छोटंसं हृदय कविकल्पनेत चंद्र-ताऱ्यांना स्पर्श करण्यालासुद्धा छोटीसी आशा म्हणण्याएवढं मोठं होऊ शकतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याला आहे तिथून दोन पावलं पुढेजाण्याची आस असते..

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना मानावी लागेल. वर्षभरापूर्वी राज्यभर निघालेले मराठा मोच्रे हेदेखील असेच अभूतपूर्व. या दोन्ही घटनांचे केवळ जातीय निकषांच्या आधारावर केले गेलेले विश्लेषण खूपच तोकडे ठरेल. या दोन्ही प्रतिक्रियांमधील तरुणांचा सहभाग इतका मोठा होता की या घटना तरुणांच्या बेरोजगारीमुळे असलेली खोलवरची आर्थिक खदखद व्यक्त करताहेत असे मानायला जागा आहे. सन २०१४ मधील परिस्थिती याच्या अगदी विरुद्ध होती.

लोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली. देशाच्या राजकीय आणि सामाजिक आसमंतात मोठी आशा- आणि उत्साह होता. लोकांमध्ये उत्साह निर्माण करणे हे मोदींच्या नेतृत्वाचे वैशिष्टय़ आहे. नुकतेच स्वित्र्झलडमधील आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेल्या दावोसच्या आलिशान सोहळ्यात सर्व प्रगत देशांतील उद्योजकांसमोर मोदींनी केलेले भाषण, तेथील जेवणावर पहिल्यांदा पाडलेली भारतीय जेवणाची छाप, तेथे या परिषदेच्या ठिकाणी दिले जाणारे योगासनांचे शिक्षण हे सर्व म्हणजे ‘भारत आता प्रगत देशांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोहळ्यात दिमाखदार पद्धतीने आपले पाऊल टाकतोय’ हे जगाला सांगणारी ही खास ‘मोदी स्टाइल’. यात समाजाच्या उच्च वर्गाच्या आशा-आकांक्षांना प्रतिसाद जरूर मिळतो. परकीय भांडवल आपल्या देशात येईल आणि आपल्याला मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतील अशी आस समाजातील एका वर्गातील तरुणांमध्ये निश्चितच आहे. पण मोदींचे हे अपील फक्त वरच्या वर्गातच आहे असे नाही. वरच्या वर्गाची ही आस, आशा २०१४ साली समाजात अगदी खालपर्यंत झिरपली होती. येत्या- २०१९च्या निवडणुकीतदेखील विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी असेल का? तसा तो असावा असे अनेकांचे मत असेल. पण राजकारण हा लोकांच्या भावनेला दिलेला प्रतिसाद असतो आणि लोकांच्या भावना त्या वेळी काय असतील? २०१४ चाच उत्साह, आशा? की निराशेचे सावट?

लोकांच्या आशा केव्हा पल्लवित होतात? केव्हा त्यांचे निराशेत रूपांतर होते? केव्हा बिगरआर्थिक समूहवादी आकांक्षा राजकारणावर आपला प्रभाव गाजवतात, याचा अंदाज बांधण्याचादेखील प्रयत्न आजचे अर्थशास्त्र करते. अर्थशास्त्रातील प्रतिमाने (मॉडेल्स) केवळ व्यक्तीच्या आर्थिक प्रेरणा लक्षात घेऊन तयार करण्यात येतात असा रूढ समज आहे. पण माणसाच्या प्रेरणा बहुविध असतात आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो आणि या सर्व प्रेरणा सामाजिक रचनेवरदेखील अवलंबून असतात. त्यामुळे आताचे अर्थशास्त्रदेखील ही सर्व गुंतागुंत आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करून मानवी वर्तनाबद्दल भाकिते करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रतिमानांच्या आधारे २०१९च्या निवडणुकीबद्दल काही अंदाज बांधणे शक्य आहे का?

