एखाद्या आयुष्याचा खासगीपणा हा खमंग चर्चेचा विषय होऊ लागला आहे. या प्रवृत्तीचा पगडा आत्मचरित्रांवर पडेल अशी भीती अलीकडच्या साहित्यविश्वाला पोखरू लागली आहे. लतादीदींनीही आत्मचरित्राचा प्रस्ताव नाकारून या संकेतांना दुजोरा दिला.
आसपास अथांग असा महासागर पसरलेला असावा, आपण आश्वस्तपणे त्या महासागरात मनसोक्त विहरत असावे, अशाच एखाद्या क्षणी कसल्या तरी अद्भुताची जाणीव व्हावी आणि मन मोहरून जावे, या अनाकलनीय अद्भुताची पूजा करावी अशी भावना मनात प्रबळ व्हावी, त्या अथांग महासागरातलंच ओंजळभर पाणी घेऊन त्या अद्भुताला अघ्र्यदान करावे आणि त्या क्षणी मनाला मिळणाऱ्या प्रसन्नतेच्या आगळ्या आनंदाच्या अनुभूतीत आपले आपणच चिंबचिंब होऊन जावे, असा काहीसा अनुभव साहित्यविश्वाच्या महासागरात विहरताना अनेकांना अनेकदा आलेला असतो. भूक हा सर्वच प्राणिमात्रांचा स्थायिभाव आहे. पण माणूस आणि अन्य प्राणी यांच्यात अनेक बाबतींमध्ये जसा फरक असतो, तसा भुकेच्या स्थायिभावातही माणूस हा अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा असतो. माणसाची भूक केवळ उदरभरणापुरती मर्यादित नसते. कारण, अन्य प्राण्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, याची ज्या क्षणी माणसाला जाणीव झाली, तेव्हापासून माणसाने पोटाइतके किंवा त्याहूनही अधिक महत्त्व मनाला आणि मेंदूलाही दिले, आणि मनाची मशागत हे माणसाचे अन्य प्राण्यापेक्षा वेगळेपण ठरले. मन, भावना आणि संवेदना ही आपल्याला मिळालेली आगळी देणगी आहे, याची जाणीव मानवी मनाला सजगपणा देत राहिल्याने, ही देणगी ताजी, टवटवीत ठेवण्यासाठी माणूस सतत धडपडत राहिला. मग पोटाच्या भुकेइतकेच महत्त्व मनाच्या भुकेलाही मिळाले आणि मनाची भूक शमल्यानंतरच्या अद्भुत अनुभूतीच्या अत्यानंदात माणूस विहरू लागला. या अनुभूतीनंच मनाची मशागत होत असल्यामुळे मनाची भूक शमविणाऱ्या साधनांच्या शोधात माणसाने स्वत:ला हरवून घेतले आणि साहित्य, संगीत, कला, शास्त्र अशी असंख्य साधने हाती येत गेली. ही अद्भुत साधने केवळ मनाची भूक शमवितात असे नाही, तर त्यामुळे मन सशक्त आणि समृद्धही होते, या अनुभूतीमुळे या साधनांच्याच विकासाचा ध्यास माणसानं घेतला आणि मनाच्या विकासासोबत ही साधनेही सहजपणे विकसित होत गेली. आता तर, १४ विद्या, ६४ कलांच्या पलीकडे या साधनांच्या कक्षा विस्तारत गेल्या. साहित्यक्षेत्र तर महासागरासारखे अथांग झाले. अगणित भुकेली रसिक मने या महासागरातल्याच ओंजळभर पाण्याने आपापले अघ्र्यदान करत प्रसन्नतेच्या आगळ्या अनुभूतीने चिंबचिंब होऊ लागली..
विकास हाच अशा मनांचा ध्यास असला, की समाज असो किंवा व्यक्ती असो, जे जे उत्तम आहे, उदात्त आहे आणि उन्नत आहे, ते ते सारे अनुकरणीय आहे, या जाणिवा प्रगल्भ होतात आणि असे उत्तम, उन्नत, उदात्त ते सारे सारे मनामनापर्यंत पोहोचावे यासाठी स्वार्थनिरपेक्ष स्पर्धाही सुरू होते. साहित्यक्षेत्र हे अशा स्पर्धेचे केंद्र झाले. जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करोनि सोडावे सकळ जन, ही तर आपल्याला संतांकडून मिळालेली शिकवणच आहे. ती आचरणात आणण्यासाठी साहित्यक्षेत्राने पुढाकार घेतला आणि केवळ एकाच नव्हे, तर जगभरातील साहित्याचा खजिना सकळजनांना शहाणे करून सोडण्यासाठी अक्षरश: सरसावला. केवळ करमणूक वा मनोरंजन एवढेच साहित्याचे मर्यादित उद्दिष्ट राहिले नाही.  साहित्यविश्वातूनच मशागत घडलेल्या मनांनीच मग साहित्याची नवनवी दालने सजविण्याचा वसा घेतला. माणूस हेच एक पुस्तक असते, हे साहित्यविश्वाच्या अथांग धांडोळ्यातच जाणवत गेले आणि ही पुस्तके शब्दरूप होऊ लागली. त्यातूनच चरित्रे, स्मृतिचित्रे ,आत्मचरित्रे अशा तिरंगी दालनांची भर पडल्याने हे विश्व आणखीनच बहारदार झाले. इतिहास जिवंत होत गेला, समाजाला प्रेरणा देणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या जीवनाचे प्रेरणादायी पदर उलगडू लागले आणि मनोविकासाचा ध्यासही सोपा होऊ लागला. साहजिकच चरित्र, स्मृतिचित्र आणि आत्मचरित्रांना साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळाले.
