कल्याणच्या साठेवाडय़ाचा एक चिरेबंद शनिवारी रात्री, नेत्रा साठे यांच्या निधनाने हलला. कुठूनही आलेल्या सांस्कृतिक पांथस्थाला स्वगृही आल्याचा भास व्हावा, असे स्वागतशील वाडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी होते, त्यापैकी अगदी आजही तो लौकिक भक्कमपणे टिकवणारा हा साठेवाडा. शिल्पकार आणि धातुशिल्पांसाठी स्वत:ची ओतशाळा (फौण्ड्री) काढून ती नावारूपाला आणणारे सदाशिव (भाऊ) साठे यांच्या पत्नी म्हणून या वाडय़ात त्यांचा १९५६ च्या सुमारास प्रवेश झाला. चित्रकार के. आर. केतकर यांच्या त्या कन्या, आणि पतीही दृश्यकला क्षेत्रात असल्याने लग्नानंतरही जे जे कलाशाळेतील शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि पुढे, ‘कोल्ड सिरॅमिक्स’ चित्रांच्या जनक म्हणून नावही कमावले.  
 ‘कोल्ड सिरॅमिक्स’चा सिरॅमिक मातीशी किंवा मातकामाशी काहीही संबंध नाही. मुळात हे पॉलिएस्टर रेझिन. त्याचा प्रवाहीपणा एकाच वापरापुरता, गरम असेपर्यंतच टिकतो.. घट्ट झाल्यावर पोत आणि चमक जणू ‘ग्लेझ्ड सिरॅमिक’च्या कलावस्तूंसारखी दिसते, म्हणून साठे यांनीच याचे नामकरण केले! या साधनाचा वापर हल्ली साध्या काचेवर ‘स्टेन्ड ग्लास’चा आभास निर्माण करणारी काचचित्रे करण्यासाठीही होतो; पण नेत्रा साठे यांनी ते कॅनव्हासवर वापरले. गरम संयुगाच्या प्रवाहीपणाला हवे तसे- जलदगतीनेच पण चित्राची नजाकत न बिघडवता- हाताळण्याची हुकमत नेत्राताईंकडे होती. या साधनाचा वापर सुरुवातीला त्यांनी कॅनव्हास-बोर्डावर करून पाहिला, पण पुढे कौशल्य इतके वाढले की थेट कॅनव्हासवरही त्या रंगवत. हे ‘रंगवणे’ नव्हते.. एकापरीने उत्थित-शिल्पासारखेच हे काम! पण या खाचाखोचा जाणू शकणाऱ्या कलासमीक्षकांनी नेत्रा साठे यांच्या चित्रांमध्ये तंत्रापेक्षा चित्रविषय काय आहे हे पाहिले.. आणि चित्रांत पुन्हा राजस्थानी वा तत्सम स्त्रियाच दिसताहेत म्हणून ‘चित्रकलेतला ‘स्थळ : दिवाणखाना’ ’ अशी संभावनाही करून टाकली. अशा समीक्षकांची तमा न बाळगता, स्वत: चित्रांत रमण्याचे आणि लोकांना चित्रांकडे नेण्याचे काम नेत्रा साठे करीत राहिल्या.
लेखिका म्हणूनही त्यांचे नाव झाले, पण या लेखनाचा पोत समजून घ्यायचा तर आधी नेत्रा यांनी (विवाहापूर्वी) संस्कृत नाटकांमध्ये केलेल्या भूमिका, पुढे अगदी ‘अंधायुग’च्या प्रयोगातही महत्त्वाची भूमिका निभावणे आणि मग त्यांनी लिहिलेल्या एकांकिका, असे या लेखकीय प्रवासाचे सुरुवातीचे टप्पेही लक्षात असलेले बरे.  शैली, तंत्र यांची चाड ठेवूनच काम करायचे आहे, ही जाणीव त्यांनी लिहिलेल्या नृत्यनाटय़ांतून प्रतीत होते. ‘पॅलेट’ हे त्यांचे पुस्तक समकालीन सुसंस्कृतपणाची साक्ष देणारे आहे.   

Story img Loader