राहुल द्रविडच्या अस्तानंतर त्याच्यासारखीच तंत्रशुद्ध फलंदाजी जोपासणारा एक ‘अजिंक्यतारा’ गवसला आहे. द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेटमधील चीनची भिंत. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा रुबाब टिकून होता. बालपणीपासूनच अजिंक्यला द्रविड आवडायचा. त्याला आदर्श मानूनच अजिंक्यने आपले क्रिकेटचे वेड जोपासले. भारताकडून आणि राजस्थान रॉयल्सकडून द्रविडसोबत खेळताना फलंदाजीचे मर्म त्याने जाणून घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी अजिंक्यला खरे तर खूप प्रतीक्षा करावी लागली. परंतु जेव्हा प्रत्यक्षात संधी मिळाली, तेव्हा तो तेजाने तळपला आणि परदेशी खेळपट्टय़ांवरही तो त्वेषाने बरसला.
२०११मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी अजिंक्यची प्रथमच कसोटी संघात निवड झाली होती. परंतु तो देशाचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. कारण दिग्गज फलंदाज त्या वेळी संघात होते.  त्यानंतर २०१२-१३मध्ये इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हाही अजिंक्यची कसोटी पदार्पणाची प्रतीक्षा संपली नाही. १६ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत अजिंक्यला पदार्पणाची संधी चालून आली.  परंतु अजिंक्य पहिल्याच कसोटीत अपयशी ठरला. मग दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याने सहाव्या स्थानाची धुरा समर्थपणे सांभाळली. डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल आणि व्हर्नन फिलँडरसारख्या तेजतर्रार गोलंदाजांसमोर त्याने निधडय़ा छातीने फलंदाजी केली आणि ६९.६६च्या सरासरीने २०९ धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अजिंक्यचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. मग न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथील पहिल्या कसोटीत अजिंक्य चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. परंतु वेलिंग्टनला त्याने आपल्या कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक पूर्ण केले, तेही आपल्या कारकीर्दीतील पाचव्या कसोटीत.
द्रविड आणि सचिनने अजिंक्यच्या फलंदाजीला आकार देण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. अजिंक्य गेली आठ वष्रे मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. त्याच्या खात्यावर प्रथम श्रेणीतील ६०७८ धावा, २० शतके आणि २६ अर्धशतके जमा आहेत. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी अजिंक्य अयोग्य आहे, असे क्रिकेटमधील जाणकारांचे म्हणणे अजिंक्यने राजस्थान रॉयल्सकडून दिमाखात फलंदाजी करून खोटे ठरवले. गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीग स्पध्रेतही अजिंक्यने तुफानी फलंदाजी करीत ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार जिंकला. आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अजिंक्यने जम बसवला आहे. म्हणूनच एरव्ही मितभाषी असलेला अजिंक्य आपल्या खेळाद्वारे लक्ष वेधतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality cricketer ajinkya rahane
First published on: 17-02-2014 at 01:34 IST