पन्नाशीलाही न पोहोचता जहांगीर यांचे निधन झाले, याचे दु:ख अनेकांना आहे. पत्रकारितेत आता कुठे त्यांचे बस्तान बसत होते. ते ज्या चित्रवाणी वाहिनीचे प्रमुख संपादक होते त्या ‘न्यूजएक्स’चे कार्यक्रमतंत्र निराळे आहे, याची जाणीव आता कुठे प्रेक्षकांना होत होती. ट्विटर/ फेसबुकसारख्या समाजमाध्यमांत जहांगीर यांचा वावर आणि चाहतेसुद्धा वाढू लागले होते.. त्यांच्या ट्विप्पण्या वाचणे नेहमीच मनोज्ञ असते, याची जाणीव ‘लोकसत्ता-ट्विप्पणी’च्या वाचकांनाही होऊ लागली होती.. पण अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या निधनाची बातमी शनिवारी आली. या प्रागतिक पारसी गृहस्थाचा दहनविधी दिल्लीतच झाला.
पोचा मूळचे मुंबईकर. याच शहरात अर्थशास्त्रात बीएची पदवी (१९९०) आणि एमबीए (१९९२) घेऊन त्यांनी पहिली नोकरी हिंदुस्तान थॉम्सन या जाहिरात संस्थेत केली. युनिसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांना वरिष्ठ पद मिळाल्यानंतरची काही वर्षे आणखीही नोकऱ्या बदलत, सॉफ्टवेअर कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागांचे व्यवस्थापक ही स्वत:ची ओळख त्यांनी कायम ठेवली. या नोकऱ्यांपायी ते कधी सिंगापूरला राहिले तर कधी अमेरिकेत. १९९८ साली मुंबईत येऊन एका गुंतवणूक बँकेत काम करू लागले, पण या मॅनेजरकीत मन रमेना म्हणून पुन्हा शिकण्याचे ठरवून, अमेरिकेत हार्वर्डच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटमध्ये प्रवेश मिळवून त्यांनी परराष्ट्र धोरणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मग ‘बॉस्टन ग्लोब’चे वार्ता-प्रतिनिधी म्हणून ते चीनला गेले. तेथूनच बिझनेस वर्ल्ड या भारतीय पाक्षिकासाठी त्यांनी लिखाण सुरू केले. हळूहळू ‘बॉस्टन ग्लोब’सह अन्य अनेक नियतकालिकांतही पोचा यांचे लिखाण दिसू लागले. ‘द नेशन ते फोब्र्ज या सर्व ठिकाणी लेखन केलेला मी एकटाच असेन’ असे स्वत:बद्दल ते गमतीने म्हणत.
बिझनेस वर्ल्डची लोकप्रियता आता उताराला लागणार की काय, अशी शंका जाणकार लोक घेत असताना पोचा यांच्याकडे या पाक्षिकाचे संपादकपद चालून आले. ते स्वीकारल्यावर या पाक्षिकात नव्या पत्रकारांपासून नव्या मांडणीपर्यंत, बरेच बदल झाले. या बदलांच्या विरुद्ध कुजबुज आघाडय़ा कार्यरत झाल्या, पण पोचा डगमगले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीतदेखील, भारतातील सर्वाधिक खपाचे आणि वाचले जाणारे वाणिज्य-नियतकालिक ही बिझनेस वर्ल्डची ख्याती कायम राहिली. येथूनही बाहेर पडून त्यांनी २००८ मध्ये स्वत:ची नवी चित्रवाणी वृत्तवाहिनी सुरू केली! नवमाध्यमांचे महत्त्व जाणणारे पोचा नेहमीच नर्मविनोदी टिप्पणी करीत. अगदी स्वत:वरही विनोद करण्याची त्यांची तयारी असे. ‘चीनकडून भारताने शिकावे’ या अत्याग्रहाखेरीज त्यांची राजकीय मतेही कधी कडवी नव्हती. बदलाची तयारी ठेवणारा, त्या बदलांसाठी काम करणारा हा संपादक बदल घडण्याआधीच नाहीसा झाला.