‘लोकसत्ते’च्या बुधवार, दि. २ जानेवारीच्या अंकात पहिल्या पानावर ‘ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर’ अशा शीर्षकाखाली एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीमागे काही दबावाचे राजकारणही असू शकते. जेव्हा भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हिंदूमधील एक मोठा वर्ग बौद्ध धर्मात दाखल झाला त्यापूर्वी डॉ. आंबेडकर यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार करावयाचा, याबद्दल प्रदीर्घ काळ विचारमंथन केले होते. आपल्या आठ अनुयायांना शीख धर्मात पाठवून त्याही धर्माचा मागोवा घेतला होता. आंबेडकरांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मुसलमान धर्म स्वीकारावा यासाठी तत्कालीन मुसलमान पुढाऱ्यांनी खूप प्रयत्न केले होते. फत्तेपूरच्या नवाबाने यासाठी त्याकाळात शेकडो कोटी रुपये देऊ केले होते. पण बाबासाहेबांनी हिंदू धर्माशी बरेचसे साम्य असलेला बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हे त्यांचे हिंदू धर्मावर आणि भारत देशावर मोठे उपकार आहेत. डॉ. आंबेडकरांच्या वाङ्मयात हिंदू धर्माबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाची विधाने आढळतात. पण इतर काही फुटीरवाद्यांप्रमाणे आगखाऊ मते ते व्यक्त करीत नाहीत. साकल्याने विचार केला तर त्या काळच्या परिस्थितीनुसार धार्मिक ऐक्य सांभाळले जाईल, असा दूरदर्शित्वाचा विचार बाबासाहेबांनी केला असावा, असे वाटते. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्याबद्दल जो मजकूर आहे त्यात कलम २५ मध्ये २ क्रमांकाच्या स्पष्टीकरणात हिंदू धर्मीयांबरोबरच शीख, जैन व बौद्ध यांचाही उल्लेख एकत्र करण्यात आलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होय. बाबासाहेबांनी धर्मातराचा निर्णय घेतल्यानंतर महात्मा गांधीच्या पुढाकाराने काही हिंदू धर्मीय विचारवंतांनी आणि शंकराचार्यानी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. डॉ. बाबासाहेब हे कायदेतज्ज्ञ आणि आपली बाजू योग्यप्रकारे मांडण्यात पटाईत असल्यामुळे या वादविवादात त्यांनी निर्माण केलेले काही मुद्दे विरोधी पक्षातील मंडळींना निरुत्तर करणारे ठरले. त्यानंतर काही वर्षांनी करपात्रीजी महाराज यांच्या प्रयत्नाने चारही पीठांच्या शंकराचार्यानी एकत्र येऊन हिंदू धर्मात अस्पृश्यता नाही, असे जाहीर केले होते; पण दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पूर्वीच्या काळाचा विचार केला तर सर्वसाधारण समाजातून आता अस्पृश्यता केवळ काही मंडळींच्या मतलबी स्वार्थातच आपल्याला आढळून येते. दैनिक व्यवहारात अस्पृश्यतेचा विचारही कोणी करीत नाही.
आता हा इतिहास सांगण्याचे कारण एवढेच की, ओबीसी समाजाने संघटित धर्मातर करण्याचे ठरविले तर हिंदू धर्मीय विद्वानांनी आणि विचारवंतांनी त्याबाबत गाफील राहू नये. कारण धर्मातर झाल्यावर तो समाज मूळ प्रवाहापासून बाजूला होतो, काही वेळा तर वैर भावनाही बाळगू लागतो. हे टाळले पाहिजे. मानवी मनाला अधिक उन्नत करण्याच्या विषयात हिंदू धर्माचे योगदान जागतिक महत्त्वाचे आहे. आपापसातील किरकोळ वादात धर्महानी होऊ देण्यात अर्थ नाही.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

काय नको हे आता जनतेनेच ठरवावे
‘लोकप्रियतेच्या पलीकडले..’ हा अग्रलेख (२ जाने.) वाचला. एकंदरीत आपल्या देशामध्ये कोणतीही घटना घडल्यास कशा प्रकारे तिच्याकडे आपण पाहतो व उपाय करतानाही प्रतिक्रियात्मक धोरणे आखतो याबाबतचा परामर्श त्यात आहे. मात्र, ‘जन्मठेप आणि उर्वरित आयुष्य तुरुंगात खडी फोडायला लावणे ही शिक्षा जास्त क्लेशकारक असल्याचे व पापाच्या जाणिवेचे ओझे त्यास जन्मभर वागवावे लागते,’ हे मत पटले नाही. अशा नराधमांचे ओझे सरकारने का वाहायचे?
शिवाय अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय तातडीने मिळणे महत्त्वाचे आहे. बलात्काराचे कूळ, मूळ हे तीव्र कामवासनेत आहे. त्यास आज समाजात चित्रपट, जाहिरातींच्या माध्यमांतून भयानक प्रोत्साहनच मिळत आहे. त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल याबाबत सरकारने कडक धोरण राबवणे महत्त्वाचे आहे. मात्र सध्या इतके निद्रिस्त सरकार आहे की, शांत राहून न्याय मिळत नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यास पोलीस बडवून काढतात.
मग करायचे तरी काय? देशाच्या हितासाठी काय हवे काय नको हे आता जनतेनेच पुढाकार घेऊन ठरवावे. समाजामध्ये लैंगिक दुराचार पसरवणारी अश्लीलतेची विषवल्ली जाहिराती व चित्रपटांतून पसरली आहे त्यास आता नागरिकांनीच कडाडून विरोध करत या अश्लीलतेचे विसर्जन केले पाहिजे.
जयेश श्रीकांत राणे, भांडुप.

