पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकरांकडून सातत्याने पुणे पोलिसांना लक्ष्य करण्यात येत आहे. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपलं गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात पैसे खाल्ले आहेत, असं देखील ते म्हणाले. यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, रवींद्र धंगेकरांच्या आरोपावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – पुणे पोर्श कार अपघातावर अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी पालकमंत्री म्हणून…”

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांनी रवींद्र धंगेकरांच्या आरोपांबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “धंगेकरांनी केलेले आरोप मी माध्यमांमध्ये वाचले. याविषयी मी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केली. मुळात अशाप्रकारे आरोप केले असतील त्यांनी याचे पुरावे सादर करणेही आवश्यक आहे. अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“उचलली जीभ अन् लावली टाळ्याला असं करू नये”

पुढे बोलताना ते म्हणाले, “अशाप्रकारे कोणीही आरोप करायला लागलं, तर अधिकाऱ्यांचे काम करणं कठीण होईल. जर तुम्ही आरोप करत असाल, तर पुरावे सादर करणेही आवश्यक आहे. असं उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असं करू नये.

हेही वाचा – पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी कारवाई; येरवडा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र धंगेकरांनी नेमके काय आरोप केले होते?

“पुणे पोलीस आयुक्तांनी पोर्श अपघात प्रकरणात पैसे खाल्ले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी त्रुटी केल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास वेगळ्या संस्थेकडे दिला पाहिजे. यामध्ये डिलिंग कुणी केलं? कुठल्या हॉटेलमध्ये झालं? पोलीस आयुक्तांना कसं पाकिट गेलं? याचा तपास झाला पाहिजे. पोलीस आयुक्तांशिवाय हे घडूच शकत नाही. पोर्शच्या धडकेत एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवागारात होते आणि त्यांना धडक देणारा मुलगा आणि त्याचा बाप दोघेही घरी जाऊन आराम करत होते. ही कुठली नीतीमत्ता आहे? पैसे खाल्ल्याशिवाय हे होऊच शकत नाही. आता मी रस्त्यावर येऊन या प्रकरणी वाचा फोडणार” असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं होतं.