उल्हास पवार (माजी आमदार  व संतसाहित्याचे अभ्यासक)
भागवत संप्रदायाने उदात्त मानवतावाद तर स्वीकारलाच, पण देवकार्याला देशकार्याचे आणि देशकार्याला देवकार्याचे रूप देण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून केला आहे. ‘तुका म्हणे नाही जातिसवे काम ज्याचे मुखी नाम तोचि धन्य’ हा संतशिरोमणी तुकाराम महाराज यांचा अभंग वारकरी प्रत्यक्ष आचरणात आणतात..

महाराष्ट्रामध्ये उत्सवांची परंपरा आहे. स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षकाळामध्ये, विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. १८५७च्या बंडानंतर ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हणत लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्र, भाषणे, चळवळी, आंदोलने अशा माध्यमातून लोकप्रबोधन करीत स्वातंत्र्यासाठी रान पेटवले. पेशवाईमध्ये घरात असलेल्या गणेशोत्सवाला टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले. लोकांनी एकत्रित यावे हा उद्देश गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाद्वारे साध्य केला. या उत्सवांद्वारे विविध जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेतले गेले. म्हणूनच ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ असा लोकमान्यांचा गौरव झाला. महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईचे पुणे हे केंद्रबिंदू होते. लोकमान्यांच्या काळात मेळ्यांमधून लोकसंगीत सादरीकरणातून समाजप्रबोधन केले जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलसाच्या माध्यमातून, तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक मेळ्यांच्या माध्यमातून नाटक, फटके, पोवाडे सादर करीत साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे बळ दिले. उत्सवप्रियतेसह सामाजिक भान ठेवत काळानुरूप बदल करताना प्रसंगी कठोर निर्णय घेण्याच्या अनेक घटना इतिहासामध्ये घडल्या आहेत.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
koradi police station, Nagpur, case registered, Sexual abuse, minor girl
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतशिरोमणी तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, निळोबाराय, नरहरी महाराज, सेना महाराज, सावता माळी, चोखोबा अशी भागवत संप्रदायातील संतांची मालिका आहे. पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी वारीची मोठय़ा प्रमाणात सुरुवात केली. तुकोबांच्या पादुका एका पालखीत घेऊन पालखी देहू येथून आळंदीला घेऊन यायची. आळंदीला त्याच पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवून एकत्रित िदडीद्वारे पायी वारी निघत असे. कालांतराने वारीला गर्दी वाढल्यामुळे दोन्ही पालख्या स्वतंत्रपणे मार्गक्रमण करू लागल्या. टप्प्याटप्प्याने निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्वर), सोपानदेव (सासवड), मक्ताई (मुक्ताईनगर-जळगाव), एकनाथ (पैठण), सावता माळी (सोलापूर), चोखोबा (मंगळवेढा) या पालख्या निघू लागल्या. आता आषाढी वारीला ३६ पालख्या पंढरपूरला येतात. एका पालखीबरोबर दीड ते दोन लाख वारकरी चालत राहतात. वारीचे व्यवस्थापन, शिस्त व स्वच्छतेच्या स्वयंपालनाचे कर्तव्य या पालख्यांमध्ये आहे. मुक्कामाच्या ठिकाणी शेवटचे भजन होते. नामस्मरण झाल्यानंतर भालदाराने मानदंड उंचावल्यानंतर क्षणार्धात टाळ-मृदंगाचे वादन थांबते. कोणत्या शाळेत आणि विद्यापीठात गेलेली किती माणसे आहेत? काही सुशिक्षित, काही अल्पशिक्षित, काही पूर्ण निरक्षर आहेत. पण, शिस्तीचे पालन या सामाजिक भानाची जाणीव साऱ्या वारकऱ्यांना आहे. एकमेकांशी बोलताना ‘माउली’ असा उल्लेख केला जातो. मुक्कामाच्या ठिकाणी विविध धर्माचे लोक वारकऱ्यांसाठी भोजन घेऊन तयार असतात. आनंदाचा क्षण आणि पुण्याचे काम म्हणून याकडे पाहिले जाते. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा संदेश वारकरी संप्रदायामध्ये पाळला जातो.

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व पालख्या वाखरीच्या तळावर एकत्र येतात. कमीत कमी पाण्याचा वापर व सुविधांची कमतरता असली तरी वारकरी कधीही तक्रार करताना दिसत नाहीत. काही लोक आपला राजकीय नेतृत्वाचा किंवा आपला विचार रुजविण्यासाठी काही वेळा गैरफायदा घेऊन मोजक्या लोकांना हाताशी धरून प्रयत्न करीत आहेत. पण, त्याला बळी पडणारे लोकही कमी आहेत. असा  प्रयत्न करणे वाईट आहे. ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाची आणि मानवाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना ही वारीने आम्हाला दिलेली शिकवण आहे. जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयामध्ये पसायदानाचा इंग्रजी अनुवाद लावण्यात आला आहे. हे वारीचे वैभव आहे. प्रेमाच्या, मानवतेच्या, बंधुभावाच्या कल्पनेला खीळ घालून काही लोकांच्या मनामध्ये किल्मिष निर्माण करून आंदोलनाचा होत असलेला प्रयत्न वारीच्या तत्त्वज्ञानाला आणि शिस्तीला बाधक आहे.