भारतासारख्या विकसनशील देशातील समाजात आर्थिक चतन्य कधी असेल तर जेव्हा समाजातील सर्व थरांतील लोकांना आपला ‘उद्या’ हा आजच्यापेक्षा जास्त चांगला असू शकतो असे वाटत असते तेव्हा. असे वाटत असेल तरच समाज या चांगल्या ‘उद्या’साठी आज गुंतवणूक करायला तयार असतो. आणि ही गुंतवणूक काही फक्त भांडवलदारांनी किंवा उच्चमध्यम वा वरच्या वर्गाने शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक नव्हे. तर एखाद्या धुणे-भांडी करणाऱ्या स्त्रीने आपल्या पोटाला चिमटा घेऊन पैसे साठवून मुलाच्या महागडय़ा कॉम्प्युटर कोर्ससाठी केलेली गुंतवणूकदेखील यात मोडते. किंवा विदर्भ, मराठवाडय़ातील गरीब शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहिरीत किंवा महागडय़ा बियाणात केलेली गुंतवणूकदेखील यात मोडते. जवळपास बहुतांश श्रमिक असंघटित क्षेत्रात असलेल्या आपल्या देशात ही छोटी छोटी गुंतवणूकच ‘उद्या’बद्दल लोकांना आशा वाटतेय की नाही हे सांगत असते. एखादी व्यक्ती अशी आशा तेव्हाच बाळगते जेव्हा तिला आपल्या आसपास लोक अशी गुंतवणूक करून त्यांच्या कालच्यापेक्षा तुलनेने आज चांगले जीवन जगताहेत असे दिसते. पण हे आसपासचे लोक म्हणजे नेमके कोण? धुणे-भांडी करणारी स्त्री आपल्या मुलाला कॉम्प्युटरचे विशिष्ट शिक्षण देण्याचा निर्णय काही तिच्यापेक्षा अनेक पटीने खूप संपन्न अशा ज्या घरात ती काम करत असते त्या घरातील मुलाच्या अनुभवावरून नसते घेत. कारण त्या कुटुंबाची जीवनशैली, त्यांच्या आकांक्षा या काही तिच्या भावविश्वाचा भाग नसतात. ते जीवन तिच्यापासून खूप दूर असते. अर्थतज्ज्ञ देबराज रे हे ‘आकांक्षांची खिडकी’ (अ‍ॅस्पिरेशनल विंडो) हे रूपक वापरतात. म्हणजे या स्त्रीला या लोकांच्या आकांक्षा माहीत असतात. तिला अनेकांचे आर्थिक यश दिसत असते, पण तिच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडतो तो तिच्याच वस्तीत राहणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक यशाचा. मराठवाडय़ातील कोरडवाहू शेती करणारा दोन एकरवाला गरीब शेतकरी नाशिकच्या सधन सिंचित भागातील शेतात शीतगृह असलेल्या आणि युरोपला द्राक्षे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यापासून नवीन अपारंपरिक पीक लागवडीसाठीच्या गुंतवणुकीची प्रेरणा नाही घेत. तो ती प्रेरणा त्याच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला मिळालेल्या आर्थिक यशापासून घेतो.

म्हणून बुलेट ट्रेन किंवा गुजरातच्या निवडणूक प्रचाराशेवटी नरेंद्र मोदींनी केलेली सीप्लेनची सफर किंवा विक्रमी उसळी घेणारा शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या बातम्या या गतिमान अर्थव्यवस्थेचा संदेश जरूर देतील, पण त्यामुळे गरीब जनतेत चांगल्या ‘उद्या’साठी आवश्यक अशी गुंतवणूक करण्यासाठीचा उत्साह निर्माण होईल का, याबद्दल संशय घेण्यास जागा आहे. छोटंसं हृदय हे कविकल्पनेत चंद्र-ताऱ्यांना स्पर्श करण्यालासुद्धा छोटीसी आशा म्हणण्याएवढं मोठं होऊ शकतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याला ‘आहे तिथून दोन पावलं पुढे’ जाण्याची आस असते! छोटय़ा दुनियेतल्या छोटय़ा आशा-आकांक्षा या अशा असतात.