टीव्हीसाठी हाय डेफिनिशन, लाइव्ह रेकॉìडग, थ्रीडी यांची खरंच गरज आहे?
टीव्ही पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स लावणे १ नोव्हेंबरपासून चार प्रमुख शहरांत अनिवार्य केले आहे आणि या मुद्दय़ावर कोणीच काही बोलत नाही, याचे आश्चर्य वाटते. म्हणजे मुळात केबल चालकांची मक्तेदारी का स्वीकारायची आणि ते लादतील तो प्लान का स्वीकारायचा म्हणून हा बॉक्स बसवावा हा पर्याय तेव्हा सुचविण्यात आला आणि तेव्हा टीव्हीवरील चच्रेत असे चित्र रंगविण्यात आले होते की तुम्हाला २०० चॅनेल नको असतील तर फक्त ५० चॅनेलच- अर्थात कमी पैसे मोजून- घेण्याचा पर्याय तुम्हाला असेल. आता मात्र असे झाले आहे की केबल चालकाकडून जो ठरावीक पर्याय मिळत आहे तो उत्तम वाटावा! कारण सगळ्यात जास्त चॅनेल आणि आहेत तेवढेच पसे, पण आमचा आक्षेप इथेच आहे की २८० चॅनेल नको असताना का घ्यायचे, म्हणजे सेट टॉप बॉक्स बसवून पुन्हा मूळ मुद्दा तसाच राहिला आहे आणि भरुदड अधिक भरतो आहोत हे छानच झाले. अशा समाधानासाठी ग्राहकाच्या डोक्यात हाय डेफिनेशन, लाइव्ह रेकॉìडग अशा सोयी भरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे आता साध्या टीव्हीवर जे दिसते आहे ते काय वाईट आहे का?
ज्या ग्राहकांना हाय डेफिनेशन, लाइव्ह रेकॉìडग हे नको असेल त्यांनी ते का घ्यायचे? म्हणजे वर नमूद केलेला पर्याय ग्राहकाला शेवटी मिळत नाहीच; वर सेट टॉप बॉक्सचा खर्च आणि मग कायम आयुष्यभर त्याच्या देखभालीचा खर्च पत्करायचा आणि पसे मात्र आत्ता जेवढे देतो तेवढेच द्यायचे? हे म्हणजे परत येरे माझ्या मागल्या असे झाले, असे वाटते. हे करायला ग्राहक तयार झाला तरी परत चॅनेलची संख्या कमी करण्याचे पर्याय फारच कमी आहेत. कमीत कमी सगळे जण १५०-२०० चॅनेल्स घ्यायलाच लावतात.
हा सारा खेळ आमिषे दाखवून गळ्यात वस्तू मारण्याचा आहे आणि त्यामुळे संभ्रमित होऊन कोणीच त्याविरुद्ध बोलत नाही, असे वाटते.
सुरेश पित्रे

सचिनशी आपण
क्रूरपणे वागलो का?
सचिन तेंडुलकर याचं क्रिकेटमधील मोठेपण वेगळं सांगण्याची गरज नसावी. त्याच्या निवृत्तीनंतर प्रसिद्ध झालेल्या अविश्वसनीय आकडेवारीतूनही खरं पाहता व्यक्ती म्हणून त्याचं मोठेपण व्यक्त होत नाही.  प्रसिद्धी आणि प्रशंसेच्या सर्वोच्च शिखरावर २३ वष्रे राहूनही ‘शेजारचा सचिन’ वाटावा, असे निरागस भाव चेहऱ्यावर टिकवणाऱ्या सचिनचं अलौकिकत्व सिद्ध आहे. वाचाळवीरांच्या वितंडवादात कधीही न पडता केवळ बॅटनेच प्रत्येक टीकाकाराचं तोंड बंद करणाऱ्या त्याच्या कारकिर्दीचे आपण साक्षीदार असल्यामुळे चांगुलपण हा सद्गुण अस्तित्वात आहे, यावर विश्वास बसण्यास आम्हा सामान्यांना जड गेलं नाही.
भावी पिढीतील प्रतिनिधी त्याची वर्णनं ऐकून अवाक होतील आणि आपल्याला एक प्रश्न विचारतील की, फॉर्ममध्ये वयापरत्वे थोडं शैथिल्य आलं आणि तो काही काळ त्याच्या दर्जाप्रमाणे खेळू शकला नाही, तर तुम्ही लगेच गिधाडाप्रमाणे त्याचे लचके तोडायला का निघाला होतात? त्याच्या पासंगालाही पुरण्याची पात्रता नसलेली क्रिकेटमधली बांडगुळं चित्रवाणी वाहिन्यांवरून ऊठसूट निवृत्तीचा मुहूर्त का सुचवत होती? त्याची निवृत्ती हा राष्ट्रीय प्रश्न तुम्ही बोलघेवडय़ांनी का बनवला होता? तुम्ही या सुस्वभावी प्रतिभावंतांशी इतके क्रूरपणे का वागलात? या प्रश्नांची उत्तरं खरंच आम्हा करंटय़ांकडे असणार नाहीत.
जी. बी. देशमुख, अमरावती</p>