मोठय़ा माणसांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे ही समाजाच्या जडणघडणीची प्रेरणा असते. एखादे जीवन समाजासाठी प्रेरणादायी आहे, या जाणिवेने चरित्रे लिहिली जातात आणि आपले आयुष्य समाजासमोर आले पाहिजे, या भावनेने आत्मचरित्रे लिहिली जातात. असे आयुष्य खरोखरीच प्रेरणादायी आहे की नाही हे ठरविणे समाजावर सोपविले जाते. म्हणूनच काही आत्मचरित्रे समाजाला झपाटून सोडतात. आपले आत्मचरित्र धूळ खात पडावे असे मला वाटत नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लता मंगेशकरांना सांगितले. असंख्य आयुष्यांची प्रेरणा असलेल्या बाळासाहेबांनी आत्मचरित्र लिहिले नसले, तरी त्यांचे जीवनच उघडय़ा पुस्तकासारखे होते. त्यांच्या सहवासात आलेल्यांना ते सहज वाचता आले. लता मंगेशकरांच्या आयुष्याभोवती सुरांच्या इतक्या अद्भुत लगडींचा सुरेल वेढा आहे. त्यामुळे रसिक मनांवर अर्धशतकाहूनही अधिक काळ आगळे गारूड घालणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अजूनही अनेकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. हीच खंत त्यांचे धाकटे बंधू हृदयनाथ मंगेशकरांनी बोलून दाखविली आणि लतादीदींच्या आयुष्याचे हे अदृश्य पैलू आता उलगडणार अशा आशा पालवल्या. लतादीदींनी नम्रपणे हा सल्ला नाकारताना दाखविलेली ऋजुता कोणाही सुजाण मनाला भावेल अशीच आहे. आपल्या आयुष्यातील असंख्य घटना समाजातील अनेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे प्रांजळ आत्मचरित्र लिहिताना कळत नकळत त्या व्यक्तींवर अन्याय होऊ नये, ही त्यांची भावना साहित्यसंस्कृतीच्या संकेतांचे पारदर्शक पालन करणारी आहे. एकेकाळी, आयुष्याच्या उत्तररंगात प्रवेश केल्यानंतर आयुष्याच्या पूर्वरंगाचा आढावा घेण्याचा ध्यास लागत असे. आपण उभ्या आयुष्यात काय कमावले, काय गमावले, आयुष्याने आपल्याला काय दिले आणि त्याच्या बदल्यात आपण काय दिले याचा प्रामाणिक हिशेब मांडावा, या भावनेतून आत्मचरित्र लिहिण्याची ऊर्मी जागी व्हायची. अशा ऊर्मीतून उमटलेली अनेक आत्मचरित्रे समाजाची प्रेरणा ठरली. पण कदाचित त्यामुळेच, काळाच्या धंदेवाईक ओघात आत्मचरित्र हा केवळ जेमतेम साहित्यप्रकार होऊन बसला. आयुष्याच्या पूर्वरंगाकडे वळून पाहण्यासाठी उत्तररंगापर्यंत पोहोचण्याएवढा धीर धरवेनासा होऊ लागला, आणि जगण्यावर कर्तृत्वाचा एखादा अमीट ठसा उमटण्याआधीच आपलं जगणं जगासमोर मांडण्याची स्पर्धाही सुरू झाली. आपले जगणे शब्दरूपाने समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी धंदेवाईक शब्दप्रभूंना भाडय़ाने घेण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. खासगीपणा हा माणसाचा परंपरागत हक्क आहे आणि तो जपण्याचा अधिकारही प्रत्येकालाच आहे. तरीही दुसऱ्याच्या खासगीपणात डोकावण्याची प्रवृत्ती अलीकडे बळावत चालली आहे. या प्रवृत्तीचे व्यापारीकरणही वाढू लागले आहे. एखाद्या आयुष्याचा खासगीपणा हा खमंग चर्चेचा विषय होऊ लागला आहे. या प्रवृत्तीचा पगडा आत्मचरित्रांवर पडेल अशी भीती अलीकडच्या साहित्यविश्वाला पोखरू लागली आहे. आत्मचरित्राला पारदर्शकतेची अट असते. प्रांजळ निवेदनाचा बाज त्यामध्ये अपेक्षित असतो. जे जे लपवावे, तेच नेमके उघड करणारी धंदेवाईक आत्मचरित्रे केवळ विकृतींना खतपाणी घालतील आणि साहित्यविश्वाचा प्रांजळपणा गढूळ करतील अशी भीती आजकाल व्यक्त होताना दिसते. आत्मचरित्रांना हे भान राहिले नाही, तर निदान, समाजाने तरी ते भान ठेवलेच पाहिजे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!