सर्व काही परमात्मसत्तेनं व्यापून आहे, अभेद आहे; ही स्थिती कशानं येईल? ती स्थिती येण्याआधीचे चार टप्पे श्रीतुकाराममहाराज सांगतात. हे टप्पे असे आहेत- (१) नारायणें दिला वसतीस ठाव, (२)ठेवूनियां भाव ठेलों पायीं, (३) तुका म्हणे दिलें उमटूनि जगीं (४) घेतले ते अंगीं लावूनियां! पहिला टप्पा म्हणजे, नारायणे दिला वसतीस ठाव. नारायणाने वसतीस ठाव दिला. हा ‘नारायण’ कोण? नर+आयन ही नारायण शब्दाची फोड आहे. ‘आयन’ म्हणजे घर. नरदेहरूपी घरात प्रकटलेला परमात्मा अर्थात श्रीसद्गुरू हा नारायण आहे. तो मनुष्याच्या रूपातच आहे म्हणून त्याला ओळखता येत नाही. नरदेहाच्या आवरणाआड लपून तो या जगात वावरत आहे. त्या श्रीसद्गुरूचा शोध मी घेऊ शकत नाही. खऱ्या सद्गुरूला मी ओळखू शकत नाही. गीतेत भगवंतानं स्पष्टच म्हटलं आहे, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्. माणसाच्या शरीराचा आधार घेऊन या जगात वावरणाऱ्या मला मूढ लोक ओळखू शकत नाहीत. समर्थ रामदासही सांगतात, ‘‘जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरुवीण तो सर्वथा ही न दीसे।।’’ म्हणजे या जगामध्ये थोरला देव चोरून राहत आहे. चोरून म्हणजे स्वत:चं वास्तविक दिव्य स्वरूप लपवून तो सामान्य माणसासारखा या जगात वावरत आहे. हा थोरला देव म्हणजेच श्रीसद्गुरू, हेदेखील समर्थ पुढच्याच वाक्यात सांगतात. गुरुशिवाय हा देव दुसरा कोणी नाही. गुरुशिवाय त्याला अन्यत्र पाहता येणार नाही. तो सद्गुरू कसा असतो? समर्थ सांगतात, ‘‘लपावें अती आदरें रामरूपीं। भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी। कदा तो जनीं पाहतां ही दिसेना। सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना।।’’ हा सद्गुरू परमात्म्याच्या रूपामध्येच रममाण असतो. लपला असतो. स्वस्वरूपी सदोदित रममाण असल्यानेच त्याचा या जगातला वावर भयातीत आणि निश्चित अर्थात ठाम असतो. पण जगाच्या बाजारात त्याला शोधता येणार नाही. त्याची खूण एकच, त्याचं परमात्म्याशी अखंड ऐक्य असतं. परमात्मभावापेक्षा भिन्न भावानं तो कधीच वावरत नाही. तेव्हा असा जो सर्वसमर्थ खरा श्रीसद्गुरू तोच नारायण आहे. त्याचा शोध माझ्या बुद्धीने लागेल का? कधीच नाही. नरेंद्रनाथांच्या तीक्ष्ण आणि अजिंक्य बुद्धीला गंगेच्या काठावर वेडय़ागत वावरणाऱ्या आणि मातीच्या मूर्तीला ‘आई आई’ करीत आळवणाऱ्या रामकृष्ण परमहंसांची थोरवी स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर कधीच उमगू शकत नव्हती. रामकृष्णांनीच स्वत:चं अलौकिकत्व जाणवून दिलं तेव्हाच कुठे नरेंद्रनाथांना ते उमगलं. आपल्याबद्दल शेकडो विकल्प मनात आणवून नरेंद्रनाथांना दूर ठेवणं रामकृष्णांना अशक्य का होतं? पण त्यांना नरेंद्राला जवळ करायचं होतं म्हणूनच त्यांनी स्वत:ला ओळखू दिलं. श्रीसद्गुरूंनी ठरवलं तरच ते मला जवळ करू शकतात. मी ठरवून त्यांना आपलंसं करू शकत नाही. त्यांनी ठरवलं तरच मी त्यांना आपलासा होतो. तुकाराममहाराजही सांगतात, नारायणे दिला वसतीस ठाव. त्यांनी ठाव दिला म्हणून मी त्यांच्यापाशी राहिलो!
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2013 रोजी प्रकाशित
१५६. नारायण
सर्व काही परमात्मसत्तेनं व्यापून आहे, अभेद आहे; ही स्थिती कशानं येईल? ती स्थिती येण्याआधीचे चार टप्पे श्रीतुकाराममहाराज सांगतात. हे टप्पे असे आहेत- (१) नारायणें दिला वसतीस ठाव, (२)ठेवूनियां भाव ठेलों पायीं, (३) तुका म्हणे दिलें
First published on: 08-08-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan