रयतेच्या काडीलाही धक्का लागू नये याची खबरदारी घेणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातल्या सरंजामदारांना वठणीवर आणले. सामान्यांना लुटणाऱ्यांना सक्त ताकीद दिली.. आजचे स्थानिक सरंजामदार रयतेशी कसे वागतात आणि या सगळ्यांना आत्ताच महाराजांची आठवण कशी येते?
लोक जगण्या-मरण्याच्या प्रश्नाबद्दल बोलायला लागले, की त्यांना इतिहासात घेऊन जाणे हा एक सोपा मार्ग असतो. लहान लेकरांना चांदोबा दाखवण्यासारखाच प्रकार आहे हा. एकदा इतिहास डोक्यात उतरायला लागला, की मग आसपासच्या वास्तवाचाही विसर पडतो. फडकणारे ध्वज, तलवारींचा खणखणाट, घोडय़ांच्या टापांचा आवाज हे सगळे काही आपल्याला आजूबाजूच्या वास्तवाचा विसर पाडायला कामी येते. एकदा वातावरण निर्माण झाले, की मग इतिहासातलीच भाषा बोलली जाते. कार्यकत्रे ‘मर्द मावळे’ होतात अशा वेळी. एखाद्याने गद्दारी केली तर तो ‘सूर्याजी पिसाळ’ ठरतो. नेत्यांच्या भाषणाआधी तुतारी फुंकली जाते ती सभेत चतन्य यावे म्हणून. वातावरण सगळे कसे ऐतिहासिक. सध्याच्या जगाचा संबंधच नाही असे. कायम चढाईच्या पवित्र्यात उभा ठाकायला लावणारा हा माहोल. आता तर सगळीकडेच गगनभेदी तुताऱ्या ऐकू येत आहेत आणि सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत आहे. महाराजांचा आशीर्वाद सर्वानाच आवश्यक वाटू लागला आहे. महाराजांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचेच पान हलत नाही अशी परिस्थिती आहे. कोणाला महाराज केवळ स्मारकापुरते जाहीरनाम्यात हवे असतात, तर कोणाला घोषणा देण्यापुरते. रयतेचे काय? हा प्रश्न कोणालाच पडत नाही. महाराज रयतेची कशी देखभाल करायचे याचाही कोणाला विचार करावासा वाटत नाही. आपली कृती आणि धोरणे ही कायम रयतेच्या भल्याची असतील, ही महाराजांची नीती तर सगळेच विसरले आहेत.
‘‘..असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरायास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व रयतेस तसविस देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोणी कुणब्याचे येथील दाणे आणिल, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहुन अधिक तुम्ही. ऐसा तळतळाट होईल.’’
आत्ताच अविचारीपणाने घोडय़ांना बेजबाबदारीने चाराल तर मग पावसाळ्यात चारा मिळणार नाही. इथपासून ते रयतेचा तळतळाट घेऊ नका इथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना आज्ञापत्रात बजावले. तुमच्यापेक्षा मोगल परवडले असे रयतेला वाटू नये इतपत काळजी घ्या, अशी सक्त ताकीद महाराजांनी दिली. रयतेच्या काडीलाही धक्का लागू नये याची खबरदारी घेणाऱ्या या राजाने आपल्या राज्यातल्या सरंजामदारांना वठणीवर आणले. गोरगरिबांना छळणारा, मग तो कोणीही असो, त्याची गय केली नाही. सामान्यांना लुटणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आणि जिथे मोकळा श्वास घेता येईल, दुबळ्यालाही निर्धोकपणे जगता येईल, अशी हमी दिली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही लुटारूंचा धक्का लागणार नाही एवढी काळजी घेतली. म्हणूनच ही राजवट आपली आहे असे प्रत्येकाला वाटले.
..आज काय चित्र आहे ग्रामीण महाराष्ट्रात. जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ांत रयतेची लूट करणारे संस्थानिक उदयाला आले आहेत. साखर कारखाने, बँका आणि सगळी शक्तिस्थाने एकवटल्यानंतर जी अजस्र ताकद आकाराला येते त्या ताकदीचाच आविष्कार वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो. शिक्षण संस्थांमध्ये काम करणारी शिक्षक, प्राध्यापक मंडळी सर्रास प्रचारकार्यात जुंपलेली असतात. भाषा सर्वसामान्यांच्या कळवळ्याची, पण सगळी सत्ता राबवायची ती आपल्या जवळपासच. अविवेकी सत्ता आणि अर्निबध संपत्ती एका जागी आल्यानंतर जो काही परिणाम जाणवतो तो आता कुठेही दिसू शकतो अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर सत्ता, संपत्तीच्या जोडीला पुन्हा मनगटशाही. विरोधात मतदान करण्याची कोणाची िहमतच होऊ नये अशी मजबूत पकड ठेवली जाते. आपल्याला मतदान दिले नाही तर ऊस कारखान्याला जाणार नाही, रस्ता केला जाणार नाही यांसारख्या धमक्याही दिल्या जातात. लोकांच्या किमान गरजा भागतील न भागतील, पण पुढाऱ्यांचे साम्राज्य मात्र ‘वíधष्णू’च होत आहे दिवसेंदिवस. भर उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही, एरवीही पाण्याचे हालच. कुठे पिकांना द्यायला पाणी आहे, पण दहा-दहा तास वीज नाही. कुपोषित मुले जन्माला येऊ नयेत म्हणून गरोदर मातांना सकस अन्न मिळावे एवढीही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. आदिवासी भागात तर आणखीच अंधार. महत्त्वाचे रस्ते सोडले तर अंतर्गत रस्त्यांचे भयानक हाल. पावसाळ्यात कोणतेच वाहन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. या सगळ्या यातना एका बाजूला आणि वाहने लावून जाहीर सभांना आणलेली गर्दी. सभेनंतर गावाच्या बाहेर कुठे तरी उघडलेले ‘अन्नछत्र’. त्याच ठिकाणी जेवणावळीनंतर वाहनांचाही हिशोब. दणक्यात पार पडणाऱ्या सभा, सभेत फुंकल्या जाणाऱ्या तुताऱ्या असे दुसऱ्या बाजूचे चित्र. प्रचंड धुराळा उडवीत वेगाने धावणाऱ्या गाडय़ांचे ताफे, या ताफ्याकडे कमालीच्या आश्चर्याने पाहणारे रस्त्याच्या दुतर्फा हाताची घडी घातलेले लोक.