आकांक्षांची खिडकी उघडी तर असायलाच हवी. अन्यथा व्यक्तीला स्वत:च्या आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणाच असणार नाही. पण जर त्या खिडकीमधून माझ्यापेक्षा खूप दूरवरच्या लोकांच्याच आशांचीच पूर्तता मला जर दिसत असेल आणि त्या आकांक्षा मी बाळगणे जर मला माझ्या कुवतीच्या बाहेर वाटत असेल तर मग मी त्यासाठीचे प्रयत्न करणेच सोडून देतो. आणि असे झाले तर आशेचे निराशेत रूपांतर होते. भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा या गोष्टी ही निराशा तर दाखवत नाहीयेत?

उदाहरणार्थ, जवळपास ५० टक्केजनता ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्या क्षेत्राचा आर्थिक वृद्धीदर नरेंद्र मोदींच्या चार वर्षांत त्याआधीच्या दहा वर्षांच्या सरासरीच्या जवळपास निम्म्यावर म्हणजे केवळ १.९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आपल्या आसपास काही तरी आशादायक घडते आहे असे शेतकऱ्यांना वाटण्याची शक्यता खूप कमी आहे. २०१४ साली असलेली त्यांची आशा आजही कायम आहे की आता त्याचे निराशेत रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे?

व्यक्तीच्या आशा-आकांक्षा काही फक्त आर्थिकच नसतात. व्यक्ती ज्या समूहाची सदस्य असते (जात, धर्म आदीसुद्धा) त्या समूहाची सदस्य म्हणूनदेखील व्यक्तीच्या काही आकांक्षा असतात. भारतासारख्या प्रचंड सामाजिक विषमता असलेल्या देशात व्यक्तीची सामाजिक ओळख (सोशल आयडेंटिटी) ही अन्यायग्रस्तता, न्यूनगंड, अहंगंड या भावनांनी बाधित असते. म्हणून दुसऱ्या समूहावर वर्चस्व गाजवणे हीदेखील आकांक्षा व्यक्तीच्या ठायी असते. म्हणून, आर्थिक आकांक्षा वाढलेल्या आहेत, पण त्या पूर्ण होण्याची शक्यता नाही म्हणून नराश्य वाढलेले आहे अशा वेळी दुसऱ्या समूहावर वर्चस्व गाजवण्याची आकांक्षा प्रबळ होते. भारतातील सर्व प्रमुख दंगलींना असलेले प्रबळ आर्थिक परिमाण देबराज रे आपल्या अभ्यासात दाखवतात.

आज अनेकांना हे खरे वाटत नाही, पण यूपीएचा दहा वर्षांचा कालखंड हा फक्त आर्थिक वृद्धी दराच्याच बाबतीत भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वाढीचा होता असे नाही, तर इतर बहुतांश मॅक्रो निर्देशांकावरदेखील तो त्याआधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत उजवा ठरतो. पण तरी यूपीएचा अभूतपूर्व पराभव झाला. आकांक्षांचा स्फोट झाला आणि त्याची पूर्तता करणे यूपीएला अशक्य ठरले. लोकांच्या वाढलेल्या अपेक्षांची हवा आपल्या शिडात घेऊन सत्तारूढ झालेल्या मोदींवर एक जबाबदारी अशी की, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या अधिक चांगल्या ‘उद्या’बद्दलच्या आशा पल्लवित ठेवणे. आणि दुसरी जबाबदारी अशी की, समाजातील गरीब घटकांमधील नराश्याचे क्षुद्र अस्मितावादी (इथे धर्मवादी या अर्थाने) रूपांतर न होऊ देणे.

खेदाची बाब ही की, गुजरातच्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी विकास हाच एकमेव मुद्दा केला नाही. त्यात धार्मिक अस्मितावादाला मोठे स्थान होते. आणि ही, देशातील राजकारण फक्त विकासावर केंद्रित व्हावे असे मानणाऱ्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मोदी कोणती रणनीती वापरतील हे बघायचे.

लेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.

ईमेल : milind.murugkar@gmail.com