नैसर्गिक संकटाचे भान ठेवून आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देणाऱ्यांमध्ये वारकरी संप्रदाय आघाडीवर आहे. करोना संकटाने जगाला ग्रासले आहे. परिपूर्ण उपचारांची अजूनही सूत्रबद्ध योजना जगातील डॉक्टरांना सापडली असा दावा जागतिक आरोग्य संघटनेसह कोणीही करू शकत नाही. उपचार, संशोधन आणि प्रयत्न चिकाटीने सुरू आहेत. पण, त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारी निघू शकत नाही. आषाढी वारीला १४ लाख भाविक पंढरपूरमध्ये असतात. कार्तिकी वारीला ७ ते ८ लाख लोक असतात. चैत्र आणि माघ वारीला अडीच लाख, तर दर महिन्याच्या एकादशीला ५० हजार लोक दर्शनासाठी येतात. केव्हा एकदा पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतो यासाठी वारकरी आसुललेला आहे. पण, शासन आणि प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे पालन वारकरी संप्रदायाने केले. आळंदी आणि देहू संस्थानच्या विश्वस्तांनी पायी वारीसाठी इतक्या लोकांना परवानगी द्यावी अशी विनंती करताना आपले म्हणणे आग्रहाने मांडले. वर्षांनुवर्षांची वारी कधी खंडित झालेली नाही. त्यामुळे वारकऱ्यांचे अंत:करण गलबलून गेले होते. पण, ‘प्राप्त परिस्थितीमध्ये शासनाला योग्य वाटतो तो निर्णय घ्यावा आम्ही त्याला सक्रिय पाठिंबा देऊ’, असे सर्वानी सांगितले. ‘लोकांतामध्ये एकांत आणि एकांतामध्ये लोकांत पाहता आला पाहिजे’ हे बाळासाहेब भारदे यांचे वचन वारकऱ्यांनी आचरणात आणले. हे भान उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्यामध्ये ठेवले गेले असते तर अधिक बरे झाले असते. एकत्र आल्यामुळे संसर्ग वाढेल आणि अनेक जीव धोक्यात येतील याचे भान ठेवायला हवे होते. काही आखाडय़ांनी स्वयंस्फूर्तीने माघार घेतली. इथे मात्र, एका कीर्तनकाराचा अपवाद वगळता कोणीही खळखळ केली नाही. वारकऱ्यांनी भक्ती आणि श्रद्धेचा मोह टाळलेला आहे. पायी वारी निघाली नसली तरी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भजन-कीर्तने झाली.

करोनामुळे ही परिस्थिती झाली. पण १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाच्या कालखंडात वारकऱ्यांनी शासनाच्या आदेशांचे पालन केले होते. हीच गोष्ट सार्वजनिक गणेशोत्सवाची. चीन आक्रमण, पाकिस्तान विरुद्धची लढाई, किल्लारीचा भूकंप या काळात गणपती विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांनी सूर्यास्तापूर्वी संपविली होती. आपत्कालीन परिस्थितीत ताबूत मिरवणुकीमध्येही हे भान जागृत ठेवल्याचे दाखले देता येतात. सामाजिक ऐक्याच्यादृष्टीने हे उत्सव उपयुक्त ठरले आहेत. पंढरीच्या वारीमध्ये मुस्लीम वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. लढाईचा खर्च वाढल्यानंतर त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भात खाणे सोडले होते. त्या वेळी त्यांचे अनुकरण करीत अनेकांनी जेवणातून भात वर्ज्य केला होता.

१९६२ च्या युद्धामध्ये सरकारला मदत हवी असताना तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तसे आवाहन केले होते. त्या वेळी पुण्यामध्ये व्यापारी मंडळींनी घरातील दागिने यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आणून दिले होते. या संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीतील काही रक्कम सरकारला दिली आहे. कोयनेच्या भूकंपाच्या वेळी अखिल मंडई मंडळाने मंडईतील सर्व गाळेधारकांचा एक दिवसाचा नफा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा केला होता. नैसर्गिक संकट असेल किंवा शत्रू राष्ट्राकडून आलेले संकट असेल, महापुराचे संकट असेल त्या त्या वेळी उत्सव आटोपशीर करावेत, त्याला गालबोट लागणार नाही, पोलीस आणि प्रशासनाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य आहे ती आर्थिक मदत सरकारला आणि स्वयंसेवी संस्थांना करण्याचे भान ठेवले गेले आहे. देवकार्याला देशकार्याचे आणि देशकार्याला देवकार्याचे रूप देण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून केला आहे. ‘तुका म्हणे नाही जातिसवे काम ज्याचे मुखीनाम तोचि धन्य’ हा संतशिरोमणी तुकाराम महाराज यांचा अभंग वारकरी प्रत्यक्ष आचरणात आणतात. या मंत्राचे पालन करण्याची आवश्यकता आहे.