस्तित्वात असतो. शरीरातील प्रतिकारशक्ती ढासळते तेव्हा त्याचा प्रभाव वाढतो. त्या पॅथोजनचे वैशिष्टय़पूर्ण बाह्य आवरण कसे बनते याचा शोध आठ-नऊ वर्षांच्या संशोधनाअंती राजेशनी लावला. या कालावधीत त्यांना प्रतिष्ठेच्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह स्वर्णजयंती फेलोशिप, बी. एम. बिर्ला पुरस्कार, फेलो ऑफ नॅशनल अकॅडमी सायन्स इंडिया, नॅशनल बायोसायन्स पुरस्कार, हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिटय़ूट इंटरनॅशनल रिसर्च स्कॉलर आदी पुरस्कार तरुण वयातच लाभले. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे तत्कालीन मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि सीएसआयआरचे महासंचालक प्रा. समीर ब्रह्मचारी यांच्या पाठबळाने हे चित्र बदलण्यासाठी चार वर्षांपूर्वी इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बॉयोलॉजीच्या संचालकपदाची प्रशासकीय जबाबदारी राजेशनी स्वीकारली. एखादा प्रश्न सोडविण्यासाठी पैसा, लोक, उपकरणे, पायाभूत सुविधा आणि योग्य प्रकारचे पाठबळ आवश्यक असते. त्यातला एकही दुवा चुकला की यशाचे वर्तुळपूर्ण होत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण गोष्टी करायच्या असतील तर सरकारची धोरणे लवचीक असायला हवी. वैज्ञानिक प्रगती लेखा परीक्षकांच्या आकडेवारीत बसविता येणार नाही. संशोधनाचा भाग सोडून औषध विकसित व्हायला दहा वर्षे लागतात. तेवढा संयम कुणापाशी नसतो.
आयुर्वेदात व्यक्तिपरत्वे औषधांची आणि उपचारांची पद्धत बदलते. तशीच उपचारपद्धती जिनोम सायन्समध्येही शक्य आहे, असे आरोग्यक्षेत्रातील आव्हानांकडे संवेदनशीलतेने बघणाऱ्या राजेशना वाटते. त्वचारोगाच्या बाबतीत जिनोमिक्सचा वापर करणे शक्य असल्याचे त्यांना वाटते. ल्युकोडर्मा किंवा पांढरे डाग हा विकार का होतो, याचे संशोधनच झालेले नाही. त्या कारणांवर राजेश गोखले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन-तीन वर्षांपासून ४-५ शास्त्रज्ञांच्या गटाने संशोधनाचा रोख केंद्रित केला आहे. सध्याची उपचार पद्धतीच चुकीची आहे, असे म्हणायला वाव असल्याचा निष्कर्ष ते काढतात.
भारतात तरुण मुलांना योग्य वयात चांगली प्रेरणा मिळत नाही. देशात रोल मॉडेल्सच नाहीत. शास्त्रज्ञ हा उद्योजक झाला तर तो रोल मॉडेल होऊ शकतो. असे पाच-सहा शास्त्रज्ञ-उद्योजक तयार झाले की तरुण पिढीला आपोआपच प्रेरणा मिळेल. तरुण पिढीला पाश्चिमात्य जगताचे आकर्षण उरलेले नाही. पण त्यांना संधी हवी आहे, अशी भावना ते व्यक्त करतात. शास्त्रज्ञ उद्योजक होऊ शकतात, यावर संसदेने शिक्कामोर्तब केल्यामुळे गोखलेंना जैवविज्ञान क्षेत्रात स्वत:ची कंपनी स्थापण्याची परवानगी मिळाली.
उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात जशा संस्था उभ्या केल्या तशाच संस्था आज जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक आहेत, असे त्यांचे मत आहे.
बालपणी उन्हाळ्याच्या सुटीला दोन महिने नागपूरला, मामाच्या शेतावर जाणाऱ्या राजेश आणि विनय यांनी दिल्लीत राहूनही मराठी भाषेविषयीची उत्कटता कायम राखली. राजेश-असीमा यांची दोन्ही मुले, सातवीतला रोहित आणि चौथीत शिकणारा अनंत यांनीही घरात मराठीशिवाय अन्य भाषेत संवाद साधायचा नाही, असाच आग्रह बाळगून ही परंपरा जोपासली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2013 रोजी प्रकाशित
संशोधनाची अंतप्रेरणा
वैज्ञानिकांसाठी प्रतिष्ठेच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवलेले राजेश गोखले अगदी पहिलीपासून दिल्लीत शिकले. दिल्लीच्या क्रिकेटविश्वातून ‘आउट’होऊन अभ्यासाला लागले आणि पुढे दिल्लीपासून १५ वर्षे दूर राहून, संशोधकवृत्ती अंगी बाणवूनच परतले. केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ आणि खासगी उद्योजक अशी त्यांची आजची ओळख आहे.

First published on: 09-03-2013 at 04:51 IST
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi face rajesh gokhale in capital of india