मतदान जसजसे जवळ येईल, तसतसे रात्री उशिरा अंधारात कार्यकत्रे येतात. गाव सामसूम झाल्यानंतर या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरू होतात. मतांचा हिशोब लावला जातो. मतदार याद्या हातातच असतात. गल्लीबोळात, झोपडीपर्यंत जाऊन रोख वाटप केले जाते आणि अमक्या-तमक्याच्या समोरील बटन दाबा, असे सांगितले जाते. आधी शिक्का मारा सांगितले जायचे. पसे दिल्यानंतरही काही ठिकाणी लोकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार होतो. मतांच्या बाबतीत दगाफटका होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ‘इमानदारी’ जोखली जाते. सगळाच धंदा बेइमानीचा, पण त्यातही इमानदारीची अपेक्षा. गाईची शेपटी हाती घ्यायला लावली जाते. कुठे कुठे गहू, ज्वारी असे धान्य हातात घ्यायला लावून आणाभाका घेतल्या जातात..
गावोगावचे अनेक लोक मजुरीसाठी, रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरित झालेले असतात. गावात पोट भरत नाही म्हणून मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी कामाला जातात. अशा लोकांना मतदानासाठी खास बोलावले जाते. ज्यांची नावे मतदार यादीत आहेत त्यांना मतदानासाठी आणले जाते. बस-रेल्वेच्या वेळा सोयीच्या नसतील आणि संख्या जास्त असेल, तर मग खासगी वाहनांची सोय केली जाते. किती विसंगती म्हणावी, ज्यांच्या नाकत्रेपणामुळे अन्यत्र रोजगार शोधावा लागतो. पुन्हा त्यांच्यासमोरचे बटन दाबण्यासाठी गावाकडे यावे लागते. गावची खूण म्हणून ही माणसे मतदान करून पुन्हा आपआपल्या कामाच्या ठिकाणी जातात. पाच वर्षांत काहीच पदरात पडत नाही. साध्यासाध्या गोष्टींसाठी हैराण व्हावे लागते. मग जे आता हातात पडते आहे ते घेऊन मोकळे व्हा. नाही तरी पुन्हा काय हाती लागणार मग? इतका सरळसरळ विचार केला जातो. माणसे बळी पडतात हे वाईटच; पण ही वेळ त्यांच्यावर आणणाऱ्यांचे काय? फक्त मतांचे गणित जुळवायचे, त्यासाठीची तरतूद करायची. मतदानाच्या दोन दिवसआधी दारूचा महापूर करायचा मतदारसंघात. अशी सगळी लोकशाहीची थट्टा सुरू आहे.
भटक्या विमुक्तातल्या अनेक जमाती आजही पालं ठोकून गावोगावी राहतात. त्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही. ‘दर कोस दर मुक्काम’ हेच त्यांचे जगणे असते आणि ‘आज इथं तर उद्या तिथं’ असे करीत त्यांचे आयुष्य जाते. कोणत्याच गावात हक्काचे घर नाही आणि आपल्या मालकीचा जमिनीचा तुकडा नाही. या लोकांनी आपले नाव कोणत्या मतदार यादीत शोधायचे? असे किती तरी लोक आहेत ज्यांना बोटाच्या नखावरील शाई एवढीसुद्धा ओळख नाही. जो ठिपका असतो त्या ठिपक्याएवढेही अस्तित्व नाही आणि हा ठिपका जसा काही दिवसांनी निघून जातो, तसेच या लोकांच्या जगण्याचेही होते. आपली लोकशाही या सगळ्या लोकांना काय देते? आजचे सगळे स्थानिक सरंजामदार रयतेशी कसे वागतात? आणि या सगळ्यांना आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण कशी येते? असे काही प्रश्न सहज उपस्थित होऊ शकतात तरीही त्यांची उत्तरे मात्र सहज नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व धूळपेर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masses and todays politicians
First published on: 06-10-2014 at 02:33